Dinosaurs Demise ६.५५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून डायनासोर नामशेष झाले. हा महाविध्वंस एका अशनीमुळे झाला. ज्या अशनीमुळे डायनासोर नष्ट झाले, तो १० ते १५ किलोमीटर व्यासाचा एक भलामोठा दगड होता. या महाकाय विध्वंसाचे अनेक पुरावे आढळून आले आहेत. परंतु, हा विनाश कसा झाला? अशनी नेमका आला कुठून? यांसारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा अनेक दशकांपासून शोध सुरू आहे. यामध्ये हा धूमकेतू होता की अशनी यांसारख्या विषयांमध्ये शास्त्रज्ञांचे मतभेद राहिले आहेत. सायन्स जर्नलमध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात अशनीच्या उत्पत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. हा नवीन अभ्यास नक्की काय सांगतो? यात अशनीविषयीचे कोणते रहस्य उलगडले? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
महाकाय विध्वंस
सुमारे १८० दशलक्ष वर्षे डायनासोरांनी पृथ्वीवर राज्य केले. ज्या घटनेने डायनासोर विलुप्त झाले, त्याला शास्त्रज्ञ त्यांच्या भाषेत ‘क्रेटेशियस-पॅलेओजीन एक्सटिंशन’ घटना म्हणतात. या सामूहिक विलुप्त होण्याच्या घटनेने सर्व नॉन-एव्हियन डायनासोर (पक्षी प्रजाती नसलेले) नष्ट झाले आणि एकूणच पृथ्वीवरील तीन चतुर्थांश वनस्पती आणि प्राणी प्रजाती नष्ट झाल्या. १९८० मध्ये लुईस आणि वॉल्टर अल्वारेझ या पिता-पुत्र वैज्ञानिकांच्या जोडीने असे मत मांडले की, ही घटना १० ते १५ किलोमीटर रुंद असलेल्या एका महाकाय लघुग्रहामुळे घडली.

हेही वाचा : युक्रेनच्या आक्रमणाला ब्रिटिश रणगाड्यांची कुमक; रशियात तणाव
ही टक्कर इतकी भीषण होती की, मेक्सिकोजवळ १८० किलोमीटर रुंद असा खड्डा पडला; ज्याला आज चिक्सुलब क्रेटरच्या नावाने ओळखले जाते. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस या खड्ड्याचा शोध लागला होता. सायन्स जर्नलमध्ये गुरुवारी (१५ ऑगस्ट) प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात, गुरु ग्रहाच्या कक्षेच्या पलीकडे विनाशकारी अशनी तयार झाल्याचे भू-रासायनिक पुरावे आढळून आले आहेत. या शोधामुळे हे स्पष्ट झाले आहे की, सूर्यमालेच्या जन्मादरम्यान सुरू झालेल्या घटनांच्या साखळीचा हा परिणाम होते.

अभ्यास काय सांगतो?
जर्मनीतील कोलोन विद्यापीठातील मारियो फिशर-गॉडे यांच्या नेतृत्वाखालील भू-रसायनशास्त्रज्ञांच्या गटाने हा अभ्यास केला. त्यांनी चिक्सुलब क्रेटरच्या तीन ठिकाणांवरील नमुने गोळा केले आणि त्यांची तुलना गेल्या ३.५ अब्ज वर्षांतील इतर आठ लघुग्रह प्रभाव स्थळांवरील खडकांशी केली. क्रेटरच्या अवशेषांचे परीक्षण केल्यावर शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, रुथेनियम नावाच्या दुर्मीळ घटकाची रासायनिक रचना मंगळ आणि गुरू ग्रहाच्या कक्षेत फिरणाऱ्या अशनींसारखीच आहे. पृथ्वीच्या खडकांमध्ये रुथेनियम अत्यंत दुर्मीळ आहे, असे फिशर-गॉडे ने ‘नेचर डॉट कॉम’ला सांगितले. शिवाय, विशिष्ट रूथेनियम शास्त्रज्ञांना सूर्यमालेत हा लघुग्रह कोठून आला, हे निश्चित करण्यात मदत करू शकतो.

सूर्यमाला सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी तयार होण्यास सुरुवात झाली. रुथेनियम हा अत्यंत दुर्मीळ घटक आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, हा घटक ताऱ्यांच्या आधीच तयार झाला होता. सूर्यमाला तयार होण्यास सुरुवात झाली तेव्हा लघुग्रहांमध्ये अस्थिरतेचे प्रमाण कमी होते. हे अशनी सिलिकेट खनिजांनी समृद्ध झाले (जे पृथ्वीच्या कवचाचा ९० टक्के भाग तयार करतात). दुसरीकडे, पुढे तयार झालेले अशनी ‘कार्बोनेशियस’ ठरले; ज्यात भरपूर कार्बन आणि अस्थिर रसायने होती. फिशर-गॉडे यांच्या टीमला असे आढळून आले की, चिक्सुलब क्रेटरमध्ये आढळून आलेले रुथेनियम आतील सूर्यमालेतील सिलिकेट अशनीऐवजी बाह्य सूर्यमालेतील कार्बनी अशनीतील आहे. अशनीऐवजी धूमकेतूमुळे हा विनाश झाला, हा सिद्धांतही या निष्कर्षांनी खोडून काढला.
घटनांची प्राणघातक साखळी
अशनी पृथ्वीच्या मार्गावर नक्की कसा आला हे स्पष्ट नाही. ही एक अपवादात्मक घटना असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. फिशर-गॉडे आणि त्यांच्या टीमने अभ्यासलेले इतर बहुतेक अशनी सूर्यमालेच्या आतील भागात तयार झाले होते. संगणक सिम्युलेशनद्वारे ही घटना कशामुळे संभव झाली असावी, यासंबंधी अनेक परिस्थिती दाखविण्यात आल्या. त्यात बाह्य सौरमालिकेतील एखादी वस्तू पृथ्वीच्या दिशेने जाण्यासाठी तिच्या कक्षेतून बाहेर पडू शकते असे दिसून आले. यामागे अनेक संभाव्य कारणे असू शकतात. जसे की, अशनींवर इतर अशनी आदळणे किंवा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाद्वारे खेचले जाणे, इत्यादी.

परंतु, अशनी त्याच्या कक्षेतून बाहेर पडल्यास पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता फारच कमी असते. टेक्सासआधारित साउथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केलेल्या २०२१ च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, पृथ्वीची २५० दशलक्ष वर्षांत फक्त एकदाच मोठ्या अशनींशी (डायनासोरांचा नाश करणाऱ्या आकाराची) टक्कर होण्याची शक्यता आहे. अशी टक्कर मानवजातीच्या आयुष्यात घडण्याची शक्यता नाही. पण, अशी घटना घडल्यास ती प्राणघातक असेल. मात्र, त्याचा प्रभाव कमी असेल. जसे डायनासोरच्या काळात झालेल्या त्या घटनेमध्ये काहीच डायनासोर मारले गेले.
हेही वाचा : शेख हसीना यांचे भारतातून बांगलादेशात प्रत्यार्पण होणार? भारताच्या अडचणी वाढणार? प्रत्यार्पण म्हणजे काय?
या घटनेनंतरच्या परिणामांमुळे डायनासोरच्या अनेक प्रजाती लुप्त होत गेल्या. अशनीची टक्कर झाल्यानंतर हवेत धूळ, सल्फर यांसारखे अनेक घटक मिसळले; ज्यामुळे सूर्य काही काळ झाकला गेला. त्यामुळे सूर्यकिरणे पृथ्वीवर पडू शकली नाही आणि पृथ्वीवरील तापमान कमी झाले. परिणामी, वनस्पती आणि वनस्पतिप्लवक (फायटोप्लँक्टन) आदींमधील प्रकाशसंश्लेषण बिघडले. यामुळे परिसंस्थेत (इकोसिस्टम) मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला; ज्यामुळे केवळ अगदी थोड्याच प्रजाती पृथ्वीवर जगू शकल्या.