कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ वेगाने पुढे जात आहे. वैद्यकीय, शिक्षण, तंत्रज्ञान, माध्यम असे कुठलेही क्षेत्र ‘एआय’ने सोडलेले नाही. प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’चा वापर होत आहे. १०० मानवी सॉफ्टवेअर्स जे काम एक वर्षात करतील, तेच काम ‘सुपर एआय’ एका दिवसात करू शकेल, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे.

परंतु, याचा वापर जितका फायदेशीर मानला जात आहे, त्यापेक्षा धोकादायकही मानला जात आहे. याचा वापर करून अनेक गैरप्रकारही करण्यात येत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे लोकांसाठी हा चिंतेचा विषय ठरत आहे. आता ‘एआय’ हस्ताक्षर काढण्यासही सक्षम असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, हा तुमच्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो का? जाणून घ्या…

अबुधाबीच्या ‘मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मधील संशोधकांच्या सांगण्यानुसार, त्यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित एक असा प्रोग्राम तयार केला आहे; जो एखाद्या व्यक्तीच्या लिखाणाच्या आधारावर हस्ताक्षर जसंच्या तसं लिहू शकेल. हा प्रोग्राम इंग्रजी भाषेमध्ये लिहू आणि वाचू शकतो. त्यासह फ्रेंच भाषेतही या प्रोग्रामला काही प्रमाणात यश मिळाले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करीत आहे. डीपफेक व्हिडीओज, लोकांचा आवाज, मानवाची जशीच्या तशी कृती यांसह आता हस्ताक्षर काढणेही ‘एआय’ला शक्य झाले आहे. अबुधाबीच्या ‘मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मधील संशोधक हस्ताक्षर जसंच्या तसं काढण्याचा प्रोग्राम तयार करण्यात यशस्वी ठरले आहेत.

‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेला हा प्रोग्राम कशा प्रकारे काम करतो?

‘ब्लूमबर्ग’च्या माहितीनुसार, स्वतःला जगातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ म्हणवून घेणाऱ्या ‘मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या संशोधकांनी यात ‘ट्रान्स्फॉर्मर मॉडेल’चा वापर केला आहे.

हे एक प्रकारचे न्यूरल नेटवर्क असून, ते विशिष्ट माहितीतील अचूक संदर्भ आणि अर्थ यांचा अभ्यास करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ‘मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या टीमला ‘यूएस’ पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाने याचे पेटंटही दिले आहे.

या पेटंटमध्ये नमूद केल्यानुसार, दुखापत झालेल्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या अपंग व्यक्ती म्हणजे ज्यांना लिहिण्यात अडचण येत असेल त्या व्यक्तींसाठी ‘ऑटोमेटिक हॅण्डरायटिंग टेक्स्ट जनरेशन’ फायद्याचे ठरू शकते. ज्यांना परदेशी भाषेचे ज्ञान नसेल आणि त्यांना परदेशी भाषेत स्वतःच्या अक्षरांत काही लिहायचे असल्यास त्यांच्यासाठीही ते फायद्याचे ठरेल.

हा प्रोग्राम लॉंच झाल्यावर ज्यांना लिहिणे शक्य नाही त्या व्यक्तींसाठी ते वरदानच ठरेल. त्यामुळे पेन हातातही न घेता, त्यांना स्वतःच्या अक्षरांत लिहिणे शक्य असणार आहे.

डॉक्टरांचे हस्ताक्षर डीकोड करण्यापासून जाहिराती तयार करण्यापर्यंत याची क्षमता फार मोठी असल्याचे मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील कॉम्प्युटर व्हिजनचे सहायक प्राध्यापक राव मुहम्मद अन्वर यांनी ‘ब्लूमबर्ग’ला सांगितले.

‘ब्लूमबर्ग’च्या मते, हे मॉडेल इंग्रजीमध्ये शिकू आणि लिहू शकते. फ्रेंच भाषेतही याला काही प्रमाणात यश मिळाले आहे; परंतु या टीमला अद्याप अरबी भाषेत यश आलेले नाही. ‘द नॅशनल’नुसार अरबी भाषेतील हस्ताक्षर जसंच्या तसं लिहू शकणे इतर भाषांच्या तुलनेत अधिक कठीण आहे. याचे कारण म्हणजे अरबी भाषेत अक्षरे जोडली जातात.

या प्रोग्रामचा आऊटपुट चांगला असल्याचेही मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील कॉम्प्युटर व्हिजनचे सहयोगी प्राध्यापक सलमान खान यांचे सांगणे आहे.

या तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ शकतो का?

प्रोग्रामच्या निर्मात्यांनी या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याची शक्यता वर्तवली आहे.

आम्ही या संदर्भात जनजागृती करण्यासाठी काही उपाययोजनादेखील केल्या आहेत. ज्या एखाद्या व्हायरसवर अॅंटीव्हायरससारखे काम करील, असे युनिव्हर्सिटीतील प्राध्यापकांनी सांगितले.

हस्ताक्षर हे माणसाच्या स्वभावाचं प्रतीक असतं. हा प्रोग्राम लॉंच करण्यापूर्वी याबद्दल काळजीपूर्वक विचार केला जात असल्याचेही ‘द नॅशनल’ला सांगण्यात आले. ‘द नॅशनल’नुसार, ही युनिव्हर्सिटी नवीन आहे. २०१९ मध्ये घोषणा झाल्यानंतर २०२० युनिव्हर्सिटी सुरू झाली.

हेही वाचा : सर्व बाजूंनी सुरक्षित असणार भव्य राम मंदिर सोहळा; पहिल्यांदाच होणार ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अध्यक्ष एरिक झिंग ‘द नॅशनल’ला म्हणाले, “मला खूप अभिमान आहे की आम्ही फक्त चार वर्षांमध्ये खूप काही साध्य केले आहे. अजून अनेक टप्पे गाठायचे आहेत.” ते पुढे म्हणाले, “आम्ही ‘एआय’ तज्ज्ञांच्या पुढच्या पिढीलाही प्रशिक्षण देत आहोत; जे मानवी विकासात योगदान देतील.”