भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. पंतप्रधानपदी असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. ग्रामीण भागाच्या प्रगतीपासून ते भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केले. आज (२५ डिसेंबर २०२३) वाजपेयी यांची जयंती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यक्तीत्वाची तसेच दुरदृष्टीची माहिती देणाऱ्या ५ महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या पैलूंवर नजर टाकू या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान

अटलबिहारी वाजपेयी हे पूर्ण पाच वर्षे पंतप्रधानपदी असणारे देशाचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. ते एकूण तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले. मात्र १९९९ साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी पूर्ण पाच वर्षे देशाचा कारभार पाहिला. या काळात पंतप्रधान असताना भाजपाची अन्य २४ पक्षांशी युती होती. या पूर्ण २४ पक्षांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी वाजपेयी यांच्यावरच होती. विशेष म्हणजे ही जबाबदारी त्यांनी पूर्ण पाच वर्षे यशस्वीपणे सांभाळली होती. या पाच वर्षांच्या काळात वाजपेयी यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा आणि अन्य समविचारी पक्षांतील संबंध दृढ होत गेले. यातील काही पक्ष आजही भाजपासोबत आहेत. आपल्या या कार्यकाळात वाजपेयी यांनी देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या. यात सुवर्ण चतुर्भुज महामार्ग, प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते योजना, किसान क्रेडिट कार्ड यासारख्या योजानांचा समावेश आहे. या योजनांमुळे भारतातील लाखो लोकांचे जीवनमान उंचावले.

वाजपेयी यांच्या काळात भाजपाचा विस्तार

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली भाजपाला लोकसभेच्या फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. पुढे १९८६ साली लालकृष्ण आडवाणी यांच्याकडे नेतृत्व आले. त्यांनी मात्र कट्टर हिंदुत्त्ववादी धोरण स्वीकारले. तसेच रामजन्मभूमीचे आंदोलन तीव्र केले. या भूमिकेमुळे भाजपाला राजकीय लाभ मिळाला. १९८४ साली दोन जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपाने १९९१ साली तब्बल १२० जागा जिंकल्या. १९९१ साली बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर मात्र भाजपा एकाकी पडली होती. अशा वेळी भाजपाला अटलबिहारी वाजपेयी यांची मदत झाली. अटलबिहारी यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेमुळे भाजपाची इतर पक्षांशी युती झाली. अटलबिहारी यांच्यामुळेच भाजपाची स्वीकारार्हता वाढली.

पोखरण-२ चाचणीनंतर जागतिक पातळीवर नेतृत्व

अटलबिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर १९९८ मध्ये भारताने पोखरण येथे अणूचाचणी केली. या मोहिमेला ‘ऑपरेशन शक्ती’ म्हणून ओळखले जाते. या अणूचाचणीमुळे भारताची अणूबॉम्बबाबतची सिद्धता संपूर्ण जगाला समजली. निवडणुकीदरम्यान भाजपाने अणूचाचणीचे आश्वासन दिले होते. पोखरण चाचणीच्या रुपात भाजपाचे हे आश्वासनही पूर्ण झाले. भारताच्या पोखरण अणूचाचणीचे पडसाद तेव्हा जागतिक पातळीवर उमटले होते. अमेरिकेसारख्या देशाने भारतावर निर्बंध लादले होते. अशा परिस्थितीत जगातिक पातळीवरील राजकारण कौशल्याने हाताळणे गरजेचे होते. येथे वाजेपीय यांचा मुत्सद्दीपणा कामी आला होता. जागतिक पातळीवर भारताची बाजू भक्कमपणे मांडल्यामुळे अमेरिकेसारख्या देशाने अणूचाचणीनंतर अवघ्या सहा महिन्यांत भारतावरील निर्बंध हटवले. त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध वृद्धींगत होत गेले.

पाकिस्तानसोबतचे संबंध

भाजपाकडून पाकिस्तानबाबत नेहमीच कठोर धोरणाचा पुरस्कार केला जातो. मात्र या विचारधारेच्या विपरित वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध कसे सलोख्याचे होतील, यासाठी प्रयत्न केला. या प्रयत्नांत लाहोर बस यात्रा, कारगील युद्धानंतरची आग्रा शिखर परिषद, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान मुशर्रफ खान यांच्यासोबत बातचित अशा वेगवेगळ्या माध्यमातून भारत-पाकिस्तान तणावावर वाजपेयी यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

उत्तम वक्ता, संसदपटू

अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम वक्ते होते. आपल्या भाषणशैलीने ते संपूर्ण सभा जिंकून घ्यायचे. ते उत्तम संसदपटू होते. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना वाजपेयी हे पहिल्यांदा खासदार झाले होते. पुढे ते पाच दशके एकूण ११ वेळा खासदार म्हणून निवडूक आले. दोन वेळा ते राज्यसभेचे खासदार होते. या काळात खासदार म्हणून त्यांनी संसदेच्या सभागृहात लोकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. विषयाची मांडणी करण्याच्या विशिष्ट शैलीमुळे राजकीय विरोध असलेलेही त्यांच्या भाषणाचे कौतुक करत असत. त्यांनी लिहिलेल्या कविता तसेच त्यांच्या भाषणाचे काही व्हिडीओ आजदेखील समाजमाध्यमांवर दिसतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atal bihari vajpayee birth anniversary know what first formed non congress pm done for india prd