Dead body on aircraft : लांब पल्ल्याचा प्रवास जलदगतीने करायचा असल्यास विमानाशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे जगभरातील अनेक लोक मोठ्या प्रमाणात विमान सेवेचा लाभ घेत आहेत. परंतु, विमानातून प्रवास करणं थोडं महागडं आणि तितकंच धोकादायक ठरू शकतं. कारण विमानाचा अपघात झाल्यास प्रवाशांचा मृत्यू जवळपास निश्चित मानला जातो. रेल्वे किंवा इतर वाहनांमधून प्रवास करताना कोणाचा मृत्यू झाल्यास संबंधित वाहनं थांबवली जातात. मात्र, विमानप्रवासात कोणाचा मृत्यू झाल्यास तसं करता येत नाही. परिणामी, प्रवाशांना मृतदेहाबरोबरच नाईलाजाने प्रवास करावा लागतो. असाच काहीसा प्रसंग ऑस्ट्रेलियातील एका जोडप्याबरोबर घडला आहे.

विमानात झाला होता महिला प्रवाशाचा मृत्यू

कतार एअरवेजच्या विमानात एका ऑस्ट्रेलियन दाम्पत्याला दुसऱ्या प्रवाशाच्या मृतदेहाशेजारी बसून प्रवास करावा लागला आहे. या जोडप्याने आपल्याबरोबर घडलेला भयानक प्रसंग एका स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितला आहे. ऑस्ट्रेलियात राहणारे मिशेल रिंग आणि जेनिफर कॉलिन्स हे दाम्पत्य सुट्ट्यांमध्ये व्हेनिसला गेले होते. मेलबर्नहून दोहाला जाणाऱ्या विमानात प्रवास करताना त्यांच्या शेजारच्या रांगेत बसलेल्या एका महिलेचा सीटवरच मृत्यू झाला.

ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने असा दावा केला की, “विमानात रिकामी जागा असूनही क्रू मेंबर्सनी महिलेचा मृतदेह सीटवरून दुसरीकडे हलवला नाही. त्यांनी मृतदेहावर फक्त एक चादर टाकून ठेवली. वारंवार विनंती करूनही क्रू मेंबर्सनी आम्हाला दुसरीकडे जागा उपलब्ध करून दिली नाही. परिणामी मृतदेहाशेजारी बसून आम्हाला चार तास प्रवास करावा लागला. हा प्रकार चीड आणणारा होता”, असा संताप दाम्पत्याने व्यक्त केला.

आणखी वाचा : Chhava Movie : ‘छावा’प्रमाणेच ‘या’ पाच चित्रपटांनीही केलं प्रेक्षकांच्या मनावर राज्य; सर्वाधिक कमाई कुणाची?

ऑस्ट्रेलियन दाम्पत्य काय म्हणालं?

ऑस्ट्रेलियन जोडप्याने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मेलबर्नवरून दोहा येथे जाणाऱ्या विमानातून आम्ही प्रवास करत होतो. आमच्या शेजारील सीटवर एक महिला बसली होती. विमानाने उड्डाण भरल्यानंतर काही वेळाने संबंधित महिला वॉशरूममध्ये गेली. तेथून परत आल्यानंतर तिला प्रचंड अस्वस्थ वाटू लागले. आम्ही तिच्या तब्येतीची विचारपूस करत होतो, त्याचवेळी महिला अचानक चक्कर येऊन खाली पडली. विमानात असलेल्या क्रू मेंबर्सनी महिलेची मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुर्देवाने तिचा मृत्यू झाला होता. हे पाहून आमच्या मनाला खूप वेदना झाल्या, असं दाम्पत्याने सांगितलं.

मृतदेह सीटवरच का ठेवण्यात आला?

मिशेल रिंग म्हणाल्या की, विमानातील क्रू मेंबर्सनी महिलेचा मृतदेह बिझनेस क्लासकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना खूपच अडचणी येत होत्या. नंतर त्यांनी महिलेचा मृतदेह आमच्या बाजूला असलेल्या सीटवरच ठेवला. विमानात इतर काही जागा रिकाम्या असूनही क्रू मेंबर्सनी महिलेच्या मृतदेहाला तिकडे नेलं नाही, असा दावाही रिंग यांनी केला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मृतदेहाशेजारी बसून प्रवास करणं आम्हाला खूपच जड जात होतं, त्यामुळे आम्ही क्रू मेंबर्सकडे दुसऱ्या सीट्ची मागणी केली. मात्र, त्यांनी आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

विमानाचे लँडिग झाल्यानंतर काय घडलं?

मिशेल रिंग यांचे पती जेनिफर कॉलिन्स यांनी सांगितले की, क्रू मेंबर्सनी महिलेच्या मृतदेहावर एक चादर टाकली. त्यानंतर आम्हाला चार तास मृतदेहाशेजारी बसून प्रवास करावा लागला. जेव्हा विमान धावपट्टीवर उतरले, तेव्हा तिथे वैद्यकीय पथक आणि पोलिस हजर होते. त्यांनी विमानातील प्रवाशांना जागेवरच बसून राहण्याचे सांगितले. जवळपास तासाभरानंतर सदरील महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेने शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. कॉलिनने या अनुभवाचे वर्णन दुःखद असं केलं आहे. अशा प्रकरणांमध्ये कर्मचारी आणि प्रवाशांची काळजी घेण्यासाठी ठोस उपाययोजना असायला हव्या, असंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रवाशांची काळजी घेण्यासाठी प्रोटोकॉल हवा

पुढे बोलताना कॅलिन्स म्हणाले, “आम्हाला समजते की, त्या महिलेच्या मृत्यूसाठी एअरलाइन्सला जबाबदार धरता येणार नाही. परंतु, अशा घटनांनंतर विमानातून प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांची काळजी घेण्यासाठी एक प्रोटोकॉल असायला हवा.” दरम्यान, कतार एअरवेजने महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारे निवेदन जारी केले आहे. “या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयी आणि त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे. आमच्या धोरणांनुसार आणि प्रक्रियेनुसार आम्ही प्रवाशांबरोबर संपर्क साधण्याच्या प्रयत्न करत आहोत, असंही ते म्हणाले.

विमानात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास काय नियम?

इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर विमान प्रवासात एखाद्या प्रवाशाचा अचानक मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह रिकाम्या सीटवर ठेवला जातो. अन्यथा मृत व्यक्तीशेजारी बसलेल्या प्रवाशांना दुसऱ्या सीट उपलब्ध करून दिल्या जातात. विमानात सीट उपलब्ध नसल्यास प्रवाशांना त्यांच्या मूळ सीटवरच बसण्याचा सल्ला दिला जातो. मार्गदर्शक तत्वांमध्ये असेही म्हटले आहे की, मृतदेह बॉडी बॅगमध्ये ठेवणं आवश्यक आहे. जर बॅग उपलब्ध नसल्यास त्याला चादर टाकून झाकावे लागते. मृतदेह सीटवरून खाली पडू नये यासाठी सीटबेल्टही बांधण्याच्या सूचना करण्यात येतात.

हेही वाचा : Battle of Karnal : भारतातील मुघल सत्तेचा अंत कसा झाला? कर्नालच्या लढाईत नेमकं काय घडलं?

क्रू मेंबर्सला दिले जाते वैद्यकीय प्रशिक्षण

एका क्रू मेंबरने सांगितले की, विमानात कुणाची तब्येत खराब झाल्यास त्यावर प्राथामिक उपचार करण्यासाठी आम्हाला प्रशिक्षण दिले जाते. गरज भासल्यास आम्ही कंट्रोल रुमबरोबर संपर्क करून वैद्यकीय डॉक्टरांचादेखील सल्ला घेतो. बऱ्याचदा डॉक्टर प्रवासी विमानातून प्रवास करत असतात. प्रवाशांची तब्येत खराब झाल्यास ते तत्काळ आम्हाला मदत करतात. एखाद्या प्रवाशाची प्रकृती नाजूक असल्यास पायलटला आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घ्यावा लागतो. मात्र, त्यासाठीही परवानगी घेणे आणि धावपट्टी मिळणे आवश्यक असते.

आपत्कालीन लँडिंगचा निर्णय पायलटचा

जर एखाद्या वैद्यकीय परिस्थितीमुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाले, तर वैद्यकीय पथक आधीच विमानतळावर हजर असते. विमानात चढत असताना ते प्रवाशांना सहसा जागेवरच बसून राहण्याचा सल्ला देतात. जोपर्यंत वैद्यकीय पथक संबंधित व्यक्तीची तपासणी करत नाही, तोपर्यंत त्याला मृत घोषित करता येत नाही, असंही इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलं आहे. विमानात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास वैद्यकीय परीक्षक किंवा स्थानिक अधिकारी मृतदेहाची जबाबदारी घेतात.

विमान कंपन्या मृताच्या कुटुंबीयांना कोणती मदत करतात?

मृत प्रवाशाच्या कुटुंबाला माहिती देण्याची जबाबदारी पोलिसांकडे असते. विमान कंपन्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आपले अधिकारी पाठवतात. त्यांचे समुपदेशन करून योग्य ती मदत केली जाते. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार किंवा इतर सेवांसाठी विमानाने जाण्याची आवश्यकता असल्यास कुटुंबातील सदस्यांना तिकीट उपलब्ध करून दिले जाते. एकंदरीत विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्व जबाबदारी संबंधित एअरलाईन्सवर असते.

Story img Loader