जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत पंजाबमध्ये दोन वेळा भीषण पूरस्थिती पाहायला मिळाली. पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर पंजाबमधील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. नद्यांचे पाणी पात्र ओलांडून शेतात, गावात शिरलेले पाहायला मिळाले. हिमाचल प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुन्हा एकदा पंजाबमध्ये पूरस्थिती पाहायला मिळाली. बहुतांशी धरणे तुडुंब भरल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे खालच्या बाजूला पाणी सोडल्यामुळे पुराचा आणखी धोका निर्माण झाला आहे. पंजाबमधील पूरस्थितीमुळे होणारे शेतीचे नुकसान संपूर्ण देशाला परवडणारे नाही. ही परिस्थिती बदलायची असेल, तर मोठी धरणे आणि नद्यांवर कालवे काढून योग्य जलव्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासंबंधी घेतलेला हा आढावा.
पंजाबमधील नद्या, नाले
पंजाबमध्ये सतलज, बियास व रावी या तीन बारमाही नद्या आहेत; तर पूर्व आणि पश्चिमेकडे वाहणारे दोन नाले आहेत. तसेच घग्गर व चक्की या दोन बारमाही वाहत नसलेल्या नद्या आहेत. होशियारपूर, रोपर, मोहाली व नवांशहर या जिल्ह्यांमधून १६ मोठे हंगामी ओढे वाहतात; ज्यांचे जाळे संपूर्ण राज्यभर पसरलेले आहे. यासोबतच पावसाळ्यात हंगामी वाहणारे अनेक नाले आहेत.
हे वाचा >> भाजपाने ‘पुराचे राजकारण’ केले; दिल्ली आणि पंजाबमधील ‘आप’ सरकारचा आरोप
तज्ज्ञांच्या मते, हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीरमध्ये उगम पावणाऱ्या बारमाही आणि बारमाही नसलेल्या नद्या पावसाळ्यात पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घेऊन येतात. नद्यांच्या या पाण्यामुळे जेव्हा धरणे आपली क्षमता गाठून ओसंडून वाहू लागतात, तेव्हा पंजाबमध्ये फारसा पाऊस पडला नाही तरी पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका उदभवतो. तज्ज्ञ सांगतात की, नद्यांच्या आणि पाण्याच्या स्रोतांचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. नद्या आणि धरणांतून कालवे काढल्यास पाण्याचे योग्य व्यवस्थापन होऊ शकते.
नद्यांवर काढलेले कालवे कसे काम करतात?
पाण्याच्या स्रोतांतील जसे की, नदीच्या अतिरिक्त पाण्याचे नियमन करणे किंवा पाणी वळवणे यासाठी कालवे अत्यंत उपयुक्त ठरतात. कालवे काढून नदीचे पाणी विशिष्ट वाहिन्यांकडे निर्देशित करणे, छोट्या बंधाऱ्यांचा वापर करून कालव्याद्वारे नद्यांमध्ये परस्परसंबंध स्थापन करणे अशा बाबींचा यात समावेश होतो.
पंजाबमध्ये सध्या कालव्यांची काय स्थिती आहे?
बारमाही वाहणाऱ्या नद्यांवर मोठी धरणे बांधलेली आहेत. त्यामध्ये सतलज नदीवरील भाक्रा नानगल धरण, बियास नदीवरील पोंग धरण, रावी नदीवरील रंजित सागर धरण यांचा समावेश होतो. तसेच या मोठ्या नद्यांवर ‘धुस्सी बांध’देखील (मातीचे बंधारे) आहेत. तथापि, धुस्सी बांध म्हणजे मातीचे बंधाऱ्यांची बांधणी फारशी मजबूत नसल्यामुळे नदीच्या पाण्यात थोडी जरी वाढ झाली तरी बंधाऱ्यातून पाणी झिरपण्यास सुरुवात होते. होशियारपूरसारख्या जिल्ह्यात पाण्याची मर्यादित क्षमता असणारे अनेक लहानसहान मातीचे बंधारे आहेत. पण, अनेक स्थानिक नाले, ओढ्यांमध्ये कालव्यांचा अभाव असल्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका वाढतो. मोठ्या धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे उत्तम व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पाण्याचा विसर्ग हळूहळू करण्यासाठी अतिरिक्त साठवण क्षमता निर्माण करण्याची गरज आहे.
पूर रोखण्यासाठी कालवे कसे मदत करू शकतात?
पंजाबमध्ये नुकत्याच आलेल्या दोन्ही पुरांमुळे मुख्य नद्या आणि स्थानिक पाण्याचे प्रवाह ओसंडून वाहू लागले. पहिला पूर ९ व १० जुलै रोजी आला होता. पंजाबमध्ये जोरदार पाऊस कोसळल्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आणि ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले होते. तसेच सतलज व घग्गर या नद्याही पात्र सोडून वाहू लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसराला पाण्याने वेढा घातला.
दुसरा पूर १५ ऑगस्ट रोजी आला. यावेळी पंजाबमध्ये फारसा पाऊस झाला नव्हता. मात्र हिमाचल प्रदेशमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे भाक्रा नानगल आणि पोंग धरणांमध्ये क्षमतेहून अधिक पाणी जमा झाल्यामुळे ते खाली पंजाबमध्ये पाणी सोडण्यात आले. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जर योग्य रीतीने कालवे काढलेले असते, तर पहिल्या आणि दुसऱ्या पुराची परिस्थिती आटोक्यात आणता आली असती.
आणखी वाचा >> पंजाबमध्ये पूराच्या संकटाचेही राजकारण; सत्ताधारी ‘आप’सह भाजपा, काँग्रेस, अकाली दलाची एकमेकांवर टीका
पंजाब जलसंधारण विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, कालवे करण्याच्या पद्धतीमुळे दूरगामी अनुकूल परिणाम दिसू शकतात. यासोबतच मातीचे बंधारे (धुस्सी बांध) आणखी मजबूत केले आणि त्यांची ३० ते ४० फूट रुंदी वाढवली, तर जलव्यवस्थापन आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकते. थोडक्यात काय तर पंजाबमध्ये भविष्यातही पुराचा धोका उदभवू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन अधिकाधिक कालवे काढणे, जलव्यवस्थापन करणे याला पर्याय नाही, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.