पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथील प्राणीसंग्रहालयात एका वाघिणीने आपल्या तीन नवजात पिल्लांना मारले. जंगलातही हा प्रकार असला तरी प्राणिसंग्रहालयात प्रमाण अधिक आहे. पण प्राणी अशा प्रकारे का वागतात, आपल्याच पिल्लांना ठार का करतात हे अनेकांना अद्यापही न उलगडलेले कोडे आहे. प्राण्यांच्या या विचित्र वागण्याविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही प्राणी पिल्ले का मारतात?

तणाव, धोका किंवा वातावरण असुरक्षित वाटल्यास, खाण्यासाठी पुरेसे खाद्य नसल्यास, स्वतःच्या प्रजननाच्या संधी वाढवण्यासाठी, पिल्ले मेलेली आढळल्यास किंवा तीव्र भूक आणि इतर अन्न उपलब्ध नसेल तेव्हा आपलीच पिल्ले मारण्याचा अवलंब प्राणी करतात. काही वेळा गरोदरपणाच्या विरामानंतर अशक्तपणा आल्याने, महत्त्वाच्या पोषण मूल्यांची भरपाई करण्यासाठी मादी स्वतःच्या पिल्लांना मारून खाते. पिल्लू आजारी किंवा कमकुवत असेल आणि ते जगण्याची शक्यता नसेल तरी काही वेळेस मारले जाते. सहसा जंगलातील पिल्लू हत्येसाठी नर प्रजाती अधिक जबाबदार असते. प्रतिस्पर्ध्याचा प्रदेश आणि मादीचा ताबा मिळवल्यानंतर, नर प्रजाती भविष्यातील स्पर्धा कमी करण्यासाठी विशेषतः नर पिल्लांना मारतात. जंगलात आणि प्राणिसंग्रहालयात बहुतेकदा पिल्लांना मादी निवडकपणे नाकारते किंवा मारते, जेणेकरून वाचलेल्यांना चांगली संधी मिळावी. जंगलात, गर्भधारणेदरम्यान आणि आहार देताना तिची खर्च झालेली ऊर्जा परत मिळवण्यासाठी पिल्लांना मारून खाल्ले जाते.

हे ही वाचा… “नेहरूंनी एडविना माऊंटबॅटन यांना लिहिलेली पत्रं परत करावीत”, अशी भाजपाची गांधी कुटुंबाकडे मागणी; पत्रात नक्की काय दडलंय?

कोणते प्राणी पिल्लांना खातात?

चिंपान्झी प्रामुख्याने शाकाहारी असतात. परंतु ते कधीकधी आपल्या पिल्लांना मारून त्यांचे मांस खातात. विशेषतः नर चिंपान्झी हे करतात. कारण त्यांना वाटते की ती पिल्ले त्यांची नसावीत आणि भविष्यात स्पर्धा निर्माण करू शकतात. महामार्जार प्राण्यांमध्ये हे अनेकदा घडते. जेव्हा एखाद्या कळपात नवीन सिंह प्रमुख बनतो, तेव्हा तो इतर सिंहांच्या बछड्यांना ठार मारतो. कारण ते त्याचे वंशज नसतात आणि त्यांच्यावर ऊर्जा खर्च करण्यात त्याला रस नसतो. नर पाणघोडेदेखील कधीकधी लहान बछड्यांना ठार मारतात. ब्लेनी फिश हे मासेही स्वतःच्या पिल्लांना मारतात. नर सिंह त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पिल्लांना मारतात. कळपात नवा नर सिंह जन्माला आला तर तो प्रजनन साथीदाराला चोरू शकतो किंवा क्षेत्र व्यापू शकतो, या भीतीमुळे नर सिंह फक्त लहान पिल्लांची किंवा लहान सिंहांची शिकार करतात. मादी पुन्हा माजावर यावी यासाठीदेखील सिंहांमध्ये पिल्ले मारण्याची प्रवृत्ती दिसून येते. हीच बाब वाघ, बिबट्या यांच्यातही काही प्रमाणात आढळून आली आहे. मादी सँड टायगर शार्कच्या पोटात अंड्यातून बाहेर येणारे पहिले पिल्लू अनेकदा अंडी किंवा नंतर अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिलांना मारून खाते. कमी झालेला समुद्र बर्फ आणि कमी झालेली शिकारीची जागा यामुळे अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्यास ध्रुवीय अस्वले स्वतःच्या प्रजातींची शिकार करतात. मांजरीसह इतरही काही प्राण्यांमध्ये हा प्रकार आढळतो.

कोणत्या प्राणिसंग्रहालयात असे घडले?

मे २०१३ मध्ये जमशेदपूरच्या प्राणिसंग्रहालयात मादी बिबट्याने ३२ दिवसांनी पिल्लू टाकून दिले होते. सप्टेंबर २०१८ मध्ये कोलकात्याच्या अलीपूर प्राणीसंग्रहालयात अत्यंत कमी वजनाच्या सिंहाच्या पिल्लाला प्रसूतीनंतर दोन दिवसांनी सिंहिणीने सोडून दिले होते. मे २०२० मध्ये झारखंडमध्ये प्राणिसंग्रहालयातील मादी बिबट्याने सहा आठवड्यानंतर पिल्लाला मारले. सप्टेंबर २०२२ मध्ये ग्वाल्हेर प्राणिसंग्रहालयात सहा महिन्यानंतर वाघिणीने तिच्या पिल्लांना मारले. ओडिशाच्या नंदनकानन प्राणीसंग्रहालयातील पांढऱ्या वाघिणीने मार्च २०२२ मध्ये तिच्या पहिल्या पिल्लाला खायला देणे बंद केले, ज्यामुळे दोन पिल्लांचा मृत्यू झाला. मे २०१४ मध्ये, रांचीच्या भगवान बिरसा बायोलॉजिकल उद्यानात चार नवजात वाघांची पिल्ले वाघिणीच्या वजनाखाली मारली गेली. जून २०१२ मध्ये पांढऱ्या वाघिणीने बोकारो प्राणिसंग्रहालयात तिच्या एका पिल्लावर पाऊल टाकून ठार केले. जून २०२२ मध्ये महाराष्ट्रातील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील वाघिणीने पिल्लाला जन्म दिल्यानंतर कोरड्या गवतावर ठेवण्यासाठी त्याला चाटले.पण त्याला उचलताना वाघिणींची शेपटी त्याच्या गळ्याभोवती आवळली गेली. फेब्रुवारी २०१८ मध्ये याच वाघिणीने तिच्या चार पिल्लांच्या मानेला आणि डोक्याला प्राणघातक जखमा केल्या होत्या. जून २०१२ मध्ये हैदराबादच्या नेहरू प्राणिसंग्रहालयातील सिंहिणीने तिच्या एका पिल्लाचा जोरात चावा घेतला आणि त्याला मारले.

हे ही वाचा… Red Fort : लाल किल्ल्यावर हक्क कोणाचा; निर्वासित सम्राटाची शोकांतिका काय सांगते?

प्राणिसंग्रहालयात हा धोका जास्त का?

एक अननुभवी आई तिच्या पिल्लांना सांभाळताना किंवा आवरताना खूप तणावग्रस्त होऊ शकते. तोडलेल्या नाळ जोमाने चाटण्यासारख्या कृत्यांमुळे ते अनेकदा त्यांच्या पिल्लांना संसर्ग होण्याचा धोका पत्करतात. मात्र, अननुभवीपणामुळे घातक परिणामदेखील होऊ शकतात. प्राणिसंग्रहालयातील बंदिवासाची चांगली सवय असलेला वाघिणीदेखील पिल्लांसह तीव्र असुरक्षितता अनुभवतात आणि बऱ्याचदा हताश होऊन मारतात. सर्वच माता अनुभवाने शहाण्या होत नाहीत. प्राणिसंग्रहालयात बरेचदा अनुभव नसल्यामुळे हा प्रकार मोठ्या प्रमाणात होतो.

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At the zoo why wild animals kill their young why these kinds of incidents happen print exp asj