सोन्याने अखेर प्रति १० ग्रॅम एक लाखाचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हमध्ये फेरबदल करण्याची योजना जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. पहिल्यांदाच सोन्याच्या भावाने एक लाखाची रक्कम पार केली आहेत. अस्थिर जागतिक वित्तीय बाजारपेठेत सोन्याने सर्वोत्तम सुरक्षित संपत्ती म्हणून आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. मंगळवारी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम एक लाख रुपये एवढी होती. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९१ हजार ६०० रुपये इतकी होती. ट्रम्पच्या व्यापार शुल्काचा आणि अमेरिकन फेडमध्ये सुधारणा करण्याच्या त्यांच्या धमकीमुळे जागतिक बाजारपेठेत अस्वस्थता कायम राहिली. त्यामुळे येत्या काळात महागाई आणि व्याजदरांमध्येही वाढ होऊ शकते.

लाखापार का गेलं सोनं?

भारतातील सोन्याची किंमत ही साधारणपणे आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार असते. अमेरिकन डॉलर घसरला तरीही जागतिक सोन्याच्या किमती तीन हजार ४०० डॉलर प्रति औंसच्या पुढे गेल्या. मार्च २०२४ पासून सोन्याच्या किमतीत जवळपास ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढते. कारण- त्यामुळे परकीय चलन असलेल्या गुंतवणूकदारांना सोन्याची किंमत अधिक परवडणारी ठरते. न्यूयॉर्कमध्ये आज सोन्याचा भाव प्रति ट्रॉय औंस सुमारे तीन हजार ४८६.८५ डॉलर एवढा आहे. ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हमध्ये फेरबदल करण्याची योजना जाहीर केली. परिणामी अमेरिकन चलनाविषयी धोरणाच्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या किमतीत घसरण होत असतानाही व्याजदरात कपात न केल्याबद्दल ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांना धारेवर धरले होते.
वाढते भू-राजकीय धोके, मध्यवर्ती बँकेची मजबूत मागणी व सततची महागाई यांमुळेही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याशिवाय रशिया-युक्रेनबाबतही तणाव वाढला आहे. परिणामी अनिश्चिततेचा हा नवीन मुद्दा यूएस फेडच्या व्याजदरांवरील निर्णयाचा मार्ग गुंतागुंतीचा करत आहे.

एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी म्हटलेय, “वाढत्या व्यापार शुल्काचा तणाव, अमेरिकेच्या आर्थिक दृष्टिकोनाबद्दलच्या चिंता आणि अमेरिकेच्या कर्ज संकटामुळे सोन्यातील या तेजीला आणखी पाठिंबा मिळत आहे. चीन, जागतिक मध्यवर्ती बँका आणि संस्थात्मक गुंतवणूकदार यांच्याकडून सातत्याने सोन्याची खरेदी केली जात असल्यानेही या तेजीला चालना मिळाली आहे.”

ट्रम्प यांच्या फेडरल रिझर्व्हच्या फेरबदलाचा परिणाम कसा झाला?

अमेरिकन फेडरल रिझर्व्हवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टीकेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी डगमगला आहे. त्यामुळे डॉलरची किंमत झपाट्याने कमी झाली आणि सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोन्याचे मूल्य विक्रमी पातळीवर पोहोचले. “फेडच्या स्वातंत्र्याबद्दल एकूणच चिंता निर्माण होत आहे. अमेरिकन डॉलर आणि रिस्कवर आधारित इक्विटी बाजारांना धक्का बसला आहे, त्यामुळे सोन्याला फायदा होणार आहे”, असे व्हेंचुरा येथील कमोडिटीजचे प्रमुख एन. एस. रामास्वामी यांनी सांगितले आहे.

अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या धोक्याचा डॉलरवर होणारा भारी परिणाम आणि महागाई वाढत असताना डॉलरच्या व्याजदरात कपात न केल्याबद्दल पॉवेल यांना काढून टाकण्यास ट्रम्प उत्सुक आहेत, असे ट्रम्प यांनीच म्हटले होते. सोमवारी ट्रम्प आणि फेडरल रिझर्व्हमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक गुंतवणूकदारांनी अमेरिकन मालमत्ता गुंतवणुकीतून माघार घेतली. परिणामी सोमवारीही अमेरिकन डॉलरची घसरण सुरूच राहिली. २००२ नंतरची ही मोठी घसरण होती. परदेशी चलनांच्या तुलनेत ग्रीनबॅक मोजणारा आयसीई यूएस डॉलर निर्देशांक सोमवारी ९७.९२ पर्यंत खाली आला.

भारतीय सोन्याची बाजारपेठ किती मोठी आहे?

भारत चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची बाजारपेठ आहे. २०२४ मध्ये देशात सोन्याची मागणी ८०२.८ टन होती. २०२३ मध्ये ७६१ टन होती. चीनची मागणी ९८५ टन होती. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये ३.९२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत २०२४ मध्ये भारतातील एकूण सोन्याची मागणी ३१ टक्क्यांनी वाढून ५.१५ लाख कोटी रुपये झाली. भारतीय संस्कृतीतही सोन्याचं स्थान महत्त्वाचं मानलं जातं. सोने हे पिढ्यान् पिढ्या जपून ठेवलं जातं. रुग्णालयाचा खर्च, शिक्षणासाठी अशा विविध आर्थिक गरजांच्या काळात कर्ज मिळवण्यासाठी सोने गहाण ठेवण्यास बहुतांश लोक तयार असतात.

“गेल्या काही महिन्यांतील अर्थव्यवस्थेतील मंदी ग्राहकांनी आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सोने गहाण ठेवण्यास कारणीभूत ठरली आहे. व्यापार युद्ध किंवा महागाईसारख्या आर्थिक अनिश्चततेच्या काळात सोने ही एक स्थिर मालमत्ता ठरत आहे. सोने जवळ असताना तत्काळ आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पर्याय उपलब्ध होतो”, असे एका विश्लेषकाने सांगितले. डिजिटल प्लॅटफॉर्म, विविध अॅप्स व फिनटेक सोल्युशन्सच्या वाढीमुळे ग्रामीण भागातही सोने कर्ज अधिक सुरळीत आणि आकर्षक झाले आहे. सोन्याच्या किमती वाढत असताना देशभरात सोने कर्ज हा एक सर्वांत विश्वासार्ह वित्तपुरवठा पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये वेगळाच ट्रेंड

सध्या लग्नसराई सुरू असल्याने सोनं लाखापार गेलं किंवा आणखी काही झालं, तरी दागिने बनवणं याला पर्याय नाही. भारतीय संस्कृतीत पारंपरिकरीत्या दागिने महत्त्वाचे मानले जातात. अशा वेळी लग्नसोहळे तोंडावर आलेल्या ग्राहकांसाठी सोन्याच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याचे दिसते. मात्र, काही ग्राहक सध्या यावर तोडगा म्हणून त्यांच्याकडे साठवलेल्या जुन्या सोन्याचा आधार घेत आहेत. जुने सोने मोडून नवीन सोन्याचे दागिने बनविण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती मुंबादेवी दागिना बाजार असोसिएशनचे सेक्रेटरी अनिल जैन यांनी दिली आहे. “नवीन दागिने खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या ४० टक्क्यांनी कमी झाली आहे; तर ५० टक्के ग्राहक जुन्या सोन्याचा वापर करून नवीन दागिने बनवून घेत आहेत”, असेही जैन यांनी सांगितले. “अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी थोडीफार वाढू शकते. एकंदर बाजारातील परिस्थिती सुधारल्यास सोन्याची किंमत कमी होऊ शकते. येत्या वर्षभरात अमेरिकेत मंदीचं सावट आलं, तर पुढील काळात सोन्याची किंमत १५ ते ३५ टक्क्यांनी कमी होऊ शकते”, असा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे.

सध्याची सोन्याची किंमत ही पूर्वी दिलेल्या किमतीपेक्षा आवाक्याबाहेरची असल्याचे मत एका ग्राहकाने व्यक्त केले आहे. “आमच्या घरात आता लग्नसोहळा असल्याने दागिने बनवण्यासाठी आम्ही जुनं सोनं वापरत आहोत. माझ्या लग्नाच्या वेळी मी सोनं खरेदी केलं तेव्हा त्याची किंमत सुमारे ५० हजार इतकी होती. मात्र, आता ही किंमत ९९ हजार ते एक लाखावर गेली आहे. त्यामुळे नवीन दागिने खरेदी करण्यासाठी एवढी मोठी रक्कम गुंतवणे यापेक्षा जुने दागिने मोडून नवीन घडवण्याचा पर्याय आम्हाला सोईस्कर वाटतो”, असे मुंबईतील एका ग्राहकाने म्हटले आहे.