उत्तर प्रदेशमधील कुप्रसिद्ध व्यक्तिमत्व, माफिया आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची काल (दि. १५ एप्रिल) गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना माध्यम प्रतिनिधींच्या वेषात आलेल्या तीन अज्ञातांनी या दोघांवर पोलिसांच्या समक्ष अतिशय जवळून गोळ्या घातल्या. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांच्या बंदोबस्तात असताना हत्या झाल्यानंतर योगी सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. अतिक अहमदच्या हत्येमुळे योगी सरकारला निश्चितच अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. ६० वर्षीय अतिक अहमदचे आयुष्य हे एखाद्या हिंदी वेबसिरीज किंवा गँग्ज ऑफ वासेपूर सारख्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असे राहिले. एक सामान्य तरूण गुन्हेगारी आयुष्यात पाऊल ठेवतो, तिथून तो राजकारणी बनतो. फिल्मी स्टाईलने लोकांना संपवतो, व्यापाऱ्यांची संपत्ती ताब्यात घेतो आणि त्याचा अंतही एखाद्या चित्रपटच्या सीनसारखा होतो. उत्तर प्रदेशमध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण इतक्या थराला पोहोचले होते की, अतिक अहमदने भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या मतदारसंघातून विजय मिळवला होता. अतिक अहमदच्या गुन्हेगारी, राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.

उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावर अंत निश्चित, अतिकला शंका

अतिक अहमदला मात्र सुरुवातीपासून शंका होती की, त्याच्यासोबत काहीतरी विचित्र घटना घडेल. म्हणूनच तो गुजरातच्या तुरुंगातून यूपीमध्ये जाण्यास तयार नव्हता. त्यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. योगी सरकारमधील एका मंत्र्यांने ‘गाडी तो कभी भी पलट सकती है’ अशा आशयाचे विधान १ मार्च रोजी केले होते. त्यावरूनच अतिकचा एन्काऊंटर होणार याची चुणूक अनेकांना लागली. कृषी संस्थेच्या एका प्राध्यापकावर हल्ला केल्याप्रकरणी २०१६ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याला २०१९ मध्ये गुजरातमधील तुरुंगात हलविण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांना अतिकची कोठडी हवी होती, यासाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. अतिकच्या सुरक्षेची हमी घेतल्यानंतर गुजरातहून त्याची रवानगी उत्तर प्रदेशमध्ये झाली.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Atul Subhash Suicide
Atul Subhash Suicide: गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…

हे वाचा >> कुख्यात गँगस्टर अतिक अहमदच्या मुलाचे एन्काऊंटर; जाणून घ्या अहमद कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास

हिंदी चित्रपट, वेब सीरीजला शोभेल असे गुन्हेगारी आयुष्य

अतिक अहमदवर प्रयागराज येथे खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल १९८४ रोजी पहिला गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे. पाच वर्षांनंतर १९८९ रोजी अहमदने पहिल्यांदा तेव्हाच्या अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयदेखील मिळवला. पुढच्या दोन विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून अहमदने ही जागा कायम ठेवली. त्यानंतर समाजवादी पार्टीने अहमदसाठी आपले दरवाजे खुले केले. तब्बल तीन दशके अतिक अहमदचे गुन्हेगारी कृत्य आणि राजकारण समांतररित्या सुरु होते. आजवर त्याच्यावर १०० च्या आसपास खटले दाखल झालेले आहेत. त्याच्या टोळीत १४४ गुंड होते. तरीही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत निवडणूक जिंकण्याचा प्रताप अतिकने करून दाखविला.

तुरुंगातच व्यावसायिकाला मारहाण करून संपत्ती बळकावली

अतिक अहमदचे गुन्हेगारी किस्से एखाद्या चित्रपटापेक्षा कमी थरारक नाहीत. डिसेंबर २०१८ रोजी अतिक उत्तर प्रदेशमधील देवरियाच्या तुरुंगात कैद होता. तिथे त्याने मोहित जयस्वाल नावाच्या व्यावसायिकाला हस्तकांमार्फत भेटायला बोलावले. नंतर कळले की, जयस्वालला बळजबरीने उचलून तुरुंगात आणले होते. तिथे त्याला मारहाण करून त्याची ४८ कोटी रुपयांची जमीन अहमदच्या सहकाऱ्यांच्या नावावर करण्यासाठी कागदपत्रावर स्वाक्षरी घेण्यात आली. अतिक अहमदने अशाप्रकारे व्यापारांना धमकावून कोट्यवधीची संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली होती. मागच्या महिन्यातच योगी सरकारने अहमदशी निगडीत ३५० कोटींची मालमत्ता जप्त केली. तसेच प्रयागराज जिल्हा प्रशासनाने निर्देश दिल्यानंतर अहमद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जबरदस्तीने ताब्यात घेतलेली ७५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला बसपाच्या आमदाराची हत्या

२००४ साली लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अतिक अहमदने आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अतिक अहमदचा लहान भाऊ अशरफ विजयी होईल, असा अंदाज होता. मात्र निकालानंतर बहुजन समाज पक्षाच्या राजू पाल यांचा विजय झाला. आपल्या भावाचा पराभव अतिकला सहन झाला नाही. निवडणुकीच्या सहा महिन्यांनंतर २५ जानेवारी २००५ रोजी राजू पाल यांची हत्या करण्यात आली. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी राजू पाल आपल्या गावी जात होते. केवळ अपमानाचा बदला घेण्यासाठी अतिक अहमदने एका आमदाराची प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला हत्या केली. यावर कडी म्हणजेहत्येनंतर अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अशरफ अहमदचा विजय झाला. तर राजू पाल यांच्या पत्नी पूजा पाल यांना पराभूत व्हावे लागले होते.

हे ही वाचा >> चार दशकांत गुन्हेगारीची १०० प्रकरणे, १४४ गुंडांची टोळी; अतिक अहमद आता योगी सरकारला का घाबरत होता

राजू पाल यांच्याप्रमाणेच एकमेव साक्षीदार उमेश पालचीही हत्या

राजू पाल हत्या प्रकरणात उमेश पाल हे प्रमुख साक्षीदार होते. उमेश पाल यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर प्रयागराज पोलिसांनी अतिक अहमद, अशरफ अहमद तसेच इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच वर्षी २८ मार्च रोजी उमेश पाल अपहरण प्रकरणात न्यायालयाने अतिक अहमद, खान शौकत हनिफ, दिनेश पासी या तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याचवर्षी २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात उमेश पाल यांच्यासह त्यांच्या दोन अंगरक्षकांचाही मृत्यू झाला.

राजू पाल आणि उमेश पाल यांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशमध्ये अतिक अहमदच्या गुन्हेगारी कारवायांवर चाप लावावा, अशी मागणी उत्तर प्रदेशमधून होत होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियाचे समूळ उच्चाटन करण्याचा शब्द जनतेला दिला होता, त्याचे काय झाले? असेही प्रश्न विचारले जाऊ लागले होते.

मुख्यमंत्री असेलल्या मायावतींवर अतिक अहमदचा गोळीबार

१९९५ मध्ये गेस्ट हाऊस कांडमुळे अतिक अहमद चर्चेत आला होता. युपीच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती त्यांच्या आमदारांसोबत गेस्ट हाऊसवर थांबल्या होत्या. बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या पुढाकारातून बसपा आणि सपा यांची आघाडी झाली होती. कांशीराम यांनी मायावती यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले. पण मायावती सरकारमध्ये जड होऊ लागल्या. अतिक अहमद आणि सपाच्या कार्यकर्त्यांनी मायावती थांबलेल्या गेस्ट हाऊसला वेढा टाकून गोळीबार केला होता. गेस्ट हाऊसवर हल्ला झाला असताना मायावती यांना एका पोलीस अधिकाऱ्याने अँटी चेंबरमध्ये सुरक्षित बंद केले, ज्यामुळे त्या जिवंत वाचू शकल्या. या घटनेनंतर संतापलेल्या मायावतींनी सपासोबतची युती तोडली आणि सत्तास्थापनेसाठी भाजपाची मदत घेतली.

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मतदारसंघातून खासदार

१९९६ मध्ये अतिक अहमद सपाकडून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आला. तीन वर्षांनंतर त्याने अपना दल पक्षात प्रवेश केला आणि २००२ साली पुन्हा निवडणुकीत विजय मिळवला. २००४ साली पुन्हा सपामध्ये प्रवेश करून अहमदने ‘फुलपूर लोकसभा’ मतदारसंघातून विजय मिळवला. (या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व एकेकाळी जवाहरलाल नेहरू यांनी केले होते) मात्र २००४ साली घडलेल्या राजू पाल प्रकरणानंतर अतिक अहमदच्या गुन्हेगारी आणि राजकीय कारकिर्दीला खिळ बसली.

पंतप्रधान मोदींविरोधात लढवली होती निवडणूक

अतिक अहमदने फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रयागराजमधील सॅम हिंगनबॉटम कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तुरुंगात असूनही अतिकने २०१९ साली नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत अवघी ८५५ मते मिळवून त्याचा लाजिरवाणा पराभव झाला होता.

Story img Loader