Aurangzeb tomb history: गेल्या काही दिवसांमध्ये औरंगजेब हा मुद्दा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभराच वादाच्या केंद्रस्थानी आहे. औरंगजेबाची कबर हटवावी, या मागणीने आता चांगलेच मूळ धरले आहे. आजपासून सुमारे ३०० वर्षांपूर्वी २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाची कबर तशी साधीच आहे. किंबहुना ती अनेकांच्या विस्मरणातही गेली होती. सध्याच्या पार्श्वभूमीवर या कबरीला अचानक महत्त्व प्राप्त झाले आहे. औरंगजेबाने जवळपास ५० वर्षे राज्य केले. औरंगजेबाची गणना सर्वाधिक राज्य करणाऱ्या मुघल शासकांमध्ये होते. असं असलं तरी मृत्यूनंतर त्याचे दफन महाराष्ट्रात खुलदाबादमध्ये झाले. प्रत्यक्षात अनेक मुघल अधिकाऱ्यांच्या कबरी या औरंगजेबाच्या कबरीपेक्षाही मोठ्या आहेत.
औरंगजेबाला महाराष्ट्रातच का दफन केले?
औरंगजेबाने त्याच्या शेवटच्या कालखंडात मुघल साम्राज्याचा अंत जवळून पाहिला. त्याचे सरदार हळूहळू दूर गेले. मराठ्यांचा वाढता प्रभाव आणि लष्करी धोरण यामुळे तो हतबल झाला होता. मराठ्यांविरुद्ध दख्खन मोहिमेवर असतानाच वयाच्या ९० व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याला खुलदाबाद येथे दफन करण्यात आले. इस्लामच्या नियमाप्रमाणे स्वतःची साधी कबर बांधावी अशी औरंगजेबाची इच्छा होती, असे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे इतिहास तज्ज्ञ अली नदीम रिझवी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
उघड्यावर असलेली कबर
औरंगजेबाची कबर १४ व्या शतकातील चिश्ती संत शेख झैनुद्दीन यांच्या दरगाह संकुलात आहे. याच संकुलात औरंगजेबाच्या एका मुलालाही दफन करण्यात आले आहे. त्याचबरोबर नंतर हैदराबादचा पहिला निजाम असफ जाह पहिला आणि त्यांचा मुलगा नासिर जंग यांच्याही कबरीही याच संकुलात आहेत. अमेरिकन इतिहासतज्ज्ञ कॅथरिन अशर यांनी त्यांच्या Architecture of Mughal India या पुस्तकात औरंगजेबाच्या कबरीबाबत लिहिले आहे. “सम्राटाची उघड्यावर असलेली कबर, त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार, एक साधा दगडी छतरीसारखा स्मारकदगड लावून चिन्हांकित करण्यात आली होती. मात्र विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ती पांढऱ्या संगमरवरी संरचनेने सजवण्यात आली. वरचा भाग मातीने भरून त्यावर लावण्याची सोय करण्यात आली होती.”
लॉर्ड कर्झन यांचे आदेश
रिझवी यांनी सांगितले की, भारतातील सर्वाधिक काळ राज्य केलेल्या सम्राटांपैकी एकाचा सन्मान करण्यासाठी ब्रिटिश व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी पांढऱ्या संगमरवरी चौकटीची उभारणी करण्याचे आदेश दिले होते. औरंगजेबाच्या दफनविधीचे अधिक तपशीलवार वर्णन साकी मुस्त’अद खान यांच्या मआसिर-ए-आलमगिरी या ग्रंथात आढळते. या ग्रंथाचा अनुवाद इतिहासतज्ज्ञ सर जदुनाथ सरकार यांनी केला आहे. या ग्रंथात म्हटले आहे की, …सम्राटाच्या अंतिम इच्छेनुसार शेख झैनुद्दीन यांच्या कबरीच्या आवारात (दौलताबादजवळील रौझा येथे) त्याला पुरण्यात आले.
स्वतःची कबर त्याने आधीच तयार केली होती… त्याच्या कबरीवरचा लाल दगडाचा चबुतरा साधारणतः तीन हात लांब, अडीच हात रुंद आणि काही बोटे उंचीचा आहे. त्याच्या मध्यभागी एक खळगा आहे. त्यात माती भरून सुगंधी औषधी वनस्पती लावलेल्या आहेत.” रौझा या स्थळाला नंतर खुलदाबाद असे नाव मिळाले. यामागील मुख्य कारण म्हणजे औरंगजेबाला ‘खुल्द-मकानी’ म्हणजे ‘सदैव स्वर्गस्थ राहणारा’ असा किताब देण्यात आला होता. इतिहासतज्ज्ञ राणा सफवी यांनी The Indian Express ला सांगितले की, “रौझा म्हणजेच कब्र. खुलदाबाद यापूर्वी रौझा म्हणून ओळखले जात असे, कारण तिथे अनेक सूफी संतांचे दरगाह होते.”
कबर सांगते अनेक कथा
औरंगजेबाला एक धार्मिक कट्टरपंथी म्हणून ओळखले जाते. इतिहासतज्ज्ञ विल्यम डॅलरिंपल यांनी त्याला “एक निराशाजनक प्यूरीटन” असे संबोधले होते. तरीही, त्याचे व्यक्तिमत्त्व विसंगतीपूर्ण होते आणि हे त्याच्या कबरीतही हे प्रतिबिंबित होते. औरंगजेब एक कडवा सुन्नी मुस्लिम होता. परंतु, तरीही त्याची कबर एका सूफी संताच्या दरगाहात आहे. कॅथरीन अशर लिहितात, “त्याच्या आयुष्याच्या अखेरीस, औरंगजेबाने लिहून ठेवले की, इस्लामच्या पारंपरिक शिकवणीनुसार कबरींची भेट घेणे योग्य नाही. तरीही, त्याच्या स्वतःच्या कबरीचे स्थान दाखवते की, त्याच्या मनात संतांबद्दलचा आदर कधीही कमी झालेला नव्हता.”
बहिणीशी वैचारिक मतभेद
औरंगजेबाची कबर त्याची मोठी बहीण जहानआरा बेगम हिच्या कबरीशी खूपच मिळतीजुळती आहे. तिला दिल्लीतील निजामुद्दीन औलिया दरगाह संकुलात साध्या स्वरूपात पुरण्यात आले आहे. मात्र, जहानआरा आणि औरंगजेब यांच्यामध्ये आयुष्यभर वैचारिक मतभेद होते. ती नेहमीच दारा शिकोहच्या बाजूने होती आणि औरंगजेबाने शाहजहानला कैद केल्यावरही ती वडिलांची एकनिष्ठ सहकारी राहिली.
कबरींचे विजयस्मारक?
पहिल्या सहा मुघल सम्राटांच्या कबरी त्यांच्या साम्राज्याच्या भरभराटीचे प्रतिबिंब आहेत. हुमायून, अकबर, जहाँगीर आणि शाहजहान यांच्या भव्य व देखण्या या त्यांच्या साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. तसेच, ‘महान मुघलां’पैकी एकाही सम्राटाने वारसा संघर्षाशिवाय सिंहासनावर प्रवेश केलेला नाही. या संदर्भात, इतिहासतज्ज्ञ मायकेल ब्रँड यांनी त्यांच्या १९९३ मधील संशोधनप्रबंधात (Orthodoxy, Innovation, and Revival: Considerations of the Past Imperial Mughal Tomb Architecture) एक विचारप्रवर्तक मुद्दा मांडला आहे. ते लिहितात, “खरं तर, बाबर आणि औरंगजेबाने स्वतःच्या साध्या कबरीची इच्छा व्यक्त केली होती… हुमायून, अकबर आणि जहाँगीर यांना त्यांच्या मुलांनी किंवा उत्तराधिकारींनी बांधलेल्या कबरींमध्ये दफन करण्यात आले… त्यामुळे असा प्रश्न पडतो की, मुघल कबरी खरोखर मृत सम्राटांच्या स्मरणार्थ बांधल्या गेल्या होत्या की त्या अंतर्गत सत्तासंघर्षात वाचलेल्या उत्तराधिकाऱ्यांनी आपल्या विजयाच्या स्मारकासारख्या बांधल्या होत्या?”
औरंगजेबाची कबर त्यामुळे दोन गोष्टी दर्शवते
औरंगजेबाने स्वतःच्या दफनाची जबाबदारी स्वतः सांभाळली आणि त्याचे उत्तराधिकारी त्याच्या वडिलांइतके किंवा आजोबांइतके प्रभावशाली नव्हते. त्यामुळे साम्राज्याला एखाद्या भव्य स्मारकाद्वारे अभिमानाने मांडण्यासारखे काही उरले नव्हते. बाबरापासून औरंगजेबापर्यंत मुघल साम्राज्याने एका अर्थाने वर्तुळ पूर्ण केले. औरंगजेब स्वतःही आपल्या मृत्यूच्या वेळेस आपल्या अपयशांविषयी खूप जागरूक होता. इतिहासतज्ज्ञ जदुनाथ सरकार ‘A Short History of Aurangzib’ मध्ये औरंगजेबाने आपल्या शेवटच्या दिवसांत आपला मुलगा प्रिन्स अझम याला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करतात: “मला माहिती नाही की, मी कोण आहे आणि मी काय करत आलो आहे… मी कधीही खऱ्या अर्थाने राज्यकारभार केला नाही किंवा शेतकऱ्यांचे रक्षण केले नाही… इतके मौल्यवान आयुष्य काहीही न करता निघून गेले आहे.”