सध्या लष्करी नियंत्रणाखाली असलेल्या म्यानमारमधील ७७ वर्षीय पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांना न्यायालयाने विविध आरोपांमध्ये दोषी ठरवत एकूण ३३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आंग सान सू ची यांना ३० डिसेंबर रोजी न्यायालयाने एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. ही सुनावणी पूर्णपणे गुप्त पद्धतीने पार पडली. या सुनावणी प्रक्रियेची माहिती ‘रॉयटर्स’ने मिळवली आहे. आंग सान सू ची यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? आणि त्यांना कोणत्या प्रकरणात किती शिक्षा मिळाली? याचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंग सान सू ची यांच्यावरील आरोप आणि त्यांना झालेली शिक्षा

  • २०२१ मध्ये आंग सान सू ची यांनी स्थानबद्ध असताना आपल्या पक्षामार्फत आंतरराष्ट्रीय संस्थांना पत्र पाठवलं होतं. या पत्रातून त्यांनी लष्करी सरकारला चिथावणी दिली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. याप्रकरणी ६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • स्वत:च्या राजकीय पक्षाचा निवडणूक प्रचार करताना कोविड-१९ नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आंग सान सू ची यांना ६ डिसेंबर २०२१ रोजी दोन वर्षांचा तुरुंगवास सुनावला.
  • आंग सान सू ची यांनी विनापरवाना वॉकी-टॉकी आणि सिग्नल जॅमर बाळगून म्यानमारमधील आयात-निर्यात कायद्याचे आणि दूरसंचार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अनुक्रमे दोन वर्षे आणि एक वर्षाचा तुरुंगवास सुनावण्यात आला. न्यायालयाने १० जानेवारी २०२२ रोजी हा निर्णय दिला.
  • याशिवाय ६ लाख डॉलर रक्कम आणि ११.४ किलो सोन्याची लाच स्वीकारल्याप्रकरणी आंग सान सू ची यांना २७ एप्रिल २०२२ रोजी न्यायालयाने पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावला.
  • स्वत:साठी घर बांधण्यासाठी ‘डाऊ खिन की फाउंडेशन’च्या निधीचा गैरवापर आणि सरकारी मालकीची जमीन सवलतीच्या दरात भाडेतत्त्वावर देण्याच्या गुन्ह्यात आंग सू की यांना १५ ऑगस्ट २०२२ रोजी सहा वर्षांचा तुरुंगवास सुनावला.
  • देशातील निवडणूक आयोगावर दबाव टाकल्याप्रकरणी २ सप्टेंबर २०२२ मध्ये आंग सू की यांना तीन वर्षे सक्तमजुरीसह तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • गोपनीयतेच्या कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी २९ सप्टेंबर २०२२ रोजी तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
  • म्यानमारमधील उद्योजक माउंग वेइक यांच्याकडून साडेपाच लाख डॉलर्सची लाच स्वीकारणे. तसेच वेइक यांच्या व्यवसायांना फायदा मिळवून देणे, आदि आरोपांखाली १२ ऑक्टोबर २०२२ रोजी आंग सान सू ची यांना तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावला.
  • भाड्याने हेलिकॉप्टर घेण्यासाठी सरकारी निधीचा वापर करणे. तसेच भ्रष्टाचाराच्या इतर पाच गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून न्यायालयाने त्यांना सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

आंग सान सू ची यांनी सर्व आरोप फेटाळले…

अशा प्रकारे विविध गुन्हेगारी प्रकरणांच्या आरोपात दोषी ठरवून म्यानमारमधील न्यायालयाने आंग सान सू ची यांना एकूण ३३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पण आंग सान सू ची यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित शिक्षेविरोधात त्यांचे वकील आव्हान याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

लष्करशहाचा हेतू

राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार, आंग सान सू ची तसेच त्यांच्या अन्य सहकाऱ्यांविरोधात दाखल केलेले विविध खटले म्हणजे सध्याच्या लष्करी सत्तेला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे. म्यानमारमध्ये पुढील वर्षी निवडणुका घेण्याचे आश्वासन लष्करशहाने दिलं आहे. त्याच्या आधीच सू ची यांना राजकारणातून हद्दपार करण्याचा लष्कराचा हेतू आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aung san suu kyi sentenced to 33 years by myanmar court what are charges rmm