IPL 2025 Mumbai Indians talent scout: दोन लढतीत दोन पराभव पदरी पडलेल्या मुंबई इंडियन्स संघाने सोमवारी वानखेडेच्या मैदानावर अश्वनी कुमार या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संधी द्यायचं ठरवलं. शेर-ए-पंजाब स्पर्धेदरम्यान अश्विनीचा खेळ मुंबईच्या टॅलेंट स्काऊट्सनी पाहिला होता. अश्विन डोमेस्टिक क्रिकेट फारसं खेळलेला नाही पण त्याच्या कौशल्यावर मुंबईने विश्वास ठेवला. लिलावात त्याला ३० लाख रुपये खर्चून मुंबईने संघात सामील केलं. सोमवारी पदार्पणात ४ विकेट्स पटकावत अश्वनीने संघाचा विश्वास सार्थ ठरवला. पदार्पणात चार विकेट्स पटकावणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

चेन्नईविरुद्धच्या सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने विघ्नेश पुथ्थूर नावाच्या युवा शिलेदाराला रिंगणात उतरवलं. त्या क्षणापर्यंत विघ्नेशचं नावही कुणी ऐकलं नव्हतं. मात्र मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने पुरेपूर विचार करून विघ्नेशला संधी दिली. चेन्नईसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध दडपण न घेता पुथ्थूरने भेदक मारा केला. पुथ्थूरने चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुड्डा यांना बाद करत संघाचा विश्वास सार्थ ठरवला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी२० लीग स्पर्धेत मुंबईच्या मालकीचा संघ आहे. विघ्नेशला तयारीचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आलं होतं. त्याचाही त्याला फायदा झाला.

टॅलेंट स्काऊट काय करतात?

आपल्या देशाचं आकारमान प्रचंड आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ३८ संघ खेळतात. याव्यतिरिक्त वयोगट स्पर्धा होतात. आयपीएलच्या धर्तीवर असंख्य ठिकाणी राज्यस्तरीय तसंच जिल्हा-तालुका स्तरावर टी२० लीग सुरू झाल्या आहेत. टॅलेंट स्काऊट या स्पर्धांना उपस्थित राहतात. अनेक सामने पाहतात. ज्या खेळाडूंचं कौशल्य भावतं त्यांचा खेळ सातत्याने पाहतात. स्थानिक प्रशिक्षक, क्युरेटर, जाणते पत्रकार यांच्याशी चर्चा करतात. एखादा खेळाडू दडपणाच्या क्षणी कसं खेळतो, माणूस म्हणून कसा आहे, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे हे पाहतात. संघाला कशा प्रकारच्या खेळाडूची आवश्यकता आहे हे त्यांच्या डोक्यात असतं. बहुतांश निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूची माहिती संघव्यवस्थापनाला दिली जाते. त्यानंतर या खेळाडूला ट्रायलसाठी बोलावलं जातं. टॅलेंट स्काऊट देशभर फिरत राहतात. त्यांनी शिफारस केलेल्या प्रत्येक खेळाडूला संधी मिळतेच असं नाही पण त्यांचं काम सुरू राहतं. टॅलेंट स्काऊट हे काम प्रामुख्याने माजी खेळाडू करतात. त्यांना खेळण्याचा अनुभव असतो. अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनात खेळतात. निवडसमिती सदस्य म्हणूनही काम केलेलं असतं. संघटक-पदाधिकारी म्हणून काम करताना खेळाडूंचा अभ्यास झालेला असतो. किरण मोरे, जॉन राईट, विनय कुमार, पार्थिव पटेल यांनी मुंबई इंडियन्ससाठी टॅलेंट स्काऊट म्हणून काम केलं आहे.

कोणत्या स्पर्धा प्रामुख्याने महत्त्वाच्या मानल्या जातात?

सय्यद मुश्ताक अली ही देशातली सगळ्यात मोठी टी२० स्पर्धा आहे. देशभरात या स्पर्धेचे सामने होतात. या सामन्यांना विविध आयपीएल संघांचे टॅलेंट स्काऊट उपस्थित असतात. या स्पर्धेत दमदार कामगिरी करून आयपीएल संघांचं लक्ष वेधण्याचा खेळाडूंचाही प्रयत्न असतो. या स्पर्धेच्या बरोबरीने तामिळनाडू प्रीमिअर लीग, आंध्र प्रदेश प्रीमिअर लीग, शेरे पंजाब स्पर्धा, केरळ टी२० लीग, उत्तर प्रदेश प्रीमिअर लीग, मध्य प्रदेश प्रीमिअर लीग, कर्नाटक प्रीमिअर लीग, दिल्ली प्रीमिअर लीग अशा लीगकडे बारीक लक्ष असतं. देशांतर्गत स्पर्धांच्या बरोबरीने जगभरात होणाऱ्या टी२० लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा अभ्यास केला जातो. भारतीय वातावरणात फिरकी आक्रमणाचा सामना करू शकतील अशा फलंदाजांना प्राधान्य दिलं जातं. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांवर बारीक लक्ष असतं.

कोणत्या संघांकडे टॅलेंट स्काऊटची फळी आहे?

मुंबई इंडियन्स संघाने टॅलेंट स्काऊटला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. आयपीएल स्पर्धा मार्च ते मे अशी दोनच महिने चालते पण त्यांचे टॅलेंट स्काऊट वर्षभर काम करत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यात खेळणाऱ्या खेळाडूंना हेरणं हे काम अवघड आहे. यंदाच्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात न्यूझीलंडच्या बेव्हॉन जेकब्जचं नाव समोर आलं. मुंबई इंडियन्सने अतिशय त्वरेने त्याला ताफ्यात सामील केलं. न्यूझीलंडमधल्या स्थानिक टी२० स्पर्धेत बेव्हॉनची फलंदाजी मुंबईच्या कोचिंग टीमचा भाग असलेल्या मिचेल मक्लेघान यांनी पाहिली होती. त्यांनीच बेव्हॉनच्या नावाची शिफारस संघव्यवस्थापनाला करण्यात आली. याच धर्तीवर अफगाणिस्तानचा अलाह गनफझर आणि झारखंडच्या रॉबिन मिन्झ यांनाही मुंबईच्या टॅलेंट स्काऊटने हेरलं होतं. मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाचे संघ दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि युएईतील टी२० लीग स्पर्धेत खेळतात. गनफझरला मुंबईचे जुनेजाणते प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनी हेरलं. उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेत तिलक वर्माने गनफझरचा सामना केला. त्याचे चेंडू टिपणं कठीण असल्याचं तिलक वर्माने संघव्यवस्थापनाला सांगितलं. या दोघांच्या सूचना-शिफारसीनंतर मुंबई इंडियन्सने मोठी बोली लावून गनफझरला संघात समाविष्ट केलं. योगायोग म्हणजे तिलक वर्मा हाही मुंबईच्या टॅलेंट स्काऊटच्या तालमीतूनच मिळालेला खेळाडू आहे. मुंबई इंडियन्स संघाचं नवी मुंबईत स्वत:चं मैदान आहे. याठिकाणी निवासाचीही व्यवस्था आहे. अतिशय सुसज्ज असं रुग्णालय खेळाडूंसाठी उपलब्ध असतं.

मुंबईव्यतिरिक्त चेन्नई, कोलकाता अशा संघांच्या अकादमी आहेत. या अकादमीत खेळणाऱ्या मुलांकडे संघव्यवस्थापनाचं लक्ष असतं. संघाच्या बरोबर नेट बॉलर असतात. फलंदाजांच्या सरावावेळी ते गोलंदाजी करतात. नेट बॉलर चांगली गोलंदाजी करत असतील तर त्यांनाच संधी मिळते. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास नेट बॉलरचा प्राधान्याने विचार होतो.

जसप्रीत बुमराहची अशीच झाली होती निवड

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट हे अतिशय निष्णात टॅलेंट स्काऊट मानले जातात. मुंबई इंडियन्सचे टॅलेंट स्काऊट म्हणून काम पाहत असताना ते एका स्पर्धेसाठी बडोदा इथे गेले होते. त्या स्पर्धेदरम्यान त्यांनी जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करताना पाहिलं. विचित्र अॅक्शन असलेल्या या गोलंदाजाने त्यांना प्रभावित केलं. त्यांनी बुमराहचा खेळ बारकाईने पाहिला आणि तातडीने संघव्यवस्थापनाला याची कल्पना दिली. बुमराहला ट्रायल्ससाठी बोलावण्यात आलं. बुमराहची अॅक्शन, वेग, अचूकता हे सगळं प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरू शकतं याचा अंदाज प्रशिक्षकांना आला. बुमराहला ताफ्यात समाविष्ट करावं असं कोअर टीमला सांगण्यात आलं. लिलावात मुंबई इंडियन्सने अहमहमिकेने बुमराहला लिलावात आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं होतं. बुमराह मुंबई इंडियन्स असं अँकरने घोषित करताच संघाच्या मालक नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे. बुमराहने पहिल्या हंगामातच आपली छाप उमटवली. विराट कोहली ही त्याची पहिली विकेट होती. सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या बळावर बुमराहने भारतीय संघात स्थान पटकावलं. आजच्या घडीला टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात बुमराह फलंदाजांसाठी कर्दनकाळ मानला जातो.