उदंड ऐकिला । उदंड गायिला । उदंड देखिला । क्षेत्रमहिमा ।। पंढरीसारखे । नाही क्षेत्र कोठे ।….या बहिणाबाईंच्या अभंगाच्या दोन कडव्यातूनच पंढरपुरीचे महत्त्व विशद होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरक्षेत्रीचा राजा म्हणजेच ‘पांडुरंग’. याच पांडुरंगाचा महिमा वर्णावा तितका कमीच. गेली २८ युगं पांडुरंग हा एकाच स्थळी उभा असल्याचे वर्णन संत परंपरा करते. पंढरपूरच्या या राणाला त्याच्या भक्तांनी अनेक बिरुद दिली. विठोबा, विठू माऊली, पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई इत्यादी. या प्रत्येक नावांचा अर्थ आणि त्यामागे दडलेला इतिहास हा भूतकाळाचा साक्षीदार आहे. पांडुरंग आणि पंढरपूर या दोन नावांमध्येही असाच ऐतिहासिक ऋणानुबंध आहे.

अधिक वाचा: हिंदू, जैन व बौद्ध : चातुर्मासाची अस्सल भारतीय परंपरा

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Pune Prime Minister Narendra Modi Pandit Jawaharlal Nehru Pune print news
पुणे आवडे पंतप्रधानांना!
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
Art and Culture with Devdutt Pattanaik
UPSC Essentials: हत्तींपासून रामायणापर्यंत भारताने जगाला काय दिले? काय सांगतो भारताच्या समृद्ध व्यापाराचा इतिहास?
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे

पांडुरंगपूरचा पांडुरंग

पंढरपूर हे पंडरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंडरीपूर, फागनीपूर, पौंडरीक्षेत्रे, पंडरंगे, पांडरंगपल्ली अशा विविध नावांनी ओळखले जात होते. संतजन या क्षेत्राचा उल्लेख भूवैकुंठ किंवा दक्षिण काशी म्हणून करतात. ‘पंडरंगे’ हा कानडी शब्द आहे. त्याचे पंडरिका, पंडरी किंवा पंढरी असे रूप झाले असले पाहिजे असे अभ्यासक मानतात. ‘पंढरी’ या शब्दाला ‘पूर’ हा नगरवाचक प्रत्यय लागून पंढरीपूर आणि नंतर पंढरपूर हा शब्द तयार झाला. ‘पांडुरंग’ हे नाव पंडरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण होय. ‘पांडुरंग’ ह्या शब्दाचा अर्थ ‘शुभ्र/गौर रंग’ असा होतो. गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे, असे प्रथमदर्शनी वाटले, तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. मराठी संत हे शिव आणि विष्णू ह्यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते परंतु त्यांनी पांडुरंगाला विष्णुचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेष धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धूसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी ‘पांडुरंग’ म्हटले आहे. राजपुरोहित आणि डॉ. रा. गो. भांडारकर यांनी अनुक्रमे पंडरीकपूर व पांडुरंगपूर या शब्दांपासून पंढरपूर शब्दाची व्युत्पत्ती झाल्याचे म्हटले आहे. पंढरपूर क्षेत्राचे माहात्म्य सांगणारा पंढरी माहात्म नामक एक संस्कृत ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्कंद पुराणाचा भाग आल्याचे मानले जाते. यात वर्णन केल्याप्रमाणे पौंडरीक नावाचे क्षेत्र आणि तीर्थ आहे. त्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ देव पांडुरंग मूर्तिरूपात आहे. हे क्षेत्र अर्ध योजन लांब आहे. त्याची रुंदी ‘तदर्ध’ म्हणजे एक कोस आहे.

Pandharpur: Ashadhi Ekadashi 2024
पंढरपूर (सौजन्य: इंडियन एक्स्प्रेस)

पुराभिलेखीय पुरावा

पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायाचे आद्यपीठ मानतात. या क्षेत्राचा प्राचीन उल्लेख इसवी सन ५१६ च्या ताम्रपटात ‘पांडरंगपल्ली’ या नावाने आलेला आहे. हा ताम्रपट ‘अविधेय’ राजाने कोरवून घेतलेला आहे. त्यात जयद्विठ्ठ नावाच्या ब्राह्मणाला शंभुमहादेवाच्या डोंगराच्या पूर्वेस असलेल्या पाच गावांचे दान दिल्याचा उल्लेख आढळतो. पांडरंगपल्ली ताम्रपटात असे नमूद केले आहे की हे स्थळ अनेवती नदीच्या काठावर वसलेले आहे, अनेवती नदी ही पंढरपूर येथील एक लहान नदी आहे, जी गोपाळपूरजवळ भीमा नदीला मिळते. या ठिकाणी विष्णुपद नावाने ओळखले जाणारे वैष्णव देवस्थान आहे. या प्राचीन मंदिरात विष्णू मूर्ती नाही. मूर्तीच्या जागी फक्त दगडावर कोरलेले विष्णूचे पदचिन्ह होते. ही परंपरा इसवी सनाच्या प्रारंभिक शतकातील आहे, या कालखंडात हिंदू धर्मात मूर्तीपूजा अस्तित्वात नव्हती (ठोसर, २००४). ही वस्तुस्थिती समजून घेतल्यास पंढरपूरजवळील गोपाळपूर हे संपूर्ण दख्खनमधील सर्वात जुने वैष्णव आसन मानावे लागते. यावरून असे दिसून येते की, प्राचीन काळापासून पंढरपूर हे महाराष्ट्रातील वैष्णवांचे केंद्र होते. या दृष्टीने पंढरपूरचे त्याचे फागनिपूर हे नाव वेधक आहे. फागिनी हे बिहारमधील गयाचे प्राचीन नाव आहे. गया हे फागिनी किंवा फाल्गुनी नदीवर वसलेले होते. आजही गया हे उत्तरेकडील वैष्णवांचे प्रमुख केंद्र मानले जाते. पंढरपूर येथील विष्णुपद बहुधा बिहारमधील गया येथील विष्णुपद मंदिराच्या अनुकरणाने या ठिकाणी स्थापित केले गेले असावे. हे बहुधा हिंदू धर्माचे आद्य प्रमुख केंद्र मानले गेले होते, त्याचा उल्लेख पांडरंगपल्ली ताम्रपटात `सनातन धर्म’ म्हणून केला आहे. योगायोगाने हा सनातन धर्माचा सर्वात जुना उल्लेख आहे, जे सध्याच्या हिंदू धर्माचे सर्वात जुने नाव आहे. कला इतिहासकारांनी विठ्ठलाच्या आद्य मूर्तीच्या लक्षणावरून या क्षेत्राचा संभाव्य कालखंड इसवी सन चौथे शतक म्हणून नमूद केला आहे (ठोसर, २००४) .

File photo of lakhs of Warkaris crossing the Dive ghat near Saswad along with Sant Dnyaneshwer Palkhi during the month-long annual Pandharpur pilgrimage. (Express photo by Arul Horizon)
पंढरपूर यात्रा: सासवडजवळील दिवे घाट ओलांडणारे लाखो वारकरी (एक्स्प्रेस फोटो:अरुल होरायझन)

११ व्या शतकानंतर, या ठिकाणाचे नाव अनेक कन्नड आणि संस्कृत-मराठी शिलालेखांमध्ये आढळते. कन्नड शिलालेखांमध्ये या क्षेत्राला पंडरिग्गे असे संबोधले गेले आहे तर संस्कृत आणि मराठी शिलालेखांमध्ये पंढरीपुरा, फगिनीपुरा आणि पंढरपुरा अशी विविधता नामाभिधानात आढळते. यावरून असे दिसून येते की इसवी सन ५ व्या ते १० व्या शतकादरम्यान या क्षेत्राला केवळ शिक्षण व विद्येचे माहेरघर स्थान म्हणून महत्त्व होते. हळूहळू कालांतराने हे स्थळ परिवर्तित होऊन पवित्र विष्णूचे तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झाले (ठोसर, २००४). डेक्कन कॉलेज, पुणे यांनी पंढरपूर येथे केलेल्या उत्खननात या ठिकाणी ताम्रपाषाणयुगीन कालखंडाचे पुरावे सापडले आहे (माटे आणि ढवळीकर, १९६७). शके ११११ (इसवी सन ११८९) मधील शिलालेखात जो कोणी मंदिराला पीडा देईल, त्याला विठ्ठलाची आण घातली आहे. यातूनच ११ व्या शतकात विठ्ठल मंदिर अस्तित्त्वात असल्याचा पुरावा सापडतो. गावाचा आणि देवाचा उल्लेख असलेला यानंतरचा शिलालेख शके ११५९ (इसवी सन १२३६) मधला असून हा लेख मंदिरात सोळखांबी मंडपात आहे. हा शिलालेख संस्कृत-कानडी अशा मिश्र भाषेत आहे. या लेखात वीर सोमेश्वर (होयसळ वंश) याने विठ्ठलाच्या अंग भोगासाठी आसंदिनाडामधील हिरिय गरंज गाव दान केल्याचे नमूद केले आहे आणि देवाला श्री विठ्ठल असे म्हटले आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे पांडरंगपल्लीचा उल्लेख ‘राष्ट्रकूट अविधेयच्या ताम्रपटात आहे, या राजाने इसवी सन ५ व्या शतकात दक्षिण महाराष्ट्रावर राज्य केले. तसेच या स्थळाचा उल्लेख पांडरंगवल्ली म्हणून पुलकेशी पहिला याच्या ब्रिटिश म्युझियममध्ये असलेल्या ताम्रपट आहे. याशिवाय विठ्ठल मंदिराबाहेर संत चोखामेळा यांच्या समाधी जवळ एक शिलालेख आहे. त्याचा काळ शके १२३३ (इसवी सन १३११) असा आहे. या लेखाची भाषा मराठी आहे. त्यात पंढरपूरला पंढरिपुर व विठ्ठलाला विठ्ठल किंवा विठल असे उभय पद्धतीने संबोधले आहे (ठोसर, २००४).

अधिक वाचा: चातुर्मास: सूर्याच्या उपासनेचा भारतीय उपखंडातील इतिहास!

पौराणिक आणि मध्ययुगीन संदर्भ:

या क्षेत्राचा उल्लेख पद्मपुराणात देखील आढळतो. पैठण येथे जानश्रुती नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने ब्रह्मवादी रैक्वाचा शोध घेण्यासाठी आपल्या सारथ्याला पाठवले होते. तो अनेक क्षेत्रे धुंडाळीत पंढरपूरला आला. त्याने इथल्या द्विभुज विठ्ठलाला भेट दिली. हेमाद्रीच्या चातुर्वर्गचिंतामणीच्या तीर्थखंडात पंढरपूरचा उल्लेख आहे. तिथे पंढरपुराला पौंडरीक व विठ्ठलाला पांडुरंग असे म्हटले आहे. याच सुमारास चौंडरस नावाचा दक्षिण भारतीय कवी होऊन गेला. त्याने अभिनव दशकुमार चरिते या ग्रंथात पंढरपूर आणि तिथले विठ्ठलाचे मंदिर, त्यातील गरुड, गणपती, क्षेत्रपाल इत्यादींचे वर्णन केलेले आहे. महाराष्ट्रनिर्मित संत साहित्यात पंढरपूरचा महिमा अनेक पद्धतीने वर्णिला आहे. आतापर्यंतच्या शिलालेखीय व वाङ्मयीन पुराव्यांच्या आधारे असे दिसते, की पंढरपूरची प्राचीनता इसवी सन ६ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मागे जाते.

संदर्भ/References

मराठी संदर्भ

खरे ग. ह. श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, पुणे, १९६३.
जोशी, महादेव,(संपा) भारतीय संस्कृतिकोश, खंड ५, पुणे, १९६८ (२०१६)
भागवत, दुर्गा. लोकसाहित्याची रूपरेखा, पुणे, १९७७.
ढेरे, रा. चिं. श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पुणे, १९८४.

इंग्रजी संदर्भ:

Mate, M. S., and M. K. Dhavalikar. “PANDHARPUR EXCAVATION : 1968-A REPORT.” Bulletin of the Deccan College Research Institute, vol. 29, no. 1/4, 1968, pp. 76–117.
Thosar H.S., Historical Geography of Maharashtra and Goa, Epigraphical Society of India, Mysore, 2004.