संदीप कदम
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीला ७ जूनपासून सुरुवात होणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या दोन वर्षांतील दमदार कामगिरीच्या बळावर अंतिम लढतीत स्थान मिळवले आहे. त्यांच्यासमोर भारताचे आव्हान असेल. या लढतीत ऑस्ट्रेलियन संघाला विजयाची कितपत संधी असेल आणि जेतेपद पटकावण्यासाठी त्यांची कोणत्या खेळाडूंवर भिस्त असेल याचा घेतलेला हा आढावा.
सलामीची मदार ख्वाजा, वॉर्नरवर…
गेल्या काही काळापासून डावखुरा सलामीवीर उस्मान ख्वाजा चांगल्या लयीत आहे. भारताविरुद्ध झालेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ख्वाजाने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. दिल्ली येथील कसोटी सामन्यात त्याने ८१, इंदूर कसोटीत ६०, तर अहमदाबाद कसोटीत १८० धावांची शतकी खेळी केली. या वर्षात त्याने ५ कसोटी सामन्यांत ५२८ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील सर्वाधिक धावा त्याने भारताविरुद्ध केल्या असून ४ कसोटीत ३३३ धावा त्याच्या नावे आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांचा प्रयत्न त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा असेल. दुसरीकडे, जागतिक क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज असलेला डेव्हिड वॉर्नर मात्र तितका लयीत नाही. त्याला धावांसाठी झगडावे लागत आहे. तरीही वॉर्नरला कमी लेखण्याची चूक भारत करणार नाही. यावर्षी वॉर्नरला केवळ तीन सामनेच खेळण्यास मिळाले. त्यात त्याला केवळ ३६ धावाच करता आल्या. तसेच गेल्या काही काळापासून त्याला दुखापतींचा सामना करावा लागला आहे. वॉर्नरला लय सापडल्यास तो कोणत्याही संघाविरुद्ध आक्रमक खेळी करण्यास सक्षम आहे.
मधल्या फळीत स्मिथ, लबूशेन, ग्रीनवर लक्ष
ऑस्ट्रेलियन संघाची सर्वांत भक्कम बाजू त्यांची मध्यक्रमातील फलंदाजी आहे. मध्यक्रमात संघाकडे कॅमरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांसारखे फलंदाज आहेत, जे कुठल्याही सामन्याचे चित्र पालटण्यात सक्षम आहेत. स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या सर्वांत यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. भारताविरुद्ध त्याची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. त्याने भारताविरुद्ध १८ सामने खेळताना १८८७ धावा केल्या आहेत. यावर्षीही त्याने ५ सामन्यांत २४९ धावा केल्या. इंग्लंडमधील वातावरणात खेळण्यास स्मिथला आवडते. त्यामुळे स्मिथला रोखण्याचे आव्हान भारतासमोर असेल. गेल्या काही काळात मार्नस लबूशेनने ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक कामगिरी बजावली आहे. त्याने यावर्षी खेळलेल्या ५ कसोटी सामन्यांत ३२३ धावा केल्या आहेत. तसेच २०१९ पासून भारताविरुद्ध खेळलेल्या ९ सामन्यांत त्याने ७०८ धावा केल्या असून इंग्लंडमध्येही त्याने ५०च्या सरासरीने धावा केल्या आहेत. संघातील सर्वांत युवा खेळाडू कॅमेरुन ग्रीनकडूनही संघाला अपेक्षा असतील. ग्रीनकडे २० कसोटी सामन्यांचाच अनुभव आहे. मात्र, आपल्या छोटेखानी कारकीर्दीतही त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सला ‘प्ले-ऑफ’पर्यंत पोहोचवण्यात त्याने निर्णायक भूमिका पार पाडली. तसेच भारतीय गोलंदाजांविरुद्ध खेळण्याचा चांगला अनुभव त्याला मिळाला आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यांना ॲलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड यांसारख्या फलंदाजांचीही साथ मिळेल.
कमिन्स, बोलँड, नेसर, स्टार्कवर वेगवान माऱ्याची जबाबदारी…
जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये मिचेल स्टार्कचे नाव घेतले जाते. त्याने गेल्या दहा वर्षांत भारताविरुद्ध खेळलेल्या १७ सामन्यांत ४४ बळी मिळवले आहेत. इंग्लंडमध्ये खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये स्टार्कने ३३ बळी आपल्या नावे केले आहेत. त्यातच इंग्लंडमधील वातावरण वेगवान गोलंदाजांना पूरक असल्याने स्टार्क अधिक घातक होतो. त्याला अनुभवी गोलंदाज व कर्णधार पॅट कमिन्सची साथ मिळेल. गेल्या पाच वर्षांत त्याची भारताविरुद्ध कामगिरी चांगली राहिली आहे. कमिन्सने १२ सामन्यांत ४६ गडी बाद केले आहेत. इंग्लंडमध्येही त्याने ५ सामन्यांत २९ बळी मिळवले आहेत. अनुभवी गोलंदाज जॉश हेझलवूडने दुखापतीमुळे माघार घेतल्याने संघाला फटका बसला. त्याच्या जागी मायकल नेसरला संधी देण्यात आली आहे. नेसरने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून ७ गडी बाद केले आहेत. स्कॉट बोलँडचाही पर्याय ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत ७ सामन्यांत २८ गडी बाद केले. ग्रीनही उपयुक्त वेगवान गोलंदाजी करतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा सध्यातरी भक्कम दिसत आहे.
फिरकीची भिस्त अनुभवी लायनवर
भारतीय फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची जबाबदारी अनुभवी ऑफ-स्पिनर नेथन लायनच्या खांद्यावर असेल. लायनने अनेकदा भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले आहे. अचूक टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी करणे यामध्ये लायन पारंगत आहे. जगातील कुठल्याही खेळपट्टीवर तो फलंदाजांसमोर आव्हान उपस्थित करतो. भारताविरुद्ध खेळलेल्या २६ कसोटी सामन्यांत त्याच्या नावे ११६ बळी आहेत. यावरून त्याचे संघातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होते. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना पूरक असणाऱ्या वातावरणातही त्याने १३ सामन्यांत ४५ गडी बाद केले आहेत. त्यामुळे या निर्णायक सामन्यात त्याची भूमिका महत्त्वाची असेल. ऑस्ट्रेलियन संघात युवा फिरकीपटू टॉड मर्फीचाही समावेश आहे. मर्फीने भारताविरुद्ध झालेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेत आपल्या कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली. त्याने ४ सामन्यांत १४ गडी बाद केले. मात्र, ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ केवळ एकाच फिरकीपटूसह (लायन) खेळणे अपेक्षित आहे.