अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार सून १६ जानेवारीपासूनच त्याच्याशी संबंधित विविध विधींना सुरुवात होणार आहे. प्राणप्रतिष्ठेचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर मूर्तीमध्ये प्राण अर्थात जीव प्रस्थापित करणे. वेद आणि पुराणांमधील विविध परंपरांनुसार हा विधी पार पाडला जातो. यातील प्रत्येक विधीचं महत्त्व वेगवेगळं आहे.
प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय? ती कशा पद्धतीने केली जाते? पूजा करणारी व्यक्ती मूर्तीमध्ये कशाप्रकारे प्राण फुंकू शकते? हिंदू धर्मातील परंपरांमध्ये निसर्गाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. हिंदू परंपरेनुसार भक्त आणि आणि सर्वोच्च शक्ती हे एकमेकांना पूरक मानले जातात.
प्राणप्रतिष्ठा काय असते?
प्राणप्रतिष्ठा विधीद्वारे मूर्तीचं देवतेत रूपांतर होते. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भक्तगण त्या देवतकडे प्रार्थना करु शकतात आणि देवता त्यांना आशिर्वादही देते असं मानलं जातं. यासाठी मूर्तीवर विविध विधी केले जातात, त्यानंतर मूर्तीला देवत्त्व प्राप्त होतं. सोहळा किती सर्वसमावेशक आहे यावर ही प्रक्रिया किती मोठी असणार हे ठरते.
शोभायात्रा
शोभायात्रा हा प्रक्रियेचा पहिला टप्पा मानला जातो. देऊळ ज्या परिसरात आहे तिथे मूर्तीसह शोभायात्रा काढली जाते. अयोध्येतील राम मंदिरासाठी १७ जानेवारीला शोभायात्रा काढली जाणार आहे. यात्रेदरम्यान भाविक मूर्तीची पूजा करतील, नमस्कार करतील. घोषणा देतील. त्यांचा भक्तिभाव मूर्तीत संक्रमित होईल. त्यांच्या भक्तीची ताकद मूर्तीला लाभते, अशी भाविकांची धारणा असते. भक्तगणांच्या माध्यमातून मूर्तीला देवत्व मिळण्याच्या प्रक्रियेला इथेच सुरुवात होते.
मूर्ती पुन्हा मंडपात आल्यानंतर प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात होते.
पराशर ज्योतिषालयचे डॉ. दीपकभाई ज्योतिषाचार्य यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, ‘प्राणप्रतिष्ठा ही दोन्ही प्रकारच्या मूर्तींची केली जाऊ शकते. घरात देव्हाऱ्यात ज्या मूर्ती असतात ज्यांना चल मूर्ती म्हटलं जातं त्यांचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि देवळात-मंदिरात म्हणजे जिथे मूर्ती कायमस्वरुपी किंवा स्थिर असते तिचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते’.
राजधानी दिल्लीतल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात वेदांचे प्राध्यापक डॉ. सुंदर नारायण झा यांनी सांगितलं, ‘प्राणप्रतिष्ठेवेळी मंत्रोच्चार होतात ते दोन कारणांसाठी असतात. मूर्तीमध्ये प्राण प्रस्थापित व्हावेत आणि एका मूर्तीतून दुसरीकडे ते संक्रमित व्हावेत, यासाठीही मंत्रोच्चार असतात. एखाद्या वेळेस मूर्ती भंग पावली तर ते प्राण दुसऱ्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापित करावे लागतात. जेणेकरुन या मूर्तीतली प्राणशक्ती नव्या मूर्तीमध्येही संक्रमित होते.’
अधिवास
प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज होणाऱ्या मूर्तीसाठी अधिवास तयार केला जातो. मूर्तीला अनेक गोष्टींमध्ये ठेवलं जातं. एका रात्रीकरता मूर्ती पाण्यात ठेवली जाते त्याला ‘जलाधिवास’ म्हटलं जातं. त्यानंतर मूर्ती धान्यात ठेवली जाते. त्याला ‘धान्याधिवास’ म्हटलं जातं. जेव्हा मूर्ती घडवली जाते, त्यावेळी शिल्पकाराच्या उपकरणांनी मूर्तीला कुठे ना कुठे त्रास झालेला असतो. मूर्तीला झालेला त्रास हरण व्हावा यासाठी अधिवास असतो. या प्रक्रियेचा आणखी एक अन्वयार्थ आहे. मूर्तीत एखादा दोष असेल किंवा त्रूट राहिली असेल किंवा दगड चांगल्या प्रतीचा नसेल तर ते अधिवासाद्वारे कळू शकतं असं दीपकभाई यांनी सांगितलं.
अभिषेक
अधिवासानंतर मूर्तीला विविध गोष्टींचा अभिषेक केला जातो. स्वामीनारायण संस्था संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पंचामृत, विविध फुलं आणि पानांचा गंध असलेलं मिश्रण, पाणी, याने मूर्तीला न्हाऊमाखू घातलं जातं. अभिषेक १०८ प्रकारचे असतात. सगळ्यात महत्त्वाचा सोहळा म्हणजे नेत्रोन्मिलन म्हणजे मूर्तीचे डोळे उघडणं.
नेत्रोन्मिलन
शोभायात्रा, अधिवास, अभिषेक अशा टप्प्यानंतर मंत्रोच्चाराचं पठण केलं जातं. ते देवाला केलेलं आवाहनच असतं. सूर्य म्हणजे डोळे, वायू म्हणजे कान, चंद्र म्हणजे मन अशा विविध शक्तींना विनंती केली जाते. मूर्तीचे डोळे उघडण्यासाठी प्रक्रिया केली जाते. मूर्तीच्या डोळ्यात काजळ घातलं जातं. सोन्याच्या सुईने हे अंजन (काजळ) मूर्तीच्या डोळ्यांना लावलं जातं. ही प्रक्रिया मूर्तीच्या मागे उभं राहून केली जाते कारण समोरुन मूर्तीच्या डोळ्यातल्या तेजाला सामोरं जाणं कठीण असू शकतं, अशी श्रद्धा आहे.
मूळ प्रथेनुसार, मूर्तीसाठी अंजन (काजळासारखा पदार्थ) काकूड पहाडातून आणलं जाणं अपेक्षित आहे. या पहाडावर काळा दगड मिळतो. त्या दगडाची भुकटी सोहळ्यासाठी वापरली जाणं अपेक्षित होतं. पण हा पहाड आता चीनमध्ये असल्याने तूप आणि मध यांच्यापासून अंजन तयार केलं जाईल असं झा यांनी सांगितलं.
अंजन डोळ्यात घातल्यानंतर मूर्तीचे डोळे उघडतात. त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापित झालेले असतात, असं मानलं जातं. आता मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक येऊ शकतात.
या प्रक्रियेचा उल्लेख कुठे आहे?
वेदांमध्ये तसंच विविध पुराणांमध्ये उदाहरणार्थ मत्स्यपुराण, वामन पुराण, नारद पुराणामध्ये प्राणप्रतिष्ठेचे उल्लेख आढळतात.
प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नाही अशी मूर्ती असते का?
गंडकी नदीत आढळणारा शाळिग्राम आणि नर्मदा नदीपात्रातील नर्मदेश्वर शिवलिंग यांना प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते, असं झा यांनी सांगितलं. या दोहोंमध्ये मूळत: अध्यात्मिक शक्ती असते.
काम सुरू असलेल्या देवळात प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकते का?
दीपकभाई यांच्या मते देऊळ उभारणीचं काम पूर्णत्वास जाण्यापूर्वी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हायला हवी. प्राणप्रतिष्ठेसाठी गाभाऱ्याचं काम पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे.