Who is Prince Yakub Habeebuddin Tucy : औरंगजेबापासून ते बहादूर शाह जफरपर्यंतच्या मुघल सम्राटांनी भारतावर शेकडो वर्षं राज्य केले. १८५७ च्या उठावात इंग्रजांनी मुघलांचा पराभव करून दिल्लीच्या तख्तावर कब्जा केला. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर होता. त्याला अटक झाल्यानंतर भारतातील मुघल साम्राज्याचा अंत झाला. मुघलांच्या वंशजांचे पुढे काय झाले, ते कुठे आहेत, असे प्रश्न आजही अनेक जण विचारतात. हैदराबादमधील एका व्यक्तीने आपण मुघलांचे वंश असल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही, तर त्याने मुघलांच्या काळात बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक वस्तूंवरही त्याचा दावा सांगितला आहे. दरम्यान, कोण आहे ही व्यक्ती? त्याने ताजमहालाबद्दल काय दावा केला? त्याच्याकडे काही पुरावे आहेत का? हे जाणून घेऊ…

हैदराबादमध्ये राहणाऱ्या प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसीने असा दावा केलाय की, तो मुघल साम्राज्याचा शेवटचा शासक बहादूर शाह जफरच्या सहाव्या पिढीतील वंशज आहे. मुघलांच्या काळात बांधलेल्या आग्रा येथील ताजमहाल, दिल्लीतील लाल किल्ला आणि अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जमिनीवर त्याने अनेकदा दावा केलेला आहे. याकूब तुसी स्वत:चा उल्लेख आधुनिक काळातील ‘मुघल राजकुमार’ म्हणून करतो. मुघल सम्राटांसारखाच पोशाख घालून फिरणारा याकूब याआधीही अनेकदा चर्चेत आलेला आहे. काही दिवसांपूर्वी तो औरंजेबाच्या खुलताबाद येथील थडग्याच्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता.

ताजमहालाबाबत याकूबचा दावा काय?

ताजमहाल ही भारतातील महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूच्या इतिहासात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. जगातील सौंदर्याची छटा असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या, स्मारकांच्या यादीत ताजमहाल अग्रणी आहे. इतिहासकारांच्या मते, मुघलसम्राट शहाजहाँने त्याची राणी मुमताज महलच्या आठवणी जपण्यासाठी ताजमहाल बांधला होता. १८५७ नंतर भारतातील मुघल साम्राज्याचा अस्त झाला आणि इंग्रजांनी आग्रा येथील ताजमहाल त्यांच्या ताब्यात घेतला. दरम्यान, या ताजमहालावर याकूब हबीबुद्दीन तुसीने त्याचा दावा सांगितला आहे. या संदर्भात त्याने हैदराबाद येथील न्यायालयात धावही घेतली आहे. ताजमहालावरील दावा सिद्ध करण्यासाठी याकूबने त्याचा डीएनए अहवालही न्यायालयात सादर केला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

आणखी वाचा : डॉक्टरांच्या एका चुकीमुळे महिलेने दिला अनोळखी व्यक्तीच्या बाळाला जन्म; आता कायदेशीर पेच कोणता?

जयपूरच्या राजकुमारींना याकूबचे आव्हान

‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०१९ मध्ये जयपूरच्या घराण्यातील राजकुमारी व भाजपाच्या माजी खासदार दिया कुमारी यांनीही ताजमहालावर त्यांचा मालकी हक्क सांगितला होता. ताजमहाल हा मुघलांचा नसून आमच्या पूर्वजांचा वारसा आहे. ताजमहालाची जमीन आमच्या पूर्वजांची होती. या जमिनीशी संबंधित कागदपत्रे माझ्याकडे आहेत. मुघलांनी जबरदस्तीने या जमिनीवर कब्जा केला आणि तिथे ताजमहाल बांधला, असा दावाही दिया कुमारी यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याचे याकूब तुसीने खंडण केले होते. “तुमच्याकडील पोथीखान्यात ताजमहालाची कागदपत्रे असतील, तर ती दाखवा. त्याच्याशी संबंधित अधिकृत नोंदी सादर करा, तुमच्या अंगात राजपुताचं रक्त असेल, तर कागदपत्रं दाखवाच”, असे खुले आव्हान याकूबने राजकुमारी दिया कुमारी यांना दिले होते.

अयोध्येतील जमिनीवर याकूबचा दावा

याकूब तुसीने अयोध्येतील जमिनीवरही त्याचा दावा सांगितला होता. अयोध्येत मुघल सम्राट बाबरने बाबरी मशीद बांधली होती. माझ्याकडे या जमिनीची कागदपत्रे आहेत. त्यामुळे मुघलांचा वंशज म्हणून या जमिनीवर माझाच अधिकार आहे, असा दावा याकूबने न्यायालयात केला होता. अयोध्येतील राम जन्मभूमीचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना याकूबने हा दावा केला होता. इतकेच नाही तर, वक्फ बोर्डाचा या जमिनीशी तिळमात्र संबंध नाही. ती माझी खासगी मालमत्ता आहे, असेही याकूबने म्हटले होते. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अयोध्येत राम मंदिर उभारलं जावं, अशी इच्छा याकूब हबीबुद्दीन तुसीने व्यक्त केली होती.

अयोध्येतील राम मंदिराला याकूबचे समर्थन

याकूब म्हणाले होते की, “१५२९ मध्ये मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबरने आपल्या सैन्याला नमाज पठण करण्यासाठी अयोध्येत बाबरी मशीद बांधून दिली होती. या जागेवर आधी काय होतं या वादात मला पडायचं नाही. परंतु, अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर होते, अशी हिंदू बांधवांची भावना असेल, तर एक सच्चा मुस्लीम या नात्यानं मी त्यांच्या भावनांचा नक्कीच आदर करेन. मुघल साम्राज्याचा वंशज या नात्यानं मला जमिनीचा मालकी हक्क मिळाला तर, मी अयोध्येतील जमीन राम मंदिर उभारणीसाठी दान करीन”, अशी इच्छाही याकूबने बोलून दाखवली होती. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर पहिली सोन्याची वीट मीच रचणार, असंही याकूबने सांगितलं होतं.

औरंगजेबाच्या कबरीवरून राष्ट्रपतींना पत्र

औरंगजेब हा मुघल साम्राज्यातील सर्वांत क्रूर शासक होता, असे म्हटले जाते. स्वराज्याचे दुसरे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खुलताबाद येथील औरंजेबाची कबर पाडण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली होती. त्या वेळीही औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी याकूब तुसीने थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. काही लोक इतिहासाची मोडतोड करीत आहेत आणि दोन समाजांत वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. असले प्रयत्न हाणून पाडण्याचे सरकारचे काम आहे, असे याकूबने आपल्या पत्रात म्हटले होते.

हेही वाचा : पाकिस्तानवर विनाशाचे संकट? तालिबान पाकिस्तानविरोधात वापरणार अमेरिकन शस्त्रे?

‘औरंगजेबाची कबर वक्फची संपत्ती’

“मी मुघल साम्राज्याचा उत्तराधिकारी असून, शेवटचे मुघल बहादूर शाह जाफर यांचा पणतू आहे. माझे पूर्वज औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर अत्यंत साध्या पद्धतीने बांधण्यात आली आहे. परंतु, काही दिवसांपासून काही लोक ही कबर उखडून फेकण्याची मागणी करीत आहेत. मात्र औरंगजेब यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मृत्यू पावले. भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला या देशात राहण्याचा आणि इथेच मरण्याचा अधिकार आहे. सध्या औरंगजेबाची कबर वक्फची संपत्ती आहे आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे”, अशी आठवण याकबूने आपल्या पत्रातून करून दिली होती.

मुघल सम्राटांप्रमाणे याकूबचा पोशाख

प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी सध्या हैदराबादमध्ये राहतो. ७ मे १९९७ साली त्यांने प्रिंसेस हुमौरा फातिमा यांच्यासोबत निकाह केला होता. या दाम्पत्याला प्रिन्स याकूब शाहरुखुद्दीन तूसी आणि प्रिन्स याकूब वैघिउद्दीन तूसी अशी दोन मुलं आहेत. याकूब हा त्यांच्या पूर्वजांप्रमाणेच पोशाख परिधान करतो. याकूबचे आधार कार्ड आणि पासपोर्टसारख्या अधिकृत कागदपत्रावर प्रिन्स असे अधिकृत नाव आहे. त्याचा असा दावा आहे की, उझबेकिस्तानसारखे अनेक देश त्याला मुघल वंशज मानून अधिकृत आदर देतात. जेव्हा तो इतर देशांना भेट देतो तेव्हा त्याला मुघल वंशज म्हणून आदरातिथ्य मिळतं. प्रिन्स याकूब हैदराबादमधील शमशाबाद येथील त्याच्या फार्महाऊसमध्ये बनियान आणि शॉर्ट्समध्येही दिसून येतो. बऱ्याच वेळा तो सामान्य माणसाप्रमाणे जीन्स आणि टी-शर्ट घालून मोटरसायकल चालवतानाही दिसतो.