भविष्यात पृथ्वी कशी असेल याचे कुतूहल अंतराळ संशोधकांसह सामान्य माणसालाही असते. काही वर्षांनंतर किंवा अमूक-तमूक वर्षी पृथ्वी नष्ट होणार यासंबंधी चर्चेची गुऱ्हाळे नेहमीच रंगवली जातात. मात्र आठ अब्ज वर्षांनंतर पृथ्वी कशी असू शकेल याचा अंदाज काही खगोल संशोधकांनी बांधला आहे. त्यासाठी संशोधकांनी एका बाह्यग्रहाचा शोध लावला असून आठशे कोटी वर्षांनंतर पृथ्वी अशी असू शकेल, असा तर्क या संशोधकांनी लावला आहे. या बाह्यग्रहाचे स्वरूप काय आहे, खगोलशास्त्रज्ञांनी नेमका काय शोध लावला आहे, याबाबत…

भविष्यातील पृथ्वीसंबंधी संशोधन काय?

आठशे कोटी वर्षांनंतर पृथ्वी कशी असेल या कुतूहलापोटी खगोलशास्त्रज्ञांनी एका बाह्यग्रहाचा शोध लावला आहे. दूरवरचा ग्रह शोधून पृथ्वी भविष्यात कशी दिसू शकेल याचे अनोखे रूप मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ‘केएमटी-२०२०-बीएलजी-०४१४’ असे नाव या ग्रहाला दिले असून तो पृथ्वीपासून ४००० प्रकाशवर्षे दूर आहे. या ग्रहाचा आकार पृथ्वीपेक्षा दुप्पट असून एका श्वेतबटू ताऱ्याभोवती (व्हाइट ड्वार्फ) हा ग्रह फिरतो. मुळात हा तारा आता राहिलेला नसून त्याचे जळणारे अवशेष आहेत. पाचशे कोटी वर्षांनंतर आपला सूर्यही असाच जळणारा अवशेष होणार असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्याच्या उद्रेकानंतर जगली-तगली, तर आठशे कोटी वर्षांनंतर पृथ्वीही या बाह्यग्रहासारखी दिसेल आणि सूर्याच्या अवशेषाभोवतील फिरेल, असे खगोलतज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?

काही अब्ज वर्षांनंतर सूर्य कसा असेल?

खगोलशास्त्रज्ञांनी शोध घेतलेला ‘केएमटी-२०२०-बीएलजी-०४१४’ हा ग्रह एका जळणाऱ्या शेवतबटूभोवती फिरत आहे. हीच अवस्था पाचशे कोटी वर्षांनंतर आपल्या सूर्याचीही होईल, असे संशोधकांना अंदाज आहे. मात्र ही अवस्था होण्यापूर्वी सूर्याचे रूपांतर एका तांबूस रंगाच्या महाकाय ताऱ्यामध्ये होईल, जो आपल्या जवळच्या ग्रहांना गिळंकृत करेल. आपल्या सूर्यमालेतील बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे. रूपांतरित झालेला महाकाय सूर्य आधी बुधला गिळंकृत करेल. त्यानंतर त्याच्या भक्ष्यस्थानी शुक्र आणि मंगळही येऊ शकतो. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० किलोमीटर आहे. मात्र पृथ्वीही या महाकाय सूर्याच्या भक्ष्यस्थानी पडू शकते. पण जर सूर्याने पृथ्वीला गिळंकृत केले नाही, तर पृथ्वी ‘केएमटी-२०२०-बीएलजी-०४१४’ ग्रहासारखी असेल आणि ती या जळणाऱ्या सूर्याभोवती फिरेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला आहे.

पृथ्वी गिळंकृत होणे टाळता येईल?

सहाशे कोटी वर्षांमध्ये पृथ्वीला तांबूस रंगाच्या महाकाय सूर्याने गिळंकृत करणे टाळता येईल की नाही, यावर शास्त्रज्ञांमध्ये दुमत आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक केमिंग झांग यांच्या मते, पृथ्वी हा ग्रह अधिकाधिक १०० कोटी वर्षांसाठी राहण्यायोग्य असेल. महाकाय सूर्य गिळंकृत करण्याच्या आधी पृथ्वीवरील महासागरांची हरितगृह परिणामांमुळे वाफ होईल. प्रत्येक तारा हेलियम आणि हायड्रोजन यांचे एकत्रीकरण करून जळत राहतो. मात्र त्यातील हायड्रोजन इंधन संपल्यानंतर ते हेलियमचे मिश्रण करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे त्या ताऱ्यामध्ये ऊर्जेची प्रचंड लाट निर्माण होते आणि हे तारे त्यांच्या आकारमानापेक्षा शेकडो पटीने मोठे होतात. परिणामी ते शेजारच्या ग्रहांना गिळंकृत करतात आणि आपल्यामध्ये सामावून घेतात. कालांतराने पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्येही ही स्थिती होऊ शकते, असा शास्त्रज्ञांना अंदाज आहे. मात्र जर सूर्याने पृथ्वीला गिळंकृत केले नाही, तर नव्या सापडलेल्या ग्रहाप्रमाणे मानवरहित पृथ्वी तांबूस रंगाच्या सूर्याभोवती फिरू शकते.

हेही वाचा >>> युद्ध इराण-इस्रायलचं, पण भुर्दंड जगाला! कच्च्या तेलाचे भाव वाढले, भारतावर नेमका काय परिणाम होणार?

पृथ्वी सोडून इतरत्र जाता येईल?

सूर्याचे तांबूस रंगाच्या महाकाय ताऱ्यामध्ये रूपांतर झाल्यास पृथ्वीच्या महासागराची वाफ होऊन पृथ्वी मानवी जीवसृष्टीसाठी अनुकूल राहणार नाही. अशा वेळी मानव युरोपा आणि एन्सेलाड्स यांसारख्या चंद्रांवर स्थलांतरित होऊ शकतो. युरोपा हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूचा उपग्रह म्हणजेच चंद्र आहे. पृथ्वीच्या चंद्रापेक्षा युरोपा किंचित लहान आहे. गुरूचा नैसर्गिक उपग्रह असलेला युरोपा हा जीवसृष्टीस अनुकूल असल्याचा अंदाज नासाच्या शास्त्रज्ञांनी काही वर्षांपूर्वीच व्यक्त केला होता. अगदी मंगळापेक्षाही तेथील स्थिती पृथ्वीसारख्या जीवसृष्टीस अनुकूल असल्याचे त्यांचे मत आहे. महासागर, बर्फाचा पातळसा थर व ऑक्सिडंट्स यामुळे युरोपा हा जीवसृष्टीस अनुकूल स्थिती असलेला उपग्रह असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. एन्सेलाड्स हा शनीचा उपग्रह आहे. शनीच्या या चंद्रावरही जीवसृष्टीसाठी अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज आहे.

याबाबतचे संशोधन कोणी केले?

सॅन दिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले. या विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ केमिंग झांग यांनी या शास्त्रांच्या चमूचे नेतृत्व केले. ‘नेचर ॲस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

sandeep.nalawade@expressindia.com