अनिकेत साठे
अरुणाचल प्रदेशमध्ये बोमडिलाजवळ गुरुवारी लष्करी हवाई दलाचे चित्ता हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन लेफ्टनंट कर्नल व्हीव्हीबी रेड्डी आणि मेजर जयंत ए. या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. गेल्याच आठवड्यात नौदलाच्या आधुनिक हलक्या ध्रुव हेलिकॉप्टरला (एएलएच) मुंबईच्या समुद्रात आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले होते. यातील तिघांना सुखरूपपणे बाहेर काढणे शक्य झाले. बचाव कार्यात असे नेहमीच घडत नाही. मागील काही वर्षांत सैन्यदलांसह व्यावसायिक हेलिकॉप्टरचे वाढते अपघात चिंतेचा विषय बनला आहे…
चित्ता अपघातग्रस्त कसे झाले?
अरुणाचल प्रदेशच्या बोमडिला परिसरात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर भ्रमंती करीत होते. त्याचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि ते मंडला भागात अपघातग्रस्त झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच लष्कर, इंडो-तिबेट सीमा पोलीसच्या (आयटीबीपी) गस्ती पथकांनी शोधमोहीम हाती घेतली. अपघातात वैमानिक व सहवैमानिकाचा मृत्यू झाला. जिथे दुर्घटना घडली, त्या भागात प्रचंड धुके आहेत. त्यामुळे दृश्यमानता अतिशय कमी आहे. भ्रमणध्वनीलाही रेंज नाही. या दुर्गम क्षेत्रातील हा पहिला अपघात नाही. गेल्या वर्षी तवांग येथे लष्करी हवाई दलाचे चित्ता हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर सहवैमानिक गंभीर जखमी झाला होता. २०१७मध्ये हवाई दलाचे एमआय १७ व्ही-५ हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन चालक दलातील पाच सदस्य आणि दोन लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा >>> विश्लेषण : जी-२० राष्ट्रांच्या बैठकीला पंजाबमध्ये विरोध; शेतकरी, शिक्षक रस्त्यावर, नेमके कारण काय?
हवाई वाहतूक क्षेत्राची सद्यःस्थिती काय?
हेलिकॉप्टर अपघातांची मालिका देशातील हवाई वाहतूक क्षेत्राची व्यापक चिंता अधोरेखित करते. त्यात आजपर्यंत शेकडो व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहेत. अपघातात सैन्यदलांसह व्यावसायिक हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. उत्तराखंड तर अपघाताचे केंद्र बनल्याची स्थिती आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अहवालानुसार १९९० चे २०१९ दरम्यान व्यावसायिक हेलिकॉप्टर अपघातात वैमानिक, चालक दल आणि प्रवाशांसह तब्बल १५० हून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला. या काळात ७२ हेलिकॉप्टर उतरताना अपघाताच्या भोवऱ्यात सापडली होती. ईशान्येकडील राज्यातही अपघातांची संख्या मोठी आहे. सैन्य दलातील १२४ व्यक्तींचा लष्करी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. नंतरच्या काळातही या दुर्घटना थांबलेल्या नाहीत.
हेही वाचा >>> विश्लेषण: अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणात दोन माफीचे साक्षीदार होऊ शकतात?
अपघात का वाढतायेत?
देशातील ४० टक्के हेलिकॉप्टर अपघात हे वैमानिकांच्या चुकीमुळे झाल्याचे निष्कर्ष समोर येतात. १९ टक्के अपघात प्रतिकूल हवामान तर ९ टक्के अपघात डोंगराळ प्रदेशात तारांमध्ये अडकल्याने झाल्याची आकडेवारी आहे. उत्तुंग क्षेत्रातील तारांवर सावधानतेचा इशारा देणारी चिन्हे नसतात. खराब हवामानात दुरवरून त्या दिसत नाहीत. व्यावसायिक हेलिकॉप्टरमधील ८५ टक्के अपघाती मृत्यू हे दिवसा झालेले आहेत. ५४ टक्के सागरी भ्रमंतीवेळी तर ३७ टक्के हेलिकॉप्टर उतरत असताना झाले. जमिनीवरून आकाशात झेपावणे हा तुलनेने सुरक्षित टप्पा मानला जातो. त्यामुळे १९९०-२०२१ दरम्यान त्या अवस्थेत अपघाती मृत्यूंची संख्या सर्वात कमी आहे.
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेचे निरीक्षण काय?
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या सुरक्षा निरीक्षण लेखा परीक्षणात भारतीय विमान वाहतूक मानकांबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. यातील काही निकषात भारताने जागतिक सरासरीपेक्षा अधिक गुण मिळवले. पण, उड्डाण परवाना व प्रशिक्षण या निकषांत देश पिछाडीवर राहिला. प्रशिक्षण संस्थेकडून नियम-अटींचे पालन केले जाते की नाही, यावर देखरेख ठेवणाऱ्या संस्थात्मक व्यवस्था प्रभावी नाही. उड्डाण परवाना देण्यापूर्वी संबंधिताने आवश्यक ते निकष पूर्ण केल्याचे दस्तावेजीकरण, कार्यपद्धतीची अंमलबजावणी महत्त्वाची ठरते. यातील त्रुटींवर लेखा परीक्षणात बोट ठेवले गेले.
हेही वाचा >>> विश्लेषण : सहकाऱ्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप, बायडेन यांचे एकनिष्ठ; अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत एरिक गार्सेट्टी कोण आहेत?
सैन्यदलांच्या प्रशिक्षणात त्रुटींची शक्यता किती?
हवाई प्रशिक्षण देणाऱ्या खासगी संस्था आणि लष्करी संस्था यांना एका तराजूत तोलणे योग्य ठरणार नाही. भारतीय हवाई दलाच्या धर्तीवर लष्कराने हवाई प्रशिक्षणासाठी नियोजन व परिपूर्ण व्यवस्था उभारलेली आहे. नौदल प्रशिक्षणार्थींना प्रथम नौदल प्रबोधिनीत २२ आठवड्यांचा अभ्यासक्रम करावा लागतो. नंतर पुढील हवाई प्रशिक्षणासाठी हवाई दलाची संस्था अथवा इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण प्रबोधिनीत प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. लष्कराने अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी नाशिक येथे कोम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना केली आहे. या ठिकाणी प्राथमिक वैमानिक व नंतर कोम्बॅक्ट एव्हिएटर्स अभ्यासक्रम करावा लागतो. त्यात ९० तासांचा हवाई सरावाचा अनुभव मिळतो. या व्यतिरिक्त सिम्युलेटरवर प्रदीर्घ काळ आभासी सराव करता येतो. नव्याने दाखल होणाऱ्या हेलिकॉप्टरच्या क्षमतांंचा विचार करून सरावात अपेक्षित बदल केले जातात. तेव्हा सैन्यदलांच्या प्रशिक्षणात कमतरता राहण्याची फारशी शक्यता नाही.
अपघातांशी जुनाट हेलिकॉप्टरचा संबंध आहे का?
अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालेले चित्ता हेलिकॉप्टर तब्बल ५० वर्षांपासून कार्यरत आहे. नवीन हेलिकॉप्टर मिळत नसल्याने त्यांचा वापर करणे भाग पडते. त्यांचे सुटे भाग मिळत नाहीत. देखभाल-दुरुस्ती जिकिरीची ठरली आहे. एक इंजिन असणारी ही हेलिकॉप्टर तंत्रज्ञानदृष्ट्या कालबाह्य झाली आहेत. प्रतिकूल हवामान, कमी दृश्यमानतेवेळी वैमानिकाला सतर्क करण्यात ती असमर्थ ठरतात. जुनाट हेलिकॉप्टरचा वापर थांबविण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींची संघटना पाठपुरावा करीत आहे. या संघटनेच्या प्रमुख ॲड. मिनल भोसले-वाघ यांनी आयुर्मान संपलेल्या हेलिकॉप्टरची धोकादायक स्थिती संरक्षण मंत्रालयाकडे वारंवार मांडलेली आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी प्रत्येक वेळी चौकशी समिती स्थापन होते. निष्कर्ष समोर येतात. पण मूळ प्रश्न सोडविला जात नसल्याची या संघटनेची भावना आहे.