गुजरात दंगलीप्रकरणी न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली आहे. न्यायालयाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता गुजरात एटीएस अॅक्शन मोडमध्ये आली असून सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना एटीएसने ताब्यात घेतलं आहे. त्यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेटलवाड यांचे नाव घेतले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या तीस्ता सेटलवाट नेमक्या आहेत तरी कोण? आणि त्यांचा गुजरात दंगलीशी काय संबंध?
वडील आणि आजोबा देशातील दिग्गज वकील होते
तीस्ता सेटलवाड यांचा जन्म १९६२ मध्ये महाराष्ट्रात झाला. तीस्ताने मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे आणि ती देशातील नामवंत वकिलांच्या कुटुंबातून आली आहे. त्यांचे वडील अतुल सेटलवाड हे वकील होते आणि आजोबा एम सी सेटलवाड हे देशाचे पहिले ऍटर्नी जनरल होते.
तीस्ता यांनी कायद्याचे शिक्षण मधेच सोडून पत्रकारितेच्या जगात प्रवेश केला आणि काही वर्षातच प्रसिद्ध पत्रकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जात होते. पत्रकार जावेद आनंद हे त्यांचे पती आहेत. सेटलवाड यांनी काही सहकाऱ्यांसह सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस नावाची एनजीओ सुरू केली. २००७ मध्ये तीस्ता यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
गुजरात दंगलीशी काय संबंध?
तीस्ता सेटलवाड गुजरात दंगलीतील पीडितांसाठी लढत आहेत. त्याच्यांवर परदेशातून आलेल्या पैशांचा गैरवापर आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. तीस्ता सेटलवाड आणि त्यांच्या एनजीओने दंगलग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीचा गैरवापर आणि अपहार केल्याचा आरोप आहे. २०१३ मध्ये अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील १२ रहिवाशांनी तीस्ता यांच्याविरोधात चौकशीची मागणी केली होती. दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मिळालेल्या कोटयावधींची रक्कम तीस्ता यांनी आपल्या स्वयंसेवी संस्थेला फायद्यासाठी वापरली असल्याचे आरोपकर्त्यांनी म्हटले आहे. गुलबर्ग सोसायटीत म्युझियम बांधण्यासाठी तीस्ता यांनी परदेशातून सुमारे दीड कोटी रुपये जमा केल्याचा आरोप गुलबर्ग सोसायटीतील लोकांच्या वतीने करण्यात आला होता. त्या पैशांचा योग्य वापर झाला नाही. २०१४ मध्ये क्राईम ब्रँचने तीस्ता आणि त्यांचे पती जावेद आनंद यांच्या विरोधात एफआयआर नोंदवली होती.
परदेशातून मिळालेल्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप
२००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. सेटलवाड यांच्या एनजीओने झाकिया जाफरीला त्यांच्या कायदेशीर लढाईत पाठिंबा दिला होता.
गुजरात दंगलीनंतर तीस्ता सेटलवाड आणि आणि त्यांची एनजीओ वादात आहेत. त्याच्या एनजीओच्या विदेशी कनेक्शनचा खुलासा त्यांचा माजी सहकारी रईस खान पठाण याने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला होता. सेटलवाड यांच्यावर काँग्रेसच्या सांगण्यावरुन भाजप आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपप्रचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.