-प्रशांत केणी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला शनिवारी श्रीलंका-अफगाणिस्तान लढतीने प्रारंभ होत असला तरी रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने भारताच्या मोहिमेला प्रारंभ होईल. या स्पर्धेत सर्वाधिक जेतेपदे खात्यावर असलेल्या भारताला दावेदार मानले जात असले तरी ट्वेन्टी-२० प्रकारात पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांच्याविषयी अंदाज बांधता येणार नाही. त्यामुळेच आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने आशियाई संघांना या स्पर्धेत ताकद आजमावण्याची संधी मिळेल. या स्पर्धेत भारताला जेतेपदाची कितपत संधी असेल, भारत-पाकिस्तान द्वंद्व कोण जिंकेल, कोणत्या भारतीय खेळाडूंना कामगिरी सिद्ध करण्याचे आव्हान असेल, आदी प्रश्नांचा घेतलेला वेध.

अशिया चषक जेतेपदावर कुणाचा दावा असेल?

आशिया चषक स्पर्धेवर आतापर्यंत १४पैकी सर्वाधिक ७ वेळा भारताने वर्चस्व गाजवले आहे. याशिवाय श्रीलंकेने ५ वेळा आणि पाकिस्तानने २ वेळा जेतेपद पटकावले. बांगलादेशने ३ वेळा अंतिम फेरी गाठूनही अद्याप एकदाही ही स्पर्धा जिंकलेली नाही. २०१८मध्ये संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या याआधीच्या अशिया चषक (५० षटकांच्या) स्पर्धेत अखेरच्या चेंडूवर भारताने बांगलादेशवर तीन गडी राखून निसटता विजय मिळवला होता. त्यावेळी केदार जाधवने लेगबायद्वारे काढलेली एक धाव भारतासाठी निर्णायक ठरली होती. यंदाच्या स्पर्धेच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार, अ-गटात भारत, पाकिस्तान, हाँगकांगचा आणि ब-गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेचा समावेश आहे. साखळी सामन्यांनंतर प्रत्येक गटातून दोन अव्वल संघ दुसऱ्या फेरीसाठी (सुपर फोर) पात्र ठरतील. त्यामुळे अ-गटातून भारत, पाकिस्तान यांची आगेकूच निश्चित असली, तरी ब-गटातून दुसरी फेरी गाठणारे दोन संघ कोणते, हे सांगणे कठीण आहे.

आशिया चषक स्पर्धा यंदा कुठे आणि होते आहे? ट्वेन्टी-२० प्रकारात ही स्पर्धा का खेळवण्यात येत आहे?

श्रीलंकेला आशिया चषकाचे यजमानपद देण्यात आले होते. परंतु २०२०मध्ये करोनामुळे ही स्पर्धा लांबणीवर पडली. मग श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक अराजकतेमुळे श्रीलंकेऐवजी संयुक्त अरब अमिरातीला यजमानपद बहाल करण्यात आले. आशिया चषक स्पर्धा ही एकदिवसीय प्रकाराची म्हणजेच ५० षटकांची खेळवण्यात येते. परंतु ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ती ट्वेन्टी-२० प्रकाराची खेळवण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेने घेतला. याआधी याच कारणास्तव २०१६मध्ये आशिया चषक स्पर्धा ट्वेन्टी-२० प्रकाराची खेळवण्यात आली होती.

भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीत कोणाचे पारडे जड असेल?

दुबई क्रिकेट स्टेडियमवर रविवारी, २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीकडे क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. २००९मध्ये कराचीत श्रीलंकेच्या संघावर झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये अन्य देशांच्या संघांनी क्रिकेट सामन्यांस बहिष्कार घातला होता. त्यामुळे गेली काही वर्षे संयुक्त अरब अमिराती हेच त्यांचे गृहमैदान होते. याच मैदानावर गतवर्षी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० गडी राखून दणदणीत विजयाची नोंद केली होती. या सामन्यात विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. परंतु पाकिस्तानकडून सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी १५२ धावांची विक्रमी भागीदारी करीत संघाला विजय मिळवून दिला होता. ट्वेन्टी-२० प्रकारांत पाकिस्तानचा संघ बलाढ्य मानला जातो. पण एकंदर ट्वेन्टी-२० सामन्यांचा आढावा घेतल्यास नऊ सामन्यांपैकी भारताने सात आणि पाकिस्तानने फक्त दोन सामन्यांत विजय मिळवले आहेत. हेच भारताच्या पथ्यावर पडू शकते. याचप्रमाणे पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या शाहीनशाह आफ्रिदीची अनुपस्थितीसुद्धा भारतासाठी अनुकूल ठरू शकते. याच शाहीनने भारताच्या आघाडीच्या फळीला नेस्तनाबूत करीत पाकिस्तानला सामन्यावर नियंत्रण मिळवून दिले होते. आशिया चषक स्पर्धेत (५० आणि २० षटकांच्या) भारत-पाकिस्तान यांच्यात १४ सामने झाले. यापैकी भारताने आठ, तर पाकिस्तानने पाच सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित ठरला होता. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतही भारताचे वर्चस्व दिसून आलेले आहे.

जेतेपदासाठी पुन्हा भारत-पाकिस्तान लढत होऊ शकते का?

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. त्यामुळे याबाबत भाष्य करता येणे कठीण आहे. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान हेच संघ सर्वोत्तम दोन संघ म्हणता येतील. म्हणून शक्यता नाकारता येत नाही. पण आशिया चषक स्पर्धेच्या गेल्या ३८ वर्षांच्या इतिहासातील १४ स्पर्धांमध्ये हे परंपरागत प्रतिस्पर्धी कधीही अंतिम फेरीत लढले नसल्याचे सिद्ध होते.

कोणत्या भारतीय खेळाडूंना कामगिरी सिद्ध करण्यासाठी ही अखेरची संधी असेल?

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची बांधणी केली जात आहे. या दृष्टीने माजी कर्णधार विराट कोहली, ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक यांना कामगिरी सिद्ध करण्याची ही अखेरची संधी असेल. धावांसाठी झगडणाऱ्या विराटची फलंदाजी हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. गेली तीन वर्षे ३३ वर्षीय कोहली कारकीर्दीतील ७१व्या शतकासाठी झगडत आहे. यंदाच्या ‘आयपीएल’मध्येही कोहलीने (१६ सामन्यांत ३४१ धावा) अपेक्षित कामगिरी साकारली नव्हती. कोहली फक्त इंग्लंडमध्ये दोन ट्वेन्टी-२० सामने खेळला. परंतु दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे कामगिरी दाखवण्याचे सर्वाधिक दडपण कोहलीवर असेल. यजुवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांचे संघातील स्थान निश्चित मानले जात असताना रवी बिश्नोईचा नवा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ३४ वर्षीय अश्विनचे स्थान धोक्यात आले आहे. विंडीजमधील ट्वेन्टी मालिकेत अश्विनला फक्त तीन बळी मिळाले होते. ‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुसाठी विजयवीर म्हणजेच ‘फिनिशर’ म्हणून यशस्वी ठरणाऱ्या कार्तिकला भारतासाठी ही भूमिका बजावण्यात अपयश आले. आयर्लंड, इंग्लंड आणि विंडीजविरुद्धच्या आठ सामन्यांमध्ये त्याने ०, ११, १२, ६, ४१, ७, ६, १२ अशा धावा केल्या आहेत. यापैकी फक्त विंडीजविरुद्ध त्याला ४१ धावांची अपेक्षित खेळी साकरता आली होती. हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत हे अन्य दोन विजयवीर संघात असल्यामुळे ३७ वर्षीय कार्तिकला अपेक्षेनुसार कामगिरी उंचावावी लागणार आहे.

भारतीय संघाविषयी…

जसप्रीत बुमरा आणि माेहम्मद शमी वगळता सर्वच महत्त्वाचे खेळाडू आशिया चषकात भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. नियमित कर्णधार रोहित शर्मा, दुखापतीतून सावरलेला उपकर्णधार केएल राहुल आणि माजी कर्णधार कोहली या त्रिकुटावर भारताच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त असेल. ट्वेन्टी-२० प्रकारात छाप पाडणारा आणि शतक नोंदवणारा सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडेही आशेने पाहिले जात आहे. ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा सामन्याचे चित्र पालटण्यात वाकबदार आहेत. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान आणि हार्दिक वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. तसेच अश्विन, यजुर्वेंद्र, जडेजा, बिश्नोई हे फिरकी गोलंदाज संघात आहेत.

गेल्या काही महिन्यांमधील वारंवार संघबदलाचा भारताच्या कामगिरीवर परिणाम होईल का?

२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर प्रथमच भारतीय संघात बरेचसे तारांकित खेळाडू दिसत आहेत. अन्यथा कोहली, राहुल, रोहित, जडेजा, हार्दिक यांच्यासह अनेक खेळाडूंना अधूनमधून विश्रांती देत संघात अस्थैर्य ठेवले आहे. सलामी, मधली फळी आणि गोलंदाजीचे अनेक पर्याय हाताळताना नेतृत्वाचेही अनेक पर्याय आजमावण्यात आले. याचा फटका भारताला बसू शकतो. २००७मध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर गेल्या १५ वर्षांत भारताला ही स्पर्धा पुन्हा जिंकता आलेली नाही. मागील विश्वचषकात भारताला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले होते. आगामी विश्वचषक स्पर्धा १६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. येत्या दीड महिन्यांत तरी स्थिर संघ देण्याची नितांत आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 with one eye on t20 world cup sub continental giants resume rivalry india chances print exp scsg