ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत होताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन सहायक इमिग्रेशन मंत्री मॅट थिस्लेथवेट यांनी सोमवारी त्यांच्या नवी दिल्ली भेटीदरम्यान ‘वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा’ सुरू करण्याची घोषणा केली. मंत्र्यांनी नमूद केले की, या धोरणांतर्गत भारतीय समुदायातील तरुण सदस्यांना ऑस्ट्रेलियन जीवन आणि संस्कृती अनुभवण्याची संधी मिळणार आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. परंतु, ‘वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा’ नक्की काय आहे? याचा भारतीयांना नक्की कसा फायदा होणार? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा नक्की आहे तरी काय?

वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसाच्या अंतर्गत भारतातील तरुण एक वर्षासाठी ऑस्ट्रेलियाला भेट देऊ शकतात आणि सुटीच्या वेळी काम करू शकतात किंवा अभ्यास करू शकतात. प्रत्येक वर्षात या धोरणांतर्गत ऑस्ट्रेलिया १८ ते ३० वयोगटातील १,००० पात्र भारतीय नागरिकांना फर्स्ट वर्क आणि हॉलिडे व्हिसा देऊ करणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी भारत ऑस्ट्रेलियाचा ५० वा वर्किंग हॉलिडे मेकर भागीदार देश म्हणून या उपक्रमात अधिकृतपणे सामील झाला. ही भागीदारी ऑस्ट्रेलिया-भारत आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (AI-ECTA) अंतर्गत झाली. वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसाची अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आली आणि आधीच ४० हजार तरुण भारतीयांनी हा व्हिसा अपडेट करण्यासाठी अर्ज केला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने भारताव्यतिरिक्त, चीन आणि व्हिएतनामसाठी या व्हिसापूर्व अर्ज (मतपत्रिका) प्रक्रियेची सुरुवात केली आहे.

हेही वाचा : मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टवर का आहे?

याचा काय फायदा होणार?

पात्र भारतीय पासपोर्टधारक १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान व्हिसा मतपत्रिकेसाठी ऑनलाइन नोंदणी सबमिट करू शकतात. विशेष म्हणजे प्रत्येक मतपत्रिकेत फक्त एकदाच नोंदणी करता येते. ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन अधिकारी १४ ऑक्टोबर ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत नोंदणीकर्त्यांमधून निवड करतील. अर्ज करण्यासाठी निवडलेल्यांना ईमेलद्वारे सूचित केले जाईल. व्हिसाची किंमत ६५० डॉलर्स आहे. “लोक मतपत्रिकेच्या प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी २५ डॉलर्स देऊ शकतात. मतपत्रिका संगणकाद्वारे निवडली जाते. त्यामुळे यात मानवी सहभाग अजिबात नाही. त्या अर्जदारांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य आणि त्यांच्या इतिहासाची तपासणी केली जाईल,” असे थिस्लेथवेट म्हणाले.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत होताना दिसत आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

त्यासाठी कोण पात्र?

१८ ते ३० वयोगटातील भारतीय मतपत्रिकेसाठी पात्र आहेत. वैध पासपोर्टसह व्यक्तीकडे राष्ट्रीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे; अर्थात पॅन कार्ड. तुम्ही नोंदणी करता तेव्हा एखादी व्यक्ती ऑस्ट्रेलियात किंवा ऑस्ट्रेलियाबाहेर असू शकते. परंतु, जर त्या व्यक्तीची निवड केली गेली असेल, तर ती व्यक्ती केवळ ऑस्ट्रेलियाबाहेरून; प्रथम वर्क आणि हॉलिडे व्हिसासाठी अर्ज करू शकते.

नोंदणी कशी करावी?

पात्र चिनी, भारतीय व व्हिएतनामी पासपोर्टधारक मतपत्रिकेसाठी नोंदणी करण्यासाठी ‘ImmiAccount’मधील ‘नवीन अर्ज’अंतर्गत ‘व्हिसापूर्व नोंदणी अर्ज’ आणि त्याबाबतची प्रक्रिया खालीलप्रमाणे :

-नोंदणी करण्यासाठी वर्क आणि हॉलिडे व्हिसा (४६२)वर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर एक नोंदणी अर्ज (फॉर्म) दिसेल.

-नोंदणी करण्यासाठी तुमच्या देशाची निवड करा.

-नोंदणी पूर्ण करण्यासाठी अर्जामध्ये पूर्ण माहिती भरा आणि नोंदणी शुल्क भरा.

-ImmiAccount’वर लोकांना नोंदणी अर्ज सेव्ह करून ठेवण्याचीदेखील परवानगी मिळते. म्हणजेच अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर तुम्ही तो सेव्ह करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा शुल्क भरून, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

-नोंदणी कालावधी संपण्यापूर्वी नोंदणी शुल्क भरले आहे आणि जतन केलेला नोंदणी अर्ज सबमिट केला गेला आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे. भारतीयांना कसा फायदा होईल?

इमिग्रेशनचे सहायक मंत्री मॅट थिस्लेथवेट म्हणतात की, वर्किंग हॉलिडे व्हिसा तरुण भारतीयांना ऑस्ट्रेलियन जीवनशैली आणि संस्कृती अनुभवण्यास मदत करील. “ऑस्ट्रेलियात येणारा प्रत्येक भारतीय तिथल्या कोणाला तरी ओळखतो. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे आणि आमचे नागरिक असलेल्या जवळपास एक दशलक्ष लोकांचा भारतीयांशी काही ना काही संबंध आहे आणि तरुण भारतीयांना आमच्या देशात येण्याची, आमची संस्कृती अनुभवण्याची ही आणखी एक संधी आहे. ऑस्ट्रेलियन लोकांना जाणून घ्या आणि त्यांच्याबरोबर मैत्री करा,” असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी नमूद केले की, हा तात्पुरता व्हिसा आहे; परंतु यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियातील जीवन कसे आहे याची माहिती मिळेल. ते पुढे म्हणाले की, लोक नंतर परत येऊन स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करू शकतात किंवा स्कील्ड व्हिसासाठी अर्ज करू शकतात.

हेही वाचा : Tapeworm Pills : लठ्ठपणा कमी करण्यासाठी टेपवर्मचा वापर? त्याचा शरीरावर किती घातक परिणाम?

ज्या नोकऱ्यांसाठी अर्ज करता येईल, त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली. “तुम्ही ऑस्ट्रेलियातील कोणत्याही उद्योगात काम करू शकता. आम्हाला आढळून आलेय की, येथे लोक आदरातिथ्य मिळेल त्या उद्योगांमध्ये काम करतात; जसे की कॅफेमध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये कृषी क्षेत्रासह विविध उद्योगांमध्ये लोकांना काम करण्याच्या संधी आहे. पण, त्याचबरोबर अभ्यासाचीही संधी आहे. ते थोड्या कालावधीसाठी का होईना; मात्र वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसाच्या अंतर्गत अभ्यास करू शकतात. जसे की, इंग्रजी भाषेची कौशल्ये सुधारणे, व्यावसायिक क्षेत्रात अनुभव घेणे किंवा एखादा छोटा कोर्स आदी सर्व संधी या व्हिसाच्या अंतर्गत उपलब्ध आहेत. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियात येणे, संस्कृतीबद्दल जाणून घेणे आणि ऑस्ट्रेलियन जीवनाचा अनुभव घेणे यासाठी ही एक संधी आहे,” असे ते पुढे म्हणाले.