सहा महिन्यांपूर्वी १२ ऑगस्ट २०२२ या दिवशी जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाला. निर्वासितांना आश्रय देणाऱ्या युनायटेड स्टेट्सचे महत्त्व या विषयावर व्याख्यान देण्यासाठी सलमान रश्दी गेले होते. त्यावेळी काळे कपडे परिधान केलेल्या एका तरूणाने स्टेजवर जाऊन काही कळायच्या आत सलमान रश्दी यांच्यावर एकामागोमाग एक वार केले.
‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ (1988) प्रकाशित झाल्यापासून आणि फेब्रुवारी 1989 मध्ये इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांनी कादंबरीत इस्लामचा अपमान केल्याबद्दल कुप्रसिद्ध फतवा जारी केल्यापासून तीन दशकांहून अधिक काळ रश्दी यांच्या जीवनाला आणि कारकिर्दीला हा धोका होता. त्यांना तेव्हा ठार करण्याची धमकी देण्यात आली होती. जी या हल्ल्याच्या रूपाने पूर्णत्वास येताना दिसली. सुदैवाने सलमान रश्दी या हल्ल्यातून बचावले.
द सॅटेनिक व्हर्सेस हे पुस्तक सलमान रश्दींचं वादग्रस्त पुस्तक ठरलं
द सॅटेनिक व्हर्सेस हे पुस्तक सलमान रश्दी यांनी लिहिलं. या पुस्तकामुळे त्यांच्याविषयी असे वाद निर्माण झाले जे वाद अजूनही त्यांच्या मानगुटीवर बसले आहेत. १९८० च्या दशकात त्यांना या पुस्तकामुळे पहिल्यांदा ठार मारलं जाण्याची धमकी इराणहून मिळाली होती. हे पुस्तक ईश्वर निंदा करणारं आणि इस्लाम विरोधी आहे असा कट्टरपंथियांचा आक्षेप आहे. १९८८ मध्ये या पुस्तकावर इराणमध्ये बंदी घालण्यात आली मात्र कट्टर पंथियांच्या निशाण्यावर सलमान रश्दी तेव्हापासूनच आहेत.
सलमान रश्दी हल्ल्यामुळे खचले नाहीत
सलमान रश्दी हे असं रसायन आहेत जे नकारात्मकतेतही सकारात्मकता शोधतात. कारण हल्ला होऊन आणि हल्ल्यात एक डोळा निकामी होऊनही सलमान रश्दी नव्या पुस्तकासह परतले आहेत. Victory City ही कादंबरी त्यांनी लिहिली आहे. कादंबरी लिहिताना त्यांचा उत्साह आणि लिहून झाल्यानंतरचा उत्साह हा पूर्वीसारखाच आहे.
रश्दी यांच्या हल्ल्याबाबत द न्यूयॉर्कर मधले काही ठळक मुद्दे असे आहेत
लेबनीज वंशाचा २४ वर्षीय हल्लेखोर हादी मातर याने ट्विटरवर ही गोष्ट वाचली होती की सलमान रश्दी यांचं व्याख्यान होणार आहे. सलमान रश्दींवर हादी मतारनेच हल्ला केला. हादी मतार २०१८ मध्ये त्याच्या वडिलांना लेबनॉनमध्ये भेटला होता. मात्र काही केल्या या दोघांमधले मतभेद मिटले नव्हते. त्यानंतर हादी मतार नाराज होऊन न्यू जर्सीला आई आणि जुळ्या बहिणींकडे परत आला होता. हादी मतार परतल्यानंतर जास्त कट्टर झाला होता. त्याने नोकरी सोडली. तो आपल्या घरातून बाहेर पडत नसे. फक्त व्यायामशाळेत जात असे.
सलमान रश्दींवर हल्ला करण्यापूर्वी हादी मतारने काय केलं?
सलमान रश्दींवर हल्ला करण्याच्या एक दिवस आधी हादी मतार ज्या ठिकाणी व्याख्यान होणार होतं तिथे तो गेला. ते ठिकाण कसं आहे तिथे स्टेज कुठे उभारलं जाऊ शकतं या सगळ्या गोष्टींचा अंदाज हादी मतारने घेतला. त्यानंतर त्याने ती रात्र तिथेच काढली.
हल्ल्याच्या दिवशी नेमकं काय घडलं?
कार्यक्रमात सलमान रश्दी पोहचले ते आपला मित्र हेन्री रिझसोबत होते. हेन्री रिझ हे निर्वासित लेखकांना मदत करणाऱ्या संस्थेचे सह संस्थापक आहेत. त्यांच्यासोबत सलमान रश्दी असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हादी मतारने हल्ला त्यांच्यावर थेट हल्ला केला. यानंतर सलमान रश्दींना वाचवण्यासाठी एक भूलतज्ज्ञ, एक रेडिओलॉजिस्ट सगळेच सरसावले. ते सगळे जण या ठिकाणी आले होते. उपस्थितांमध्ये कुणी डॉक्टर आहे का हे विचारल्यावर सगळेच पुढे आले. रश्दी यांच्यावर भयंकर हल्ला झाला होता. त्यांच्या मानेवर, चेहऱ्यावर, हातावर, पोटावर आणि बरगडीच्या खाली वार झाले होते. या सगळ्यांनी मदत केल्यानंतर सलमान रश्दी यांना पिटर्सबर्ग मेडिकल सेंटर या ठिकाणी लेव्हल 2 ट्रॉमा सेंटरमध्ये विमानाने नेण्यात आलं. रश्दी या ठिकाणी सहा आठवडे उपचार घेत होते.
रेम्निक हे जेव्हा डिसेंबर २०२२ मध्ये सलमान रश्दींना अँड्यू वायलींच्या ऑफिसमध्ये भेटले तेव्हा सलमान रश्दी यांचं १८ किलो वजन कमी झालं होतं. त्यांचा उजवा डोळा निकामी झाला होता. तसंच त्यांच्या चेहऱ्यावर डाग पडले होते. शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. या सगळ्या खुणा सहन करत सलमान रश्दी यांनी पुस्तक लिहिलं. हा सगळा उल्लेख रेम्निक यांनी त्यांच्या लेखात लिहिला आहे.