गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये शीख धर्मियांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. येथे शीख धर्मियांना भेदभावाला तोंड द्यावे लागत असून त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला जातोय. याच वाढत्या हल्ल्यांची भारताने दखल घतली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून शीख धर्मीयांवरील हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये शीख धर्मीयांवर हल्ले का केले जात आहेत? पाकिस्तानमधील शिखांची स्थिती काय आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…
शिखांवरील अत्याचाराची भारताने घेतली दखल
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (२६जून) पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून पाकिस्तानमध्ये शीख धर्मीय नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध नोंदवला. “भारताने शिखांवर होत असलेल्या हल्ल्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच प्रामाणिपकणे चौकशी करून भारतालाही या चौकशीचा अहवाल द्यावा,” असे पाकिस्तानला राजनैतिक अधिकाऱ्याच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानने तेथील अल्पसंख्याकांची काळजी घ्यावी. तेथे अल्पसंख्याक सतत धार्मिक छळाच्या भयाखाली वावरत असतात, असेही भारताने पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याला सांगितले आहे.
आतापर्यंत शीख धर्मीयांवर किती हल्ले झाले आहेत?
गेल्या आठवड्यात पेशावर या भागात एका शीख नागरिकाला गोळ्या घालून ठार करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनमोहन सिंग (३५) असे मृत्यू झालेल्या अल्पसंख्याकाचे नाव आहे. हा एक ‘टार्गेट किलिंग’चा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही फक्त एकमेव घटना नाही. मागील महिन्यात लाहोर परिसरात सरदार सिंग नावाच्या व्यक्तीला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. एप्रिल महिन्यात पेशावर शहरात दयाल सिंग नावाच्या व्यक्तीचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. पेशावरमध्येच मे २०२२ मध्ये शीख समुदायाच्या दोघांचा खून करण्यात आला होता.
समुदायाचे प्रतिनिधित्व फक्त ०.०७ टक्के
पाकिस्तानमध्ये शीख धर्मीयांचे प्रमाण खूपच कमी आहे. ते पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. २०१७ सालच्या जणगणनेच्या अहवालात शीख समुदायाचा ‘अन्य’ प्रवर्गात समावेश करण्यात आला होता. या समुदायाचे प्रतिनिधित्व फक्त ०.०७ टक्के एवढेच आहे. मात्र डिसेंबर २०२२ साली सांख्यिकी ब्यूरोने आगामी काळात जणगणना करताना फॉर्ममध्ये शीख धर्मीयांसाठी एक वेगळा कॉलम असेल, असे सांगितले आहे.
जणगणनेच्या फॉर्ममध्ये शीख सुमदायासाठी वेगळा कॉलम
जगगणनेच्या फॉर्मवर शीख धर्मीयांचा उल्लेख असणारा एक वेगळा कॉलम असावा, ही मागणी घेऊन २०१७ साली पाच शिखांनी थेट पेशावरच्या न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाने शीख धर्मीयांच्या बाजूने निर्णय दिला होता. कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. त्यानंतर कोर्टाने हस्तक्षेप करत जणगणनेच्या फॉर्ममध्ये शीख सुमदायासाठी वेगळा कॉलम द्यावा, असा आदेश पाकिस्तान सरकारला दिला होता.
पाकिस्तानमध्ये शीख समुदायाचा छळ
२०२१ साली डिसेंबर महिन्यात अमेरिकेने धार्मिक स्वातंत्र्य कायद्यांतर्गत पाकिस्तानला ‘चिंताजनक देश’ म्हटले होते. या कायद्याचे पाकिस्तानेमध्ये उल्लंघन होत असल्यामुळे अमेरिकेने हा निर्णय घेतला होता. एखादा देश पद्धतशीरपणे तसेच सातत्याने धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच करत असेल, तर त्या देशाला चिंताजनक देश म्हटले जावे, असे धार्मिक स्वातंत्र्य कायद्यात म्हटलेले आहे. पाकिस्तानने कागदोपत्री धार्मिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे हमी दिलेली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकाप्रती असहिष्णूता वाढत असल्याचे म्हटले जात आहे.
२०१४ ते २०२२ या काळात हल्ल्याच्या १२ घटना
पंजाबमध्ये प्रामुख्याने पश्तून किंवा सिंधी शीख आहेत. मागील काही वर्षांपासून खैबर पख्तुनख्वामध्ये शीख समुदायातील नागरिकांना ठार करण्याचे प्रमाण वाढले आहे. २०१४ ते २०२२ या काळात पेशावर तसेच इतर भागात अशा कमीत कमी १२ घटना घडल्या आहेत. खैबर पख्तुनख्वा हा अगोदर अफगाणिस्तानचा भाग होता, तेव्हापासून येथे शीख धर्मीय नागरिक राहतात. बिटिशांच्या शासनकाळात पेशावर तसेच पंजाबच्या वायव्येतील काही जिल्हे वायव्य सीमा प्रांताचे भाग होते. फाळणीनंतर हा भाग पाकिस्तानमध्ये गेला. या भागात पख्तून भाषा बोलणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे २०१० साली या भागाला खैबर पख्तुनख्वा असे नाव देण्यात आले. पुढे पश्तून शीख कुर्रम, खैबर आणि ओरकझाई या जिल्ह्यांत स्थायीक झाले. मात्र धार्मिक हल्ले वाढल्यानंतर शीख धर्मीयांनी पुढे पेशावर, लाहोर, नानकाना साहीब या भागात स्थलांतर केले.
‘आमचे आमच्या देशावर प्रेम आहे’
पेशावर, लाहोर, नानकाना साहीब या भागात राहणारे शीख धर्मीय हे कमी उत्पन्न गटातील आहे. त्यांचे परिवार छोटी-छोटी दुकाने चालवतात. किराणा, मसाले, औषधे विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. ते स्वत:ला पाकिस्तानी नागरिक असल्याचे म्हणतात तसेच पाकिस्तानमधील मुस्लिमांशी बंधुभावाने वागतात. शीख धर्मीयांवर वाढलेल्या हल्ल्यांवर गुरुद्वारातील सेवादार आणि शिक्षक असलेले बलबीर सिंग यांनी माहिती दिली आहे. “सध्या येथे कायद्याची भीती कोणालाही नाही. शीख धर्मीयांवर गोळीबार केला जात आहे. अल्पसंख्याक असल्यामुळे हे हल्ले केले जात आहेत. शीख धर्मीयांवरील हा अत्याचार थांबवला पाहिजे. पाकिस्तानमध्ये राहात असलेला प्रत्येक शीख स्वत:च्या देशावर प्रेम करतो. पाकिस्तानी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र आमच्या लोकांवर गोळीबार केला जात आहे,” असे सिंग म्हणाले.
दहशतवादी संघटनांमुळे अल्पसंख्याकांना धोका वाढला
आदिवासी भागात तसेच खैबर पख्तुनख्वा या भागात मागील काही वर्षांपासून तालिबानी तसेच इतर दहशतवादी संघटनांच्या कारवाया वाढल्या आहेत. दहशतवादी संघटनांमुळे या भागात राहणाऱ्या अल्पसंख्याकांना धोका वाढला आहे. जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात धार्मिक कट्टरतेत वाढ झाली. पाकिस्तानमध्ये अनेकदा शीख धर्मीयांकडे मुस्लिमांचे मारेकरी म्हणून पाहिले जाते. शीख धर्मीय भारतातून पाकिस्तानमध्ये आल्याचा दावा केला जातो.
पाकिस्तानमध्ये फक्त २० हजार शीख
दरम्यान पाकिस्तानमध्ये मागील काही वर्षांपासून शीख धर्मीयांची संख्या सातत्याने कमी होत आहे. पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीनुसार सध्या पाकिस्तामध्ये फक्त १५ ते २० हजार शीख शिल्लक राहिलेले आहेत. यात सुमारे ५०० कुटुंबे पेशावर या भागात राहतात. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून वागवले जात असल्याचा आरोप केला जातो.