टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी सोमवारी ट्विटरमधील समभाग विकत घेतल्याची घोषणा केली. ‘ट्विटर’वर मुक्त अभिव्यक्तीबद्दल आक्षेप असूनही, मी ट्विटरमध्ये ९.२ टक्के भागभांडवल (हिस्सेदारी) खरेदी केले आहे, असं त्यांनी सांगितलं. आपण नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा विचार करतोय असं मस्क यांनी म्हटल्याच्या काही दिवसांनंतर लगेच मस्क यांनी कंपनीमध्ये हिस्सेदारी विकत घेतली.

कंपनीची किती मालकी कोणाकडे?
मस्क यांनी ९.२ टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी ३ बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च केलं. ते कंपनीचे सर्वात मोठे भागभांडवलधारक झाले आहे. या कंपनीची ८.८ टक्के भागभांडवल हे व्हॅनगार्ड ग्रुपकडे, ८.४ टक्के मॉर्गन स्टॅनली कंपनीकडे तर २.२ टक्के भागभांडवल कंपनीचे सहसंस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्से यांच्याकडे आहेत.

मस्क यांची नेमकी भूमिका काय?
९.२ टक्क्यांच्या या अधिग्रहणामुळे ते कंपनीतील सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक बनले. मस्क यांना संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा निर्णय मंगळवारी ‘ट्विटर’ने घेतला. अमेरिकेच्या रोखे व्यवहार आयोगाला (सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज कमिशन) तशी कागदपत्रे ‘ट्विटर’द्वारे सुपूर्द करण्यात आली आहेत. मस्क हे २०२४ पर्यंत ‘ट्विटर’चे वर्ग -२ संचालक असतील. नव्या नियुक्तीनुसार मस्क ट्विटरचे १४.९ भागांपेक्षा जास्त भाग भांडवल घेऊ शकणार नाहीत.

मस्क यांना संचालक निवडण्यामागे कारण कंपनीची मालकी…
‘ट्विटर’ने आयोगाकडे सुपूर्द केलेल्या कागदपत्रांत नमूद केले आहे, की मस्क यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करणार असून, ते वर्ग -२ संचालक म्हणून कंपनीच्या भागधारकांच्या २०२४ मध्ये होणाऱ्या वार्षिक सभेपर्यंत कार्यरत राहतील. या कार्यकाळात आणि त्यानंतरचे तीन महिने मस्क स्वत: अथवा त्यांच्या समूहाचे सदस्य म्हणून कंपनीच्या १४.९ भागांपेक्षा जास्त भागभांडवलाची मालकी घेऊ शकणार नाहीत. त्यामुळेच मस्क यांना संचालक मंडळवार आणणे ही कंपनीचा मालकीहक्क बदलू नये यासाठी केलेली ही उपाययोजना दिसते.

पराग अग्रवाल यांनी केलं स्वागत…
‘ट्विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये मस्क यांच्या संचालक मंडळावरील संभाव्य नियुक्तीस दुजोरा दिला. त्यांनी नमूद केले, की मस्क यांची प्रभावी सेवा पुरवण्यावर अतीव श्रद्धा असून, त्याबाबत ते कडवे टीकाकारही आहेत. ‘ट्विटर’च्या संचालक मंडळाला ते उंची प्राप्त करून देतील.

मस्क यांना विशेष काळजी असल्याचं डोर्से म्हणाले…
‘ट्विटर’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्से यांनी मस्क यांच्या ट्विटरच्या संचालक मंडळावरील नियुक्तीचे स्वागत करून, मस्क यांना जग व त्यातील ट्विटरच्या भूमिकेविषयी विशेष काळजी आहे व तशी ते समर्थपणे घेतील, असे सांगितले. डोर्से यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये पदभार सोडला असला तरी ते मेपर्यंत ‘ट्विटर’च्या संचालकपदी असतील.

मस्क घेणार मोठे निर्णय…
एवढ्या मोठ्याप्रमाणात कंपनीतील भागभांडवलाची मालकी आणि संचालक मंडळामधील स्थान यामुळे ट्विटरमधील धोरणात्मक बदलांबद्दल मस्क हे सल्ला देण्याबरोबरच अधिक सक्रीय असती. उदाहऱण म्हणजे, मस्क यांनी २५ मार्च रोजी म्हणजेच कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याआधी मुक्त संवादाचं धोरणाला चिटकून राहणं गरजेचं आहे की नाही याबद्दल त्यांनी लोकांची मतं ट्विटरवरुन जाणून घेतली. मुक्तपणे बोलण्याचा अधिकार हा लोकशाहीचा मूलभूत आधार असल्याचं मस्क मानतात. या पोलमध्ये ७० टक्के लोकांनी ट्विटर मुक्तपणे मतप्रदर्शन करणारं माध्यम असल्याचं वाटत नाही असं म्हटल्यानंतर २६ तारखेला मस्क यांनी आणखी एक पोल घेतलाय. याच संदर्भात पोल घेताना त्यांनी ट्विटरवर संपादन म्हणजेच एडीटचा पर्याय हवा की नाही असं विचारलं. त्यावरही ४४ लाख लोकांनी मत नोंदवलं ज्यातील ७३ टक्क्यांहून अधिक लोकांनी असा पर्याय हवा असं मत व्यक्त केलं. त्यामुळे आता मस्क पुन्हा एकदा एखादा मोठा निर्णय घेण्याची शक्यताही काहींनी व्यक्त केलीय.

मस्क यांच्या संपत्तीचा होणार फायदा…
डिसेंबर २०२१ मध्ये ट्विटरचा एकूण महसूल ५ बिलियन अमेरिकन डॉलर्स इतका होता. तसेच तो २०२३ पर्यंत ७.५ बिलियन डॉलर्सपर्यंत असण्याचं उद्दीष्ट आहे. मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असून त्यांची संचालक मंडळावर नेमणूक झाल्याने कंपनीला याचा आर्थिक फायदा होणार असून फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या कंपन्यांविरोधात स्पर्धा करण्यासाठी मस्क यांच्या संपत्तीबरोबरच त्यांची विचारसरणीही कंपनीला फायद्याची ठरु शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

ट्विटर आता ऑडिओ ट्विट्स आणि स्पेससारखे नवे प्रोडक्ट घेऊन येत आहे. त्यामुळेच गुंतवणूकादारांकडून मिळणाऱ्या निधीचा हा नव्या विस्तारासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी फायदा होणार आहे.

कंपनीची प्रतिमा सुधारणार…
मस्क यांची संचालक मंडळावर नियुक्ती झाल्याने आणि कंपनीमधील ते सर्वात मोठे हिस्सेदार असल्याचा फायदा कंपनीची प्रतिमा सुधारण्यासाठी होणार आहे. विशिष्ट विचारसणीला कंपनी समर्थन करते अशी टीका अनेकदा झाली आहे. त्यामुळेच मस्क यांच्यासारखा चेहरा कंपनीला लाभल्याने त्याचा फायदाच होणार आहे.

Story img Loader