Aryans did not invade Harappa? स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, पौराणिक कथा आणि संस्कृती या विषयात पारंगत असलेले प्रख्यात लेखक देवदत्त पट्टनायक यांनी आर्यांनी हडप्पा संस्कृतीचा सामना केला होता का? या प्रश्नाचा शोध घेतला आहे. ब्रिटिशांनी १०० वर्षांपूर्वी सिद्धांत मांडला की, हडप्पा संस्कृतीवर आर्यांनी आक्रमण केले आणि ती नष्ट केली. परंतु, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र आणि जनुकीय संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, आर्यांनी घोडे पाळले होते आणि ते ज्यावेळेस भारतात आले त्यावेळी हडप्पा संस्कृती अस्तित्त्वात नव्हती.
सुमारे ४५०० वर्षांपूर्वी अस्तित्त्वात असलेल्या लोहयुगाच्या व्यापारी नेटवर्कच्या Bronze Age Trading Network (BATN). अतिपूर्व भागात हडप्पा वसलेले होते. मध्य आशियातून भारतात टिन आणि तांबे येत होते, तर अफगाणिस्तानातील निळ्या रंगाचे लॅपिस लाझुली सिंधू नदीमार्गे खाली आणले जात असे. हडप्पा शहरांमध्ये त्याचे मणी तयार केले जात होते. गुजरातमधील ढोलावीरामध्ये ते एकत्र केले जात आणि मग मक्रान किनारपट्टीमार्गे ओमान व मेसोपोटेमियाला पाठवले जात. हे सर्व इ.स.पू. २५०० साली घडत होते. त्याच काळात इजिप्तमध्ये पिरॅमिड्स बांधले जात होते. इ.स.पू. २५०० पूर्वी विस्तृत सिंधू प्रदेशात (सिंध, पंजाब, गुजरात, राजस्थान, हरियाणा) अनेक प्रादेशिक संस्कृती अस्तित्त्वात होत्या. त्यांची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि कृषी प्रणाली होती. हडप्पा संस्कृतीच्या परिपक्व टप्प्यात (इ.स.पू. २६००–१९००) जवळपास ५०० वर्षे शेतकरी, पशुपालक, कारागीर आणि व्यापारी यांच्यात साहचर्य पाहायला मिळते. यामुळे सांस्कृतिक शैलींचे प्रमाणीकरण झाले आणि प्रादेशिक विविधता तुलनेने कमी झाली.
हडप्पा संस्कृतीचे पतन
इ.स.पू. २००० नंतर हडप्पा संस्कृतीचे पतन झाले. प्रादेशिक विविधता पुन्हा वाढली आणि नवीन स्थानिक संस्कृती उदयास आल्या. व्यापाराच्या पद्धती आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती बदलल्या. हडप्पा शहरे नष्ट झाली पण गावे मात्र टिकून राहिली.
या पतनाची संभाव्य कारणे म्हणजे सुमेरियन संस्कृतीकडून व्यापारातील घटती मागणी, हवामान बदलामुळे नद्यांच्या मार्गात झालेला बदल आणि हडप्पा शहरांना वगळून व्यापारी मार्ग ऑक्सस नदीमार्गे थेट इराण व मेसोपोटेमियाकडे वळणे. त्यामुळे हडप्पा संस्कृतीच्या पतनास आर्य आक्रमण जबाबदार नव्हते.
इ.स.पू १२०० पर्यंत भूकंप आणि ज्वालामुखींच्या उद्रेकांमुळे BATN पश्चिम टोकाचा अंत झाला. परिणामी इजिप्त आणि फिनिशियामध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला. यामुळे, व्यापार संपूर्णपणे कोसळला आणि लुटालुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली. याच काळानंतर जगात नवीन बदल दिसू लागले. कला आणि शिल्पांमध्ये घोड्यांनी ओढलेल्या रथांचे चित्रण दिसू लागले. हे चित्रण इजिप्त, आशिया मायनर, मध्य पूर्व आणि मेसोपोटेमियामध्ये आढळते. परंतु, भारतात मात्र अशा चित्रकृती सापडलेल्या नाहीत. उत्तर प्रदेशातील सिनौली येथे १८०० इ.स.पू. च्या सुमारास एक गाडा (wagon) सापडला. त्याला चाकं होती. पण कोणतेही प्राणी जुंपलेले नव्हते. हा गाडा ऑक्सस संस्कृतीशी संबंधित असल्याचे मानले जाते. परंतु, इ.स.पू. १५०० पर्यंत अशा ऋचांची रचना केली जात होती. ज्यात घोडे, रथ, घोडेस्वार आणि अगदी अश्वमेध यज्ञांचेही वर्णन होते. याचा कालखंड निश्चित सांगता येतो. कारण, या ऋचांमध्ये असलेल्या देवतेचा उल्लेख इ.स.पू. १३०० मधील एका सिरियन मृण्फलकावर कोरण्यात आला आहे.
आर्यांचे आगमन
या वैदिक ऋचा होत्या. या ऋचांच्या कर्त्यांनी त्या आपल्या पुत्रांसाठी रचल्या होत्या. हे पुरुष हिमालयाच्या उत्तरेहून आपल्या घोड्यांसह आणि नवीन रथतंत्रज्ञानासह आले होते आणि त्यांनी स्थानिक स्त्रियांशी विवाह केला. त्यांच्या जनुकांच्या देणगीमुळे त्यांच्या मुलांमध्ये दूध पचविण्याची क्षमता निर्माण झाली. त्यांना कधी काळी या भूमीवर फुललेल्या महान शहरी संस्कृतीबद्दल काहीही माहिती नव्हती. ते प्रोटो-इंडो-इराणी भाषा बोलत होते आणि ते इतर इंडो-युरोपियन लोकांप्रमाणे नव्हते; त्यांनी स्वतःला ‘आर्य’ असे संबोधले. त्यांना सोम नावाच्या एका विशेष पेयाचा ज्ञान होते. हे पेय हिंदूकुश पर्वतांमध्ये आढळणाऱ्या एपेड्रा वनस्पतीच्या कांड्यांपासून तयार केले जात असे. ‘आर्य’ हा शब्द केवळ भारतातील वेद आणि इराणच्या अवेस्ता या दोन ग्रंथांमध्ये आढळतो. अन्यत्र कुठेही नाही.
घोड्यांच्या डीएनए पुराव्यानुसार…
घोडे संपूर्णतः पाळीव प्राणी फक्त सुमारे इ.स.पू. २१०० च्या दरम्यान कॅस्पियन आणि काळ्या समुद्राच्या उत्तरेसच झाले होते. त्यांनी घोडे पाळीव केले. ते युरेशियन स्टेप्पे प्रदेशातील भटके समाज होते. ते आता लुप्त झालेली प्रोटो-इंडो-युरोपियन (PIE) भाषा बोलत होते.
प्रारंभीचे घोडे इतके लहान होते की, त्यांच्यावर स्वार होणे कठीण होते. तसेच ते चाक असलेली गाडी ओढण्याइतके मजबूत नव्हते. यामुळेच आरे असलेल्या रथाचा शोध लागला. हा रथ दोन किंवा अधिक घोड्यांनी ओढला जाऊ शकत होता. असे सर्वात जुन्या प्रकारचे रथ रशियाच्या दक्षिणेकडील सिंताष्टा संस्कृतीच्या समाधीस्थळांमध्ये आढळले आहेत. हे पुरावे सुमारे इ.स.पू. १९०० च्या काळातील आहेत.
वैदिक भाषा आणि तिचे मिश्र स्वरूप
वैदिक भाषेत प्रोटो-इंडो-इराणी आणि स्थानिक ध्वनी (मूर्धन्य उच्चार) यांचे मिश्रण आढळते. तसेच द्राविडी आणि मुंडा भाषांतील काही स्थानिक शब्दही समाविष्ट आहेत. पुरुषांनी आपल्या मुलांसाठी देव इंद्राच्या पराक्रमांविषयी ऋचा रचल्या होत्या. इंद्राने वृत्र आणि वलासारख्या राक्षसांशी गाई, प्रकाश, उष्णता आणि पाण्यासाठी लढा दिला होता. त्यांनी वरुणाचा उल्लेख केला. तो अनुशासन आणि मैत्रीचा देव मानला गेला. त्यांनी आपल्या पूर्वज मनूच्या कथा गायल्या आणि पूर्व दिशेला एक गरुड पाठवला. हा गरुड ओलांडता न येणाऱ्या पर्वतांपलीकडे (हिंदूकुश?) गेला आणि तिथून सोम वनस्पती आणली. ही वनस्पती उष्णता देणारी आणि ऊर्जा वाढवणारी होती आणि इंद्राला अत्यंत प्रिय होती. या मुलांनी त्यांच्या मातांकडूनही काही आठवणी जतन केल्या. विशेषतः समुद्र पार करणाऱ्या नौकांबद्दल. या नौकांवरून समुद्रकिनारा शोधण्यासाठी पक्ष्यांचा उपयोग करत असत.
विषयाशी संबंधित प्रश्न
आर्यांनी हडप्पा नगरांवर आक्रमण केले होते का?
भारतात आर्यांच्या आगमनाबाबत पुरातत्वीय, भाषाशास्त्रीय आणि जनुकीय संशोधन काय सुचवते?
हडप्पा संस्कृतीच्या पतनामागची मुख्य कारणे कोणती होती?
घोडे सर्वप्रथम कोणत्या लोकांनी पाळीव केले आणि ते कोणती भाषा बोलत होते?
इ.स.पू. १५०० नंतर भारतात आढळणाऱ्या स्टेप्पे डीएनएचा विवाहपद्धतींवर कोणता प्रभाव दिसून येतो?