केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी नवीन ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केली आहे. मात्र, देशभरातून या योजनेला तीव्र विरोध होताना दिसत आहे. अनेक राज्यामधील तरुण अग्निपथ योजनेला विरोध करत रत्यावर उतरले आहेत. युपी, बिहारसारख्या राज्यांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दगडफेक करत रेल्वे डब्यांना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत.
मात्र, दुसरीकडे तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी या योजनेचे फायदे सांगितले आहेत. प्रमुखही अग्निपथ योजनेला ‘परिवर्तनात्मक म्हणत ही योजना सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी किती फायदेशीर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी केला आहे.
अग्निपथ ही परिवर्तनाची योजना आहे, अशा प्रकारचा निषेध अपेक्षित नव्हता : नौदल प्रमुख
नौदल प्रमुख आर हरि कुमार यांनी अग्निपथ योजनेला “भारतीय सैन्यातील मानव संसाधन व्यवस्थापनातील सर्वात मोठा बदल” असे संबोधले आहे, एएनआय या वृत्तसंस्थेने नौदल प्रमुख आर हरि कुमार यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी ही अग्निपथ योजना किती फायदेशीर आहे याबाबत माहिती दिली होती.
कुमार म्हणाले की, मी या अग्निपथ योजनेवर जवळपास दीड वर्षे काम केले आहे. ही योजना देशासाठी आणि तरुणांसाठी फायदेशीर आहे. कारण त्यातून अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. पण चुकीची माहिती आणि योजनेबद्दल गैरसमज झाल्यामुळे या योजनेला निषेध होत असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अल्प कालावधीच्या सेवेच्या मुद्द्याबाबत ते म्हणाले की याचे अनेक फायदे आहेत कारण अग्निवीरांना सशस्त्र दलात करिअर म्हणून काम करायचे आहे की इतर कोणतीही नोकरी करायची आहे हे ठरवायचे आहे.
२४ जूनपासून ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत हवाई दलात भरती सुरू होईल- हवाई दल प्रमुख
अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी उच्च वयोमर्यादा २१ वरून २३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. येत्या २४ जूनपासून अग्निपथ योजनेअंतर्गत हवाई दलात भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती हवाई दल प्रमुख एयर मार्शल वी आर चौधरी यांनी दिली. “सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे ज्या अंतर्गत तरुणांना सशस्त्र दलात सामील होता येईल. वयाचा निकष १७.५ ते २१ वर्षे असेल. हे जाहीर करताना आनंद झाला, की पहिल्या भरतीसाठी उच्च वयोमर्यादा सुधारित करण्यात आली आहे. ती २३ करण्यात आली आहे. तरुणांना याचा फायदा होईल, असेही चौधरी म्हणाले.
“मला वाटतं तरुणांना अग्निपथ योजनेची पूर्ण माहिती नाही”- लष्करप्रमुख
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही अग्निपथ योजनेंतर्गत उच्च वयोमर्यादा २३ वर्षे करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले की “हे पाऊल अशा तरुणांना संधी देईल जे सैन्यात सामील होण्याच्या तयारीत आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे सैन्य भरती होऊ शकली नसल्याची खंतही मनोज पांडे यांनी व्यक्त केली”.
तसेच “मला वाटतं की तरुणांना अग्निपथ योजनेबद्दल तरुणांना योग्य माहिती नाही. त्यांना या योजनेची माहिती मिळाल्यावर त्यांना खात्री होईल की ही योजना केवळ तरुणांसाठी नाही तर सर्वांसाठी फायदेशीर आहे, असेही पांडे म्हणाले. तसेच “भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. आम्ही आमच्या तरुणांना ‘अग्निवीर’ म्हणून भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहनही पांडे यांनी केले आहे