‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर बुधवारी (२८ जून) गोळीबार करण्यात आला. या धक्कादायक घटनेत चंद्रशेखर आझाद यांच्या कंबरेला गोळी लागली असून, ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धनबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी काय प्रतिक्रिया दिली? उत्तर प्रदेश, तसेच देशभरात दलितांचे नेते म्हणून चंद्रशेखर यांना कशी ओळख मिळाली? उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांचे काय स्थान आहे? हे जाणून घेऊ या….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोळीबाराबाबत चंद्रशेखर आझाद काय म्हणाले?

गोळीबार झाल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. हा हल्ला नेमका कसा झाला, याची माहिती त्यांनी दिली आहे. “मला जास्त आठवत नाही. मात्र, माझ्या लोकांनी हल्लेखोरांना ओळखले आहे. आम्ही यू टर्न घेतला होता. आम्ही कारमध्ये एकूण पाच जण होतो. माझ्यासोबत माझा छोटा भाऊदेखील होता,” अशी माहिती चंद्रशेखर आझाद यांनी दिली.

चंद्रशेखर आझाद यांचा दलितांवरील अन्यायाविरोधात लढा

चंद्रेशखर आझाद ‘भीम आर्मी’चे प्रमुख आहेत. त्यासह ते आझाद समाज पार्टी (कांशीराम) या पक्षाचे संस्थापकही आहेत. २०२० साली या पक्षाची स्थापना करण्यात आली. ते दलितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात लढत असतात. याच कारणामुळे उत्तर प्रदेशमध्ये त्यांना कमी काळात जास्त प्रसिद्धी मिळाली. राजकारणात मात्र त्यांना अद्याप आपला ठसा उमटवता आलेला नाही. असे असले तरी भीम आर्मी, तसेच धडाडीच्या नेतृत्वामुळे त्यांचा उत्तर प्रदेशमध्ये मोठा चाहतावर्ग आहे.

चंद्रशेखर आझाद लोकप्रिय कसे झाले?

चंदशेखर आझाद यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील एका गावात झाला आहे. सुरुवातीला ते स्वत:ला चंद्रशेखर आझाद ‘रावण’ म्हणायचे. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी स्वत:च्या नावापुढील रावण हा शब्द काढून टाकला. ‘माझ्या नावाचा वापर करून विरोधकांनी ‘तुम्हाला राम हवे आहेत की रावण’ अशी टीका करू नये, म्हणूनच मी रावण हा शब्द काढला,’ असे चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले होते.

२०१४ साली ‘भीम आर्मी’ची स्थापना

२०१४ साली चंद्रशेखर आझाद आणि विनय रतन सिंह यांनी ‘भीम आर्मी’ची स्थापना केली. दलित आणि उपेक्षितांच्या न्याय, हक्कांसाठी लढण्याचा उद्देश समोर ठेवून या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. आझाद यांच्या या संघटनेकडून पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये अनेक शाळा चालवल्या जातात.

‘द ग्रेट चमार’ फलकावरून वाद

२०१६ सालच्या मार्च महिन्यात घडकौली गावातील दलितांनी ‘द ग्रेट चमार, डॉ. भीमराव आंबेडकर गाव, घडकौलीमध्ये तुमचे स्वागत आहे,’ अशा आशयाचा एक फलक उभा केला होता. मात्र, गावातील ठाकूर समाजाच्या लोकांनी फलकावरील ‘द ग्रेट’ या शब्दाला आक्षेप घेतला. त्यानंतर या फलकावर काळे फासण्यात आले. या घटनेची माहिती होताच ‘भीम आर्मी’च्या कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन उभारले होते. उत्तरादाखल पोलिसांनी लाठीमारही केला होता. मात्र, शेवटी द ग्रेट चमार, असा उल्लेख असलेला फलक पुन्हा एकदा लावण्यात आला. या घटनेनंतर भीम आर्मी, तसेच चंद्रशेखर आझाद यांना उत्तर प्रदेश, तसेच देशभरात प्रसिद्धी मिळाली.

मे २०१७ सालची रॅली

२०१७ सालच्या मे महिन्यात सहारनपूर जिल्ह्यातील शबीरपूर गावात दलित आणि राजपूत समाजामध्ये वाद झाला होता. या वादात एका राजपूत समाजाच्या माणसाचा मृत्यू झाला होता. तसेच दलितांची २५ घरे जाळण्यात आली होती. या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद यांच्यावर जवळजवळ २४ गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यांच्यावर दलित समाजाला भडकवण्याचा आरोप करण्यात आला होता.

पोलिस शोधात असूनही सभेला संबोधित केले

२०१७ सालातील मे महिन्यातच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये मोठ्या आंदोलन केले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन हे तरुण तेव्हा ‘जय भीम’ अशा घोषणा देत होते. त्या काळात चंद्रशेखर आझाद यांच्या समर्थकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. वेगवेगळे गुन्हे दाखल असल्यामुळे उत्तर प्रदेशचे पोलिस आझाद यांच्या शोधात होते. असे असूनही तेव्हा ते दिल्लीमधील आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची घोषणा केली होती. या आंदोलनानंतर चंद्रेशखर आझाद यांची लोकप्रियता आणखी वाढली.

चंद्रशेखर आझाद तरुणांमध्ये लोकप्रिय

२०१८ साली सहारनपूर येथील तरुणांनी चंद्रशेखर आझाद यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या तरुणांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून आझाद किती लोकप्रिय आहेत, याची प्रचिती येते. “चंद्रशेखर आझाद यांच्यात काहीतरी वेगळेपण आहे. ते शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि बलवान आहेत. त्यांच्या पीळदार मिशा तुम्ही पाहिल्या असतीलच. ते कशालाही घाबरत नाहीत. परवानगी दिलेली नसूनदेखील त्यांनी दिल्लीमध्ये मोठी रॅली काढली होती. आम्हाला त्यांचासारखाच तरुण नेता हवा आहे,” अशा भावना त्या तरुणांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केल्या होत्या.

दिल्लीमधील आंदोलनानंतर चंद्रशेखर आझाद यांना हिमाचल प्रदेशमधून अटक करण्यात आली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताच उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. पुढे साधारण १५ महिन्यांसाठी ते तुरुंगात होते.

२०१९ साली दिल्लीतील जामा मशीद परिसरात जोरदार भाषण

सीएए कायद्याला विरोध केल्यामुळे चंद्रेशखर आझाद यांच्यावर २०१९ साली पुन्हा एकदा अटकेची कारवाई करण्यात आली होती. २१ डिसेंबर रोजी पहाटे लवकर २.३० वाजता चंद्रेशखर आझाद नवी दिल्लीमधील जामा मशीद परिसरात आले होते. येथे अगोदरच शेकडो आंदोलक जमा झाले होते. त्या ठिकाणी येऊन त्यांनी रात्री उशिरा लोकांना संबोधित केले होते. या भाषणानंतर पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले होते. मात्र, मोठ्या संख्येने लोक जमल्यामुळे तेथून चंद्रशेखर आझाद निसटले होते. त्यानंतर पोलिसांनी आझाद यांचा पाठलाग केला होता. एखाद्या सिनेमातील दृश्याप्रमाणे आझाद या घरातून त्या घरात पळत होते. तर दुसरीकडे पोलिस त्यांचा पाठलाग करत होते. शेवटी मात्र त्यांनी आत्मसमर्पण केले होते.

चंद्रशेखर आझाद राजकारणात कसे आले?

आंदोलनं, बेधडक कारवाया, रोखठोक भाषण यामुळे चंद्रशेखर आझाद कमी काळात उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रिय झाले. पुढे त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांची लोकप्रियता कमी होत असताना दुसरीकडे चंद्रशेखर आझाद यांच्या रूपात दलितांना नवा चेहरा मिळाला होता. वाढती लोकप्रियता लक्षात घेता, त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.

मात्र मिळालेल्या लोकप्रियतेचा आझाद यांना तितकासा फायदा घेता आला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आझाद यांनी मी वाराणसी येथून नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा केली होती. मात्र, अचानकपणे त्यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या युतीला पाठिंबा दिला.

समाजवादी पार्टीशी करणार होते युती; पण….

२०२० साली त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. २०२२ साली विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांचे समाजवादी पार्टीशी बोलणे सुरू होते. मात्र, समाजवादी पार्टीने दलितांचा योग्य तो आदर ठेवला नाही, असे सांगत आझाद यांनी समाजवादी पार्टीशी युती करण्यास नकार दिला. या निवडणुकीत त्यांनी रोगखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना अवघी चार हजार मते मिळाली. त्यांची अनामत रक्कमदेखील जप्त झाली होती.

सध्या उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि चंद्रशेखर आझाद असे दोन नेते दलित, तसेच बहुजनांचे नेतृत्व करतात. मात्र, मायावती यांनी आझाद यांच्यापासून दोन हात दूर राहणेच पसंत केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on bhim army chief know detail information of chandrashekhar azad prd