तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील २८ वर्षीय एमिली मॉर्टन सामान्य जीवन जगत होती. तिचे नुकतेच लग्न झाले होते आणि हे जोडपे प्रत्येक क्षणाचा एकत्रित आनंद घेत होते. ते लवकरच कुटुंब सुरू करण्याचा विचार करीत होते. त्यांचे आयुष्य त्यांना परिपूर्ण वाटत असताना एके दिवशी, मॉर्टनला तिच्या दातांमध्ये सातत्याने विचित्रशी वेदना जाणवू लागली. सुरुवातीला, तिला वाटले की, हे काहीतरी किरकोळ आहे; परंतु ती वेदना आणखीनच वाढत गेली. एमिली मॉर्टनने दंतचिकित्सकाला दाखवले असता, कोणतेही निदान होऊ शकले नाही. परंतु, काही दिवसांतच वेदना असह्य झाली आणि ती वेदना तिच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी पसरली. मॉर्टनने news.com.au वर सांगितले , “तुमच्या प्रत्येक दातावर २४ तास दंतचिकित्सक ड्रिल करीत असल्याची कल्पना करा, अशा स्वरूपाची ही वेदना असते आणि वेदना थांबविण्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक दंतचिकित्सक आणि डॉक्टरांना भेट देऊनही, कोणीही तिच्या वेदनेचे कारण शोधू शकले नाही. मॉर्टनने तिला काय होत आहे हे ओळखण्यासाठी मेंदूची स्कॅनिंग आणि रक्त चाचण्या सुरू केल्या. अखेरीस तिला ॲटिपिकल ट्रायजेमिनल न्यूराल्जियाचे निदान झाले. या स्थितीला सुसाईड डिसीज म्हणूनही ओळखले जाते. पण, हा आजार नक्की काय आहे? या आजाराला ‘सुसाईड डिसीज’ का म्हटले जाते? त्याविषयी जाणून घेऊ.

ट्रायजेमिनल नर्व्हमुळे ज्या वेदना होतात, त्यांना ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणून ओळखले जाते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : २६/११ दहशवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानात मृत्यू; कोण होता अब्दुल रहमान मक्की?

‘सुसाईड डिसीज’ म्हणजे काय?

‘ॲरिझोना पेन’च्या मते, ‘सुसाईड डिसीज’ हा आजार म्हणजे ट्रायजेमिनल न्यूराल्जिया नावाची स्थिती आहे. ट्रायजेमिनल नर्व्हमुळे ज्या वेदना होतात, त्यांना ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणून ओळखले जाते. ट्रायजेमिनल नर्व्हमध्ये होणारी वेदना अत्यंत तीव्र असते. चेहऱ्यावरील दोन्ही बाजूच्या गालावर, ओठांवर, नाकात, हिरडीवर स्पर्श झाल्यास तीव्र वेदना जाणवते. सामान्य ट्रायजेमिनल मज्जातंतूंमध्ये जाणवणारी वेदना चेहऱ्याच्या एका बाजूला प्रभावित करते; तर मॉर्टनच्या प्रकरणात तिला दोन्ही बाजूंना वेदना होतात, ज्यामुळे ही स्थिती आणखीनच गंभीर होती. मॉर्टनने सांगितले की, तिला तिच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी स्पर्श केल्यास ‘विजेचे झटके’ जाणवू लागले. “मी हसले, बोलले आणि खाल्ले किंवा कोणतीही सामान्य गोष्ट केल्यास त्रास होतो. या वेदनांचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. हे विजेचा धक्का बसण्यासारखे आहे, या वेदनांमुळे तुम्हाला जमिनीवर पडून ओरडावेसे वाटते,” असे ती म्हणाली.

news.com.au नुसार, डॉक्टरांनी मॉर्टनला सांगितले की, ही सर्वांत वेदनादायक स्थिती आहे. या विकाराला सुसाईड डिसीज, असे विचित्र टोपणनाव देण्यात आले. कारण- ज्यांना हा त्रास होतो, त्यांना खूप वेदना होतात आणि या त्रासाने ग्रस्त लोक मरण्याची इच्छा व्यक्त करतात. अमेरिकन असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजिकल सर्जनच्या मते, दरवर्षी १,५०,००० लोकांना ट्रायजेमिनल न्यूराल्जियाचे निदान केले जाते. हा विकार कोणत्याही वयात उद्भवू शकतो; परंतु ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हा आजार सर्वांत सामान्य आहे.

‘सुसाईड डिसीज’ हा आजार म्हणजे ट्रायजेमिनल न्यूराल्जिया नावाची स्थिती आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया कशामुळे होतो?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, जेव्हा ट्रायजेमिनल मज्जातंतूचे नुकसान झाल्यास किंवा त्या संकुचित झाल्यास, हा आजार उद्भवू शकतो. जेव्हा एक तर धमनी किंवा रक्तवाहिनी मस्तिष्काजवळील ट्रायजेमिनल नर्व्हला संकुचित करते किंवा तिच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणते, तेव्हा या वेदना सुरू होतात. या कॉम्प्रेशनमुळे न्यूरोपॅथिक वेदना होतात. रक्तवाहिनीचे आकुंचनाची अनेक कारणे आहेत. मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा तत्सम विकार जे मज्जातंतूंच्या आसपासच्या संरक्षणात्मक मायलिन आवरणाला हानी पोहोचवतात, यांसारख्या परिस्थितीमुळेदेखील ट्रायजेमिनल न्यूराल्जिया होऊ शकतो.

परंतु, एमिली मॉर्टनसाठी तिच्या स्थितीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. असंख्य चाचण्या आणि उपचार करूनही तिला हा आजार कसा झाला, याचे कारण उद्भवू शकले नाही. “आम्ही वेदनांचे कारण आणि प्रभावी उपचार शोधण्यासाठी हजारो डॉलर्स खर्च केले आहेत,” असे तिने सांगितले. “मला थोडा आराम मिळावा, उपचार मिळावेत म्हणून आम्ही आंतरराज्यीय आणि परदेशातही प्रवास केला आहे. हे कारण शोधण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. या परिस्थितीने माझ्याकडून सर्व काही घेतले आहे. हा आजार माझे संपूर्ण अस्तित्व ताब्यात घेत आहे,” असे मॉर्टन पुढे म्हणाली.

ट्रायजेमिनल न्यूराल्जियाचा उपचार कसा केला जातो?

ट्रायजेमिनल न्युरेल्जियाशी संबंधित वेदनांचे व्यवस्थापन करणे गंभीर आहे. कारण- ही स्थिती अत्यंत नाजूक आहे. अॅरिझोना पेनच्या मते, ट्रायजेमिनल न्यूराल्जियावर उपचार करण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध आहेत, ज्यामुळे रुग्णांना आराम मिळण्याची आशा असते. मॉर्टनवर सध्या MRI-गाइडेड फोकस्ड अल्ट्रासाऊंड नावाची अत्याधुनिक प्रक्रिया केली जात आहे, जी अलीकडे ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध झाली आहे. हे अभिनव तंत्र वेदना सिग्नल्समध्ये व्यत्यय आणण्यासाठी मेंदूच्या एका विशिष्ट भागातील थॅलेमसला लक्ष्य करण्यासाठी केंद्रित अल्ट्रासाऊंड लहरींचा वापर करते. या प्रक्रियेमुळे मॉर्टनला आराम मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : तिबेटमधील चीनच्या महाकाय धरणामुळे वाढली भारताची चिंता; कारण काय?

परंतु, ही उपचार पद्धती सध्या त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि मेडिकेअरमध्ये समाविष्ट नाही. याची प्रक्रिया, प्रवास व पुनर्वसन यांसह एकूण खर्च ४०,००० डॉलर्सपेक्षा जास्त आहे. “२०२४ मध्ये मला विश्वास आहे की, कुठेतरी तंत्रज्ञान असले पाहिजे, जे किमान मदत करू शकेल. माझी योजना अदृश्य गूढ आजार असलेल्या लोकांसाठी माझे जीवन समर्पित करण्याची आहे,” अशी प्रतिक्रिया मॉर्टनने व्यक्त केली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian woman diagnosed with suicide disease rac