अयोध्येच्या राम मंदिरातील राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य राजकीय नेते उपस्थित होते. या सोहळ्याला सिने क्षेत्रातील तारे-तारका, तसेच इतर क्षेत्रांतील दिग्गजही उपस्थित होते. काही दिवसांपासून या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरात चर्चा होती. संपूर्ण देश राममय होण्यात समाजमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. Vlog, रील्स, फोटो यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे एखाद्या सोहळ्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स यांनी काय भूमिका बजावली? समाजमाध्यमांवर या काळात नेमके काय चालू होते? हे जाणून घेऊ…
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात एन्फ्लुएन्सर्सची भूमिका काय?
गेल्या महिनाभरापासून राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची चर्चा होती. समाजमाध्यमांवर तर सगळीकडे प्रभू रामाचेच फोटो, व्हिडीओ शेअर करण्यात येत होते. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची एवढी चर्चा होण्यात समाजमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हा सोहळा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सने महत्त्वाची भूमिका बजावली. हा सोहळा यशस्वी होण्यामागे त्यांचे योगदान हे नाकारता न येण्यासाराखे आहे.
एन्फ्लुएन्सर्सची अयोध्या यात्रा
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या चर्चेत एन्फ्लुएन्सर्सने महत्त्वाची भूमिका बजावली. उत्तर प्रदेशमधील अयोध्या एक पर्यटनस्थळ असल्याची प्रतिमा या एन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून निर्माण झाली. या काळात एन्फ्लुएन्सर्सने Vlog, रील्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली; ज्यामुळे हा सोहळा प्रत्येक घराघरात पोहोचला. समाजमाध्यमांमुळे देशातील प्रत्येक नागरिकाने एका प्रकारे अयोध्येतील रामलल्लाचे ऑनलाइन पद्धतीने दर्शनच घेतले. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला प्रसिद्धी मिळावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारने काही सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्सना नियुक्त केले होते. त्यांना राम मंदिराशी संबंधित कन्टेंटची निर्मिती करण्यास सांगण्यात आले होते.
उत्तर प्रदेश सरकारकडून २५ लाखांची तरतूद
द हिंदूच्या एका वृत्तानुसार उत्तर प्रदेश सरकारने राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. पर्यटन विभागाला हे २५ लाख रुपये देण्यात आले होते. उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाने या निधीच्या मदतीने सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर्स, तसेच अन्य माध्यमांना या सोहळ्याचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
अनेक एन्फ्लुएन्सर्सची अयोध्या वारी
१४ जानेवारीपासून साधारण ५०० एन्फ्लुएन्सर्सनी ४५०० किमीची यात्रा सुरू केली आहे. प्रभू रामाने १४ वर्षांचा वनवास पूर्ण केल्यानंतर ते तमिळनाडूतील रामेश्वरम येथून अयोध्येत आले होते. या प्रवासासाठी त्यांनी ज्या मार्गाचा वापर केला होता, त्याच मार्गाने हे एन्फ्लुएन्सर्स अयोध्येत येणार आहेत. ही यात्रा ऑल इंडिया असोशिएशनच्या राम महोत्सव यात्रा समितीने आयोजित केलेली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या अनेक नेत्यांनी या यात्रेचा प्रचार केला आहे. आगामी तीन महिने या यात्रेचे दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. देशभरातील इतर एन्फ्लुएन्सर्सदेखील अयोध्येच्या प्रवासाला निघालेले आहेत. हे एन्फ्लुएन्सर्स आपला प्रवास रेकॉर्ड करून, ते समाजमाध्यमांवर पोस्ट करीत आहेत.
रील्स, व्हीलॉग आणि बरेच काही
गेल्या काही दिवसांत एन्फ्लुएन्सर्सनी रील्स, Vlogआणि इतर बराच कन्टेंट तयार केला गेला आहे. काही एन्फ्लुएन्सर्सनी राम मंदिर उभारणीचे दस्तऐवजीकरण केलेले आहे. अनेक एन्फ्लुएन्सर्स राम मंदिराचे धार्मिक महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही महिन्यांत प्रभू रामावर रचलेल्या गीतांचा आधार घेऊन, अनेक रील्स, व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. या व्हिडीओंना हजारो, लाखोंमध्ये व्ह्युज आहेत.
समाजमाध्यमांवर लाखो रील्स
दरम्यानच्या काळात इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या रील्स पाहायला मिळाल्या. त्यातीलच एका रील्समध्ये दोन व्यक्ती छतावर बसलेल्या असतात. २२ जानेवारीच्या सोहळ्याबद्दल माहिती नसल्यामुळे यातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा गळा दाबत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या रील्सला लाखोंनी व्ह्युज आले आहेत. वेगवेगळ्या ट्रॅव्हल ब्लॉगर्सनी अयोध्येच्या प्रवासाचे व्हिडीओ समाजमाध्यमावर अपलोड केले आहेत. त्यातीलच पाच लाख सहा हजार फॉलोअर्स असलेल्या दिल्लीतील कीर्तिका गोविंदसामी या एन्फ्लुएन्सरने इकोनॉमिक टाइम्सला प्रतिक्रिया दिली होती. “मी राम मंदिरावर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दोन रील्स आणि व्ही लॉग तयार करण्याचा विचार करीत आहे,” असे या एन्फ्लुएन्सरने म्हटले होते.
अनेक नव्या गाण्यांची निर्मिती
राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान काही नवी गाणी काढण्यात आली. त्यामध्ये जुबिन नौटियाल याने मेरे घर राम आयेंगे हे गाणे गायले. या गाण्याला गेल्या काही दिवसांत चांगलीच प्रसिद्धी मिळाली. साधारण २.७ दशलक्ष रील्समध्ये या गाण्याचा वापर करण्यात आला. राम आयेंगे हेदेखील असेच एक प्रसिद्ध गीत आहे. त्याचाही लाखो रील्समध्ये वापर करण्यात आला.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा हॅशटॅग ट्रेंडिंगवर
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान एक्सवर Ram Mandir Pran Pratistha हा हॅश टॅग चांगलाच ट्रेंडिंगवर होता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून प्रभू रामाचे काही फोटो तयार करण्यात आले होते. या फोटोंची मदत घेऊन, तसेच भक्तिगीतांचा वापर करून Ram Mandir Pran Pratistha या हॅशटॅगसह प्रभू रामाचे फोटो अपलोड करण्यात येत होते. इन्स्टाग्रामवर तर अशा फोटोंची लाटच आली होती.
“लोकांना अयोध्या, सनातन धर्माची माहिती व्हायला हवी”
द क्विंट या वृत्त-संकेतस्थळाने अमित राव नावाच्या डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या अशाच एका एन्फ्लुएन्सरशी चर्चा केली. “लोकांना अयोध्येविषयीची माहिती मिळावी, त्यांना अयोध्या समजावी असा माझा उद्देश आहे. लोकांना प्रभू राम, सनातन धर्माचीही माहिती व्हायला हवी. विशेषरूपाने तरुणांना प्रभू रामाविषयीची माहिती मिळणे गरजेचे आहे,” असे राव या एन्फ्लुएन्सरचे मत आहे. २०२१ मध्ये राव अयोध्येत स्थलांतरित झाला होता. तो धार्मिक स्वरूपाचे कन्टेंट तयार करतो. त्यांने काही दिवसांपूर्वी अयोध्येतील दीपोत्सवाचा एक व्हिडीओ केला होता. या व्हिडीओला लोकांची चांगलीच पसंती मिळाली होती. इन्स्टाग्रामवर अयोध्यावाले नावाचे एक पेज आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी राम मंदिराचे भूमि्पूजन झाले होते. तेव्हापासून या पेजवर अयोध्या, राम मंदिर याविषयी माहिती दिली जाते. हे पेज हर्षवर्धन पटेल नावाची व्यक्ती चालवते. “रोज आम्हाला लाखो लोक फॉलो करीत आहेत. प्राणप्रतिष्ठापनेच्या या कार्यक्रमामुळे फॉलोअर्सची संख्या वाढत आहे. आमचे हे काम हंगामी स्वरूपाचे आहे. दीपोत्सवासारख्या कार्यक्रमादरम्यान आम्हाला फॉलो करणाऱ्यांची संख्या वाढतेय,” असे पटेल यांनी सांगितले.
अनेक कलाकारांची उपस्थिती
दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमादरम्यान समाजमाध्यमावर अनेक व्हिडीओंमध्ये अयोध्या, राम मंदिर याविषयीची माहिती देण्यात आली. काही व्हिडीओ माहितीपूर्ण होते. मात्र, याच काळात काही व्हिडीओ, रील्सच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचाही प्रयत्न झाल्याचे दिसून आले. एन्फ्लुएन्सर्सव्यतिरिक्त सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनीदेखील राम मंदिर सोहळ्यादरम्यान अनेक व्हिडीओ, रील्स शेअर केल्या होत्या. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला यातील अनेक कलाकार उपस्थित होते. त्यामध्ये अमिताभ बच्चन, चिरंजीवी, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट आदी कलाकारांचा समावेश होता.