ज्ञानेश भुरे
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांतील पहिला कसोटी क्रिकेट सामना दोन दिवसांच्या आत संपला. दुसऱ्या महायुद्धानंतर हा दुसरा सर्वांत कमी कालावधी चाललेला कसोटी सामना ठरला. हा सामना ब्रिस्बेन येथील गॅबाच्या मैदानावर झाला. येथील खेळपट्टीवर अतिरिक्त गवत ठेवण्यात आले होते. गोलंदाजांना पहिल्या चेंडूपासून साहाय्य मिळत होते, तर फलंदाजांना खेळपट्टीवर टिकणेही अवघड गेले. त्यामुळे खेळपट्टीवर बरीच टीका झाली. पाच दिवस चालणारा कसोटी सामना इतक्या झटपट का आणि कसा संपला याविषयी…
ऑस्ट्रेलिया-आफ्रिका सामन्यात किती फलंदाज गारद झाले?
पाच दिवस चालणारा कसोटी सामना थोडा आधी संपणे हे काही नवीन नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना पूर्ण दोन दिवसही चालला नाही. हा सामना फार तर पावणेदोन दिवस चालला असे म्हणता येईल. या कालावधीत तब्बल ३४ फलंदाज गारद झाले. काएल व्हेरेन आणि ट्रॅव्हिस हेड या दोनच फलंदाजांना अर्धशतके झळकावता आली.
सामना इतक्या झटपट संपण्यामागील नेमकी कारणे कोणती?
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील गॅबा मैदानावर हा सामना झाला. या मैदानाचा इतिहास बघितला, तर येथे इतक्या झटपट कधीच सामना संपलेला नाही. प्रथम गोलंदाजी करणे येथे धाडस मानले जायचे. पण, या वेळी गॅबावर वेगळाच इतिहास घडला. वेगवान गोलंदाजांनी फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. गॅबाची खेळपट्टी हिरवीगार होती. चेंडूला अधिक उसळी मिळत होती. या खेळपट्टीवर इतके गवत ठेवले याचेच सर्वांना आश्चर्य वाटले. ऑस्ट्रेलियाचाच माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने हे आश्चर्य बोलूनही दाखवले.
विश्लेषण: मेसीशिवाय कोणी दिले अर्जेंटिनाच्या विश्वविजयात योगदान?
झटपट सामना संपण्याचे पडसाद कसे उमटू शकतात?
कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या तीनही प्रारूपांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही निकष म्हणा किंवा नियम तयार केले आहेत. सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज यांना समान संधी उपलब्ध होईल असे वातावरण असणे आवश्यक आहे. ‘आयसीसी’ने असे निकष न पाळणाऱ्या केंद्रांवर (मैदाने) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना झटपट संपल्यामुळे आता गॅबा मैदान ‘आयसीसी’च्या निरीक्षणाखाली येऊ शकते.
‘आयसीसी’ अशा वेळी काय कारवाई करते?
सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज यांना समान संधी मिळणारी परिस्थिती नसेल, तर ‘आयसीसी’ अशा केंद्रांना काळ्या यादीत टाकते आणि त्यांना दोषांक देते. खेळपट्टी निकृष्ट दर्जाची असा शेरा ‘आयसीसी’ निरीक्षकाकडून देण्यात आला, तर त्या केंद्राला एक दोषांक दिला जातो. केंद्राला असे पाच दोषांक मिळाले, तर एका वर्षासाठी त्या केंद्रावर सामने खेळविले जात नाही. दहा दोषांक झाल्यावर ही कारवाई दोन वर्षांसाठी असते.
अलीकडच्या काळात अशी कारवाई कुणावर झाली आहे का?
अशा प्रकारच्या कारवाईत अनेकदा उपखंडातील म्हणजे भारत, पाकिस्तान, श्रीलंका येथील केंद्रांवर झाली आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या केंद्रावर (रावळपिंडी) अशी कारवाई करण्यात आली. ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्यापेक्षा या सामन्याची परिस्थिती अगदी विरोधी होती. हा सामना पाच दिवस चालला. पण, पाच दिवसांत हजारहून अधिक धावा झाल्या. एकूण सात फलंदाजांची शतके नोंदली गेली. येथे गोलंदाजांना साथ मिळाली नाही म्हणून रावळपिंडी येथील केंद्राला ‘आयसीसी’ने एक दोषांक दिला आहे. या केंद्राच्या नावावर आता दोन दोषांक जमा झाले आहेत.
यापूर्वी सर्वांत कमी दिवसात कुठला सामना संपला होता?
दोन दिवसांच्या आत कसोटी सामना संपण्याची ही कसोटी क्रिकेट इतिहासातील दुसरी घटना घडली. यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामनाही (अहमदाबाद, २०२१) दोन दिवसांच्या आत संपला होता. ऑस्ट्रेलियात यापूर्वी १२ फेब्रुवारी १९३२ रोजी मेलबर्न मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा सामना असाच दोन दिवसांच्या आत संपला होता.
कमी चेंडू खेळला गेलेला हा सामना कितवा ठरला?
त्याचबरोबर हा सामना सर्वांत कमी चेंडूंत संपणाराही दुसरा सामना ठरला. दुसऱ्या महायुद्धानंतर कमी चेंडूत संपणारा हा सातवा सामना ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात १२ फेब्रुवारी १९३२ रोजी झालेला सामना सर्वांत कमी म्हणजे ६५६ चेंडूंत संपला होता. आता याच दोन संघांदरम्यानचा सामना ८६६ चेंडूंत संपला. गेल्या वर्षी भारत आणि इंग्लंडदरम्यान अहमदाबाद येथे झालेला सामना ८४२ चेंडूंत संपला होता.