कोव्हिशिल्ड की कोवॅक्सिन? भारतीय बनावटीची कोणती लस अधिक सुरक्षित आहे, यावर करोना काळात अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या. सध्या त्यातील कोव्हिशिल्डची सुरक्षितता वादात अडकलेली असताना आता कोवॅक्सिनही याच कारणास्तव चर्चेत आली आहे. कोव्हिशिल्ड लसीचे क्वचित प्रसंगी मानवी शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात, अशी कबुली अॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले. ही लस आता संपूर्ण जगभरातून मागे घेण्यात आली आहे. अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ व सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून तयार केलेल्या या लसीनंतर आता भारत बायोटेकची निर्मिती असलेल्या कोवॅक्सिनची सुरक्षितताही वादात अडकली आहे. कोवॅक्सिन लस घेतल्यामुळेही मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.
कोव्हिशिल्ड लस दुष्परिणामांमुळे मागे घ्यावी लागली? ॲस्ट्राझेनेका म्हणते मागणीपेक्षा साठा अधिक!
कोवॅक्सिनबाबतचा अभ्यास काय सांगतो?
स्प्रिंगरलिंक या संशोधन संस्थेने भारत बायोटेकने तयार केलेल्या कोवॅक्सिन लसीचा मानवी शरीरावर होणारा परिणाम अभ्यासला आहे. किशोरवयीन मुले आणि ज्यांना आधीपासूनच ॲलर्जीची समस्या आहे, अशा व्यक्तींना AESI चा धोका अधिक आहे, असे या अभ्यासात आढळून आले आहे. AESI म्हणजे Adverse Events Of Special Interest म्हणजे लस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरावर अगदीच खोलवर परिणाम करणारे दुष्परिणाम दिसू लागतात. एखादी नवी लस बाजारात आणण्यापूर्वी तिची वैद्यकीय चाचणी घेत असताना अशाच शरीरावर खोल परिणाम करणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास बारकाईने करण्यात येतो. कोणतीही लस अधिक सुरक्षित असण्यासाठी अशा प्रकारचे AESI दुष्परिणाम न उद्भवणे गरजेचे असते. त्यासाठीची खबरदारी लसनिर्मिती करणारी संस्था घेत असते. मात्र, नेमके हेच कोवॅक्सिनबाबत घडताना दिसते आहे. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये डॉ. सांखा शुभ्रा चक्रवर्ती आणि त्यांच्या टीमने मिळून हा अभ्यास केला आहे. त्यांनी ज्या लोकांवर वर्षभर अभ्यास केला, त्या लोकांमध्ये AESI चे दुष्परिणाम आढळलेले लोक अधिक प्रमाणात सापडले आहेत.
करोना विषाणू आजही अस्तित्वात; मग त्याचा धोका कमी होऊन संक्रमितांची संख्या कशी घटली?
कोवॅक्सिन लसीमुळे कोणते प्रतिकूल परिणाम आढळले आहेत?
या संशोधनामध्ये १०२४ व्यक्तींवर वर्षभर अभ्यास करण्यात आला. त्यातील ६३५ किशोरवयीन होते; तर २९१ प्रौढ होते. या १०२४ व्यक्तींपैकी ३०४ किशोरवयीन (४७.९ टक्के); तर १२४ प्रौढ व्यक्तींमध्ये (४२.६ टक्के) श्वसनमार्गामधील संक्रमणाची समस्या दिसून आली. किशोरवयीन व्यक्तींमध्ये त्वचेसंबंधी विकार (१०.५ टक्के), सामान्य विकार (१०.२ टक्के) व मज्जासंस्थेचे विकार (४.७ टक्के) यांचे प्रमाण सर्रासपणे आढळून आले. प्रौढ व्यक्तींमध्ये आढळलेल्या AESI दुष्परिणामांमध्ये सामान्य विकार (८.९ टक्के), स्नायू-सांधे विकार (५.८ टक्के), मज्जासंस्थेचे विकार (५.५ टक्के) यांचे प्रमाणही लक्षात घेण्याजोगे आहे.
या अभ्यासात सहभागी झालेल्या महिलांपैकी ४.६ टक्के महिलांमध्ये मासिक पाळीत अनियमितता आढळून आली. २.७ टक्के सहभागी व्यक्तींमध्ये डोळ्यांचे विकार तर ०.६ टक्का व्यक्तींमध्ये हायपरथायरॉइडिझमची समस्या आढळून आली. ०.३ टक्का व्यक्तींमध्ये गुलियन सिंड्रोम (हात-पायांमधील वेदना होण्याचा दुर्मीळ रोग) तर ०.१ टक्का व्यक्तींमध्ये मेंदूविकार आढळून आले. सहभागी व्यक्तींपैकी ज्यांना आधीपासूनच ॲलर्जीची समस्या आहे अथवा लसीकरणानंतर टायफॉइड होण्याची समस्या आहे अशा किशोरवयीन मुलांना आणि महिलांना AESI चे दुष्परिणाम आढळून येण्याचे प्रमाण अधिक दिसून आले. सहव्याधीग्रस्त असलेल्या प्रौढ व्यक्तींना AESI च्या दुष्परिणामांचा धोका दुप्पट दिसून आला.
ॲस्ट्राझेन्काकडून कोविशिल्डचे साठे माघारी; दुष्परिणामांबाबत कबुलीनंतर कंपनीचे मोठे पाऊल
या अभ्यासातून आलेले निष्कर्ष आपली चिंता वाढवतात का?
कोवॅक्सिन घेतल्यानंतर किशोरवयीन आणि प्रौढांमध्ये दिसलेले दुष्परिणाम हे इतर लसी घेतल्यानंतर दिसलेल्या दुष्परिणांपेक्षा पूर्णत: वेगळे आहेत, असे या अभ्यासातून दिसून आले आहे. यातील बहुसंख्य AESI दुष्परिणाम हे दीर्घकाळ टिकून राहणारे आहेत; त्यामुळे कोवॅक्सिन घेतलेल्या व्यक्तींवर होणारा परिणाम चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी त्यांचा अधिक काळ अभ्यास करण्याची गरज आहे, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर होणाऱ्या AESI दुष्परिणामांचा शारीरिक संबंध, सहव्याधी, लसीकरणपूर्व करोना संक्रमण आणि करोना वगळता इतर आजारांशी काय सहसबंध आहे, हे तपासण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचेही या संशोधनात म्हटले आहे.
कोव्हिशिल्डबाबत काय वाद सुरू आहे?
ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने कोव्हिशिल्ड लसीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. कोव्हिशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला होता. या याचिकेवर उत्तर देताना कंपनीने स्पष्ट केले की, कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे ‘क्वचित प्रसंगी’ आढळू शकतात. या सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेज होऊ शकते. मात्र, हे दुष्परिणाम क्वचितच आढळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजेच TSS ही एक वैद्यकीय स्थिती असून, त्यामध्ये शरीरातील प्लेटलेट्सची पातळी कमी होते आणि रक्तात गुठळ्या तयार होतात. भारतामध्ये करोनाविरोधी लस वितरित करण्यापूर्वी सरकारने जानेवारी २०२१ मध्ये एक पत्रक जाहीर करून असे म्हटले होते, “ज्या व्यक्तींना थ्रोम्बोसायटोपेनियाची समस्या आहे. त्यांना खबरदारी बाळगून ही लस दिली पाहिजे.”
भारत बायोटेकने या अभ्यासावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
या अभ्यासातून बाहेर आलेल्या निष्कर्षांवर भारत बायोटेकने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, एकीकडे अॅस्ट्राझेनेकाने आपल्या लसीचे क्वचित प्रसंगी दुष्परिणाम होऊ शकतात, हे मान्य केल्यानंतर भारत बायोटेकने असा दावा केला होता की, कोवॅक्सिन लस तयार करताना सर्वांत पहिला भर सुरक्षिततेवर देण्यात आला होता. लसीची परिणामकारकता तपासण्यासाठी भारतात चाचणी घेण्यात आलेली ही एकमेव करोनाविरोधी लस आहे, असेही त्यांनी म्हटले होते.