Aspirin Colon Cancer Prevention : जगभरात कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. दर पाचपैकी एका व्यक्तीला कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कर्करोगावर लवकरात लवकर मात करता यावी यासाठी वैज्ञानिकांकडून संशोधन सुरू आहे. यादरम्यान, कर्करोगाच्या रुग्णांसाठी आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. स्वस्त दरात आणि सहज उपलब्ध होणारी अ‍ॅस्पिरिन ही वेदनाशामक गोळी कर्करोगाचा प्रसार रोखण्यास मदत करू शकते, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. अभ्यासात नेमकं काय म्हटलंय, ते जाणून घेऊ.

संशोधकांनी नेमकं काय म्हटलं?

कर्करोगाचा प्रसार कसा रोखता येईल यावर केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी नुकतंच एक नवीन संशोधन केलं. त्यातून असं समोर आलं की, अ‍ॅस्पिरिन ही वेदनेपासून आराम देणारी गोळी शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवते, ज्यामुळे कर्करोगाशी लढण्यास मदत होते. मात्र, अ‍ॅस्पिरिन हा कर्करोगावर प्रभावी उपचार नाही. या औषधाच्या अतिसेवनानं रक्तस्राव होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अ‍ॅस्पिरिन घेणं टाळलं पाहिजे, असंही संशोधकांनी सांगितलं आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वीच्या अभ्यासातही संशोधकांना कर्करोग नियंत्रित ठेवण्यासाठीच्या उपचारात अ‍ॅस्पिरिनचा वापर प्रभावी ठरत असल्याचं सांगितलं होतं.

कर्करोगावर अ‍ॅस्पिरिन कितपत प्रभावी?

दशकभरापूर्वी संशोधकांनी केलेल्या संशोधनात असं आढळून आलं होतं की, दररोज अ‍ॅस्पिरिन घेणाऱ्या लोकांना कर्करोगाची लागण होण्याची शक्यता खूपच कमी होती. मात्र, अ‍ॅस्पिरिन कर्करोगावर कशी प्रभावी ठरते यामागची कारणं जुन्या अभ्यासात नमूद करण्यात आलेली नव्हती. आता ‘नेचर जर्नल’मध्येही नुकत्याच प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासात कर्करोगाचं नियंत्रण आणि अॅरिस्पनचा वापर या संबंधामागील संभाव्य कारणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अभ्यासात असं नमूद करण्यात आलंय की, जेव्हा कर्करोगाच्या पेशी मुख्य ट्यूमरपासून वेगळ्या होऊन, शरीराच्या इतर भागांत पसरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा अ‍ॅस्पिरिन ही प्रक्रिया रोखण्यास मदत करते.

आणखी वाचा : पाकिस्तानला चीनकडून मिळाली आधुनिक पाणबुडी; भारतासमोर कोणकोणती आव्हानं?

अ‍ॅस्पिरिन कर्करोगावर मात करते का?

कर्करोगाचा संपूर्ण शरीरात प्रसार करणाऱ्या या प्रक्रियेला मेटास्टेसिस, असं म्हणतात. मेटास्टेसिसमुळे मृत्यूचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो. या संसर्गाला रोखण्यात रोगप्रतिकार शक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. टी-पेशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी कर्करोगाच्या पेशी ओळखू शकतात आणि त्या पसरण्यापूर्वी त्यांचा नाश करण्यास मदत करतात. प्राध्यापक राहुल रॉय चौधरी यांच्या मते, अ‍ॅस्पिरिन कर्करोगाविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करते. त्यामुळे संबंधित रुग्णाच्या शरीरातील ‘मेटास्टेसिस’ रोखण्यास मदत होते.

अ‍ॅस्पिरिनचं अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक

कर्करोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा शोध उत्साहवर्धक असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अ‍ॅस्पिरिन घेणं धोकादायक ठरू शकतं, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे. अ‍ॅस्पिरिनचे जास्त सेवन केल्यानं शरीरात रक्तस्राव आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठाचे प्राध्यापक मंगेश थोरात म्हणतात की, या अभ्यासामुळे कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा सापडला आहे; परंतु अनेक प्रश्नांची उत्तरं अद्यापही मिळालेली नाहीत.

अ‍ॅस्पिरिनमुळे कर्करोगाचा प्रसार थांबतो?

कर्करोगानं ग्रस्त असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करून, त्याचा ट्यूमर बाहेर काढला जातो. त्यामुळे या आजारातून बरे होण्यास त्याला काही दिवस लागतात. या काळात त्याच्यासाठी अ‍ॅस्पिरिन ही गोळी जास्त प्रभावी ठरू शकते, असं संशोधकांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, कर्करोगावरील संपूर्ण यशस्वी शस्त्रक्रियेनंतरही काही रुग्णांच्या शरीरात हळूहळू ट्यूमर पुन्हा पसरू लागतो. या प्रक्रियेला ‘सीडिंग’, असं म्हटलं जातं. त्यामुळे एकदा शस्त्रक्रिया करूनही रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही. अशा वेळी संबंधित रुग्णानं अ‍ॅस्पिरिनचं सेवन केल्यास, त्याच्या शरीरात ट्यूमरचा पसरण्याचा धोका कमी होतो.

केंब्रिज विद्यापीठातील संशोधक काय म्हणाले?

दरम्यान, केंब्रिज विद्यापीठातील पॅथॉलॉजी विभागातील डॉ. जी यांग, यांनी या संशोधनाचं नेतृत्व केलं. त्यांनी नवीन संशोधनाला कर्करोगावरील उपचारपद्धतीचा महत्त्वाचा दुवा म्हणून संबोधलं आहे. “हा एक पूर्णपणे अनपेक्षित निष्कर्ष होता. या संशोधनानं आम्हाला अशा एका वेगळ्या तपास मार्गावर नेलं, ज्याची आम्ही कधी कल्पनाही केलेली नव्हती. यापूर्वी आम्हाला अ‍ॅस्पिरिनच्या अँटी-मेटास्टॅटिक क्रियाकलाप समजून घेण्यासाठी वेळ लागला. मात्र, अभ्यासानंतर असं दिसून आलं की, कर्करोगाचा शरीरातील प्रसार रोखण्यासाठी अ‍ॅस्पिरिन प्रभावी उपाय आहे. ज्याला खर्चही खूप कमी येतो,” असंही डॉ. यांग म्हणाले.

हेही वाचा : समुद्रात ‘तो’ तीन महिने भरकटला, पक्षी आणि झुरळं खाऊन कसा वाचवला जीव?

कर्करोगग्रस्तांसाठी अ‍ॅस्पिरिन फायदेशीर आहे का?

कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी दररोज अ‍ॅस्पिरिनचं सेवन करणं फायदेशीर ठरेल का, असा प्रश्न काहींनी अभ्यासानंतर विचारला. त्यावर संशोधकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. “जर तुम्ही कर्करोगाचे रुग्ण असाल, तर आताच तुमच्या स्थानिक फार्मसीमध्ये अ‍ॅस्पिरिन खरेदी करण्यासाठी घाई करू नका. त्याऐवजी अ‍ॅस्पिरिनच्या चालू किंवा येणाऱ्या चाचण्यांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचा विचार करा,” असे लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातील सर्जन व कर्करोग संशोधक प्रोफेसर मंगेश थोरात यांनी बीबीसीला सांगितलं. अ‍ॅस्पिरिनचं अति प्रमाणात सेवन केल्यानं शरीरात अंतर्गत रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे संबंधित व्यक्तीला स्ट्रोकही येऊ शकतो, असंही ते म्हणाले.

संशोधकांचा अभ्यास कशावर आधारित?

केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी केलेला हा अभ्यास उंदरांवर आधारित होता, ज्यामध्ये सकारात्मक परिणाम आढळून आले आहेत. मात्र, मानवावर याचा प्रयोग करणं अद्यापही बाकी आहे. त्यामुळे जोपर्यंत क्लिनिकल चाचण्या त्याची प्रभावीता सिद्ध करीत नाहीत, तोपर्यंत कर्करोगाच्या उपचारासाठी अ‍ॅस्पिरिनची शिफारस करता येणार नाही, असंही संशोधकांनी सांगितलं आहे. दरम्यान, या अनिश्चिततेचं निराकरण करण्यासाठी, यूके आणि भारतातील १० हजार कर्करोगग्रस्तांवर संशोधक अभ्यास करणार आहेत. त्यामध्ये अॅस्पिरिन खरोखरच कर्करोगाला रोखण्यात यशस्वी ठरते का हे स्पष्ट होणार आहे.

Story img Loader