Australia Man Artificial Heart : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अत्यंत महागडे उपचार किफायतशीर दरात करणं शक्य होत आहे. हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार मानला जातो. जगभरात हृदयविकारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. हृदयदाते कमी असल्यानं त्यासाठीची प्रतीक्षा यादीही मोठी आहे. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता भासली. मात्र, त्याला वेळेवर हृदयदाता मिळाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला कृत्रिम हृदय बसवलं. विशेष बाब म्हणजे हा रुग्ण कृत्रिम हृदयाच्या साह्यानं १०० दिवस जगला; अन्यथा त्याचा मृत्यू झाला असता. दरम्यान, हे नेमकं कसं घडलं? ते जाणून घेऊ…
कृत्रिम हृदय प्रत्यारोपणाचे बरेच प्रयोग
आजवर कृत्रिम हृदय प्रत्यारोपणाचे अनेक प्रयोग करण्यात आले; पण ते अयशस्वी ठरल्याचं दिसून आलं. मात्र, ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी असा दावा केला की, त्यांनी कृत्रिम टायटॅनियम हृदय बसवून एका रुग्णाला तब्बल १०० दिवस जिवंत ठेवलं आणि त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर हृदयदाता मिळाल्यानं पुन्हा त्या रुग्णाला नैसर्गिक हृदय बसवण्यात आलं. या शस्त्रक्रियेनंतर हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन रुग्णालयातून घरी परतला आहे. या रुग्णाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. त्याचं वय सुमारे ४० वर्षं असल्याचं सांगितलं जात आहे.
कृत्रिम हृदययंत्राबाबत संशोधकांचा दावा काय?
नोव्हेंबर २०२३ मध्ये सिडनीतील सेंट व्हिन्सेंट रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान कृत्रिम हृदय मिळवणारा तो पहिला रुग्ण ठरला. या शस्त्रक्रियेमागील ऑस्ट्रेलियन संशोधक आणि डॉक्टरांनी बुधवारी त्यांच्या या यशाबद्दल सांगितलं आहे. त्यांनी याला अखंड क्लिनिकल यश, असं म्हटलं आहे. शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे हृदयरोग तज्ज्ञ प्रोफेसर क्रिस हेवर्ड यांनी News.com.au ला सांगितलं, “या शस्त्रक्रियेला यश मिळाल्यानं भविष्यात ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हृदय प्रत्यारोपणासाठी नवीन संधी निर्माण होतील.” याआधी गेल्या वर्षी अमेरिकेत एकूण पाच कृत्रिम हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये प्रत्येक रुग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वी एक दात्याचं हृदय मिळालं होतं. रोपण आणि प्रत्यारोपणामधील सर्वांत मोठा कालावधी २७ दिवसांचा होता.
आणखी वाचा : Starlink Internet Price : एलॉन मस्क यांची स्टारलिंक कंपनी देशात स्वस्त इंटरनेट देणार?
कृत्रिम हृदय नेमकं कसं काम करतं?
क्वीन्सलँडच्या डॉ. डॅनियल टिम्स यांनी हे कृत्रिम हृदय विकसित केल्याचं सांगितलं जात आहे. या हृदययंत्राला BiVACOR असं नाव देण्यात आलं आहे. हा जगातील पहिला इम्प्लांटेबल रोटरी ब्लड पंप आहे, जो पूर्णपणे मानवी हृदयाची जागा घेऊ शकतो. या पंपाच्या आतील भागात टायटॅनियमने तयार केल्या गेलेल्या हृदययंत्राची डिझाइन हुबेहूब रक्तवाहिन्यांप्रमाणे तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे रुग्णाच्या फुप्फुसांसह शरीरातील रक्ताभिसरण क्रिया नैसर्गिकरीत्या होते. विशेष म्हणजे या कृत्रिम हृदयात कोणतेही व्हॉल्व्ह किंवा यांत्रिक बेअरिंग नाहीत आणि त्यामुळे ते अधिक टिकाऊ व प्रभावी होतं.
कृत्रिम हृदययंत्रामुळे रुग्ण किती दिवस जगतो?
डॉक्टर टिम्स यांनी सांगितले, “ज्या रुग्णाला हे कृत्रिम हृदययंत्र बसविण्यात आलं होतं. त्याच्या मृत्यूचा धोका टळला आहे. कृत्रिम हृदययंत्राच्या आधारे त्या व्यक्तीने १०० दिवस मृत्यूशी झुंज दिली आहे.” ते म्हणाले की, शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्णाच्या छातीत अजिबात कळा येत नव्हत्या. दात्याकडून नैसर्गिक हृदय मिळण्यापूर्वी तो त्याचे दैनंदिन जीवन अगदी व्यवस्थितपणे जगत होता. रस्त्यावरून पायी चालणं, मॉलमध्ये जाऊन खरेदी करणं, अशी नियमित कामं तो करीत होता. हृदयदाता मिळाल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक हृदय बसवण्यात आलं, आता तो ठणठणीत बरा झाला असून, अधूनमधून सिडनीच्या सेंट रुग्णालयात उपचारासाठी येत आहे.”
बॅटरीवर चालतं कृत्रिम हृदययंत्र
ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (एबीसी) न्यूजनुसार, कृत्रिम हृदयाचं हे उपकरण १२ वर्षांच्या मुलाच्या शरीरातही बसवलं जाऊ शकतं. कारण – ते आकारानं लहान आहे. या उपकरणाद्वारे मानवी शरीराला इलेक्ट्रिकल फिल्डमधून सतत ऊर्जा मिळत असते. परंतु, कृत्रिम हृदयाला मात्र बाहेरून ऊर्जा पुरवली जाते. हे हृदययंत्र शरीरात बसविल्यानंतर त्याच्या चार्जिंगसाठी त्यातून एक तार बाहेर काढली जाते. चार्जिंग करताना कमीत कमी आवाज आणि उष्णता निर्माण होईल, याची दक्षता घेण्यात आली. एकदा हे हृदययंत्र चार्ज केलं की, ते सुमारे चार तास चालतं. बॅटरी चार्ज करण्याची आवश्यकता आहे की नाही याची सूचनाही या उपकरणातून मिळते.
जगभरात हृदयविकाराने कोट्यवधी मृत्यू
हे कृत्रिम हृदय मानवी शरीरात बसविण्यापूर्वी या प्राण्यांवर चाचणी घेण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, हृदयविकार हा जगातला सर्वाधिक जीवघेणा आजार आहे. दरवर्षी जगातील १.८ कोटी लोक हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडतात. त्याशिवाय लाखो, करोडो लोक या व्याधीनं त्रस्त असतात. हृदय प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे त्यांचा जीव वाचू शकतो. परंतु, हृदयदात्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे त्यासाठीची प्रतीक्ष यादीही मोठी आहे. ज्यामुळे रुग्णांना आणि रुग्णालयांना वर्षानुवर्षे हृदयदात्यासाठी वाट पाहावी लागते.
कृत्रिम हृदययंत्रासाठी किती खर्च आला?
ऑस्ट्रेलियन सरकारच्या मते, दरवर्षी जगभरात २३ दशलक्षांहून अधिक लोकांना हृदय प्रत्यारोपणाची गरज असते; परंतु केवळ सहा हजार लोकांनाच हृदयदात्याकडून हृदय मिळतं. उर्वरित रुग्णांना वेळेवर हृदयदाता न मिळाल्यानं त्यांचा जीव वाचवता येत नाही. अशा परिस्थितीत कृत्रिम हृदय भविष्यात लाखो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रभावी ठरू शकतं. ऑस्ट्रेलियन सरकारनं कृत्रिम हृदय सीमा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून BiVACOR उपकरण विकसित करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी सरकारनं संशोधकांना जवळपास ५० दशलक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून कृत्रिम हृदययंत्रासाठी अंदाजे १७ दशलक्ष रुपये खर्च झाल्याचं सांगितलं जातं.
हेही वाचा : हृदयविकाराचा धोका टाळता येणार? या देशाने तयार केली लस; शास्त्रज्ञांचा दावा काय?
ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री काय म्हणाले?
दरम्यान, कृत्रिम हृदययंत्र विकसित करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील संशोधक काम करीत आहेत. मेलबर्नच्या मोनाश विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधन उपक्रम, आर्टिफिशियल हार्ट फ्रंटियर्स प्रोग्रामअंतर्गत ही प्रक्रिया सुरू आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये कृत्रिम हृदययंत्रासाठी निधीची घोषणा करताना, ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री मार्क बटलर यांनी या नवकल्पनांच्या संभाव्य परिणामांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “हे नवीन तंत्रज्ञान हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण निम्म्यावर आणण्यास मदत करील. त्याशिवाय वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीमध्ये ऑस्ट्रेलियाला जागतिक आघाडीवर स्थान मिळवून देईल.
भारतातही कृत्रिम हृदययंत्र विकसित होणार?
क्वीन्सलँड विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड कैल्क्वान हे हार्ट फाउंडेशनच्या बोर्डवर काम करतात. कृत्रिम हृदययंत्राच्या नवीन चाचणीत ते सहभागी झाले नव्हते. त्यांनी या यशाला एक उत्तम तांत्रिक यश, असं संबोधलं आहे. मात्र, या तंत्रज्ञानाला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे ते किती प्रभावी ठरतं हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले. दरम्यान, कृत्रिम हृदययंत्र तयार करण्याचा प्रयोग भारतातही झाला होता. २०२३ मध्ये आयआयटी कानपूरची प्रयोगशाळा आणि हैदराबादमधील एका कंपनीमार्फत प्राण्यांवर कृत्रिम हृदययंत्राची चाचणीही घेण्यात आली होती; परंतु त्यातील निष्कर्ष समोर आले नाहीत. त्यामुळे भारतातही असं तंत्रज्ञान विकसित होईल का याची अनेकांना उत्सुकता आहे.