वसई विरारचे अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असलेले बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यासह बविआच्या तिन्ही आमदारांचा या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव चर्चेचा विषय बनला आहे. भाजपच्या तरुण उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांनी त्यांचा पराभव केला. ठाकुरांचा पराभव का झाला? बविआचे राजकीय भवितव्य काय? याचा घेतलेला आढावा
हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व कसे वाढले?
कुख्यात डॉन भाई ठाकूर यांचे बंधू हितेंद्र ठाकूर यांना १९९० च्या वसईतील समाजवाद्यांचा अभेद्य किल्ला भेदण्यासाठी शरद पवार यांनी विधानसभेचे तिकिट दिले. पहिल्याच निवडणूकीत ते कॉंग्रसेचे आमदार झाले. नंतर आरोपांमुळे त्यांनी पक्ष सोडला आणि १९९५ पासून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकून येत राहिले. १९९० पासून हितेंद्र ठाकूर यांनी ६ वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि प्रत्येक निवडणुकीत ते जिंकून आले. २००९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. तो अपवाद वगळता ९० पासून वसई विरार मध्ये त्यांचे वर्चस्व होते. वसई-विरारमधील ग्रामपंचायती, पंचायत समिती, तत्कालीन ४ नगरपरिषदा यांच्यावर त्यांचे निर्विवाद वर्चस्व होते. नंतर त्यांनी बहुजन विकास आघाडी या पक्षाची स्थापना केली. २००९ साली वसई विरार महापालिकेची स्थापना झाली. पालिकेची सत्ता तेव्हापासून त्यांच्याकडे आहे. २००९ ला नव्याने तयार झालेल्या नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघातही त्यांचे आमदार होते.
ठाकूर यांची बलस्थाने काय होती?
ठाकुरांचा बहुजन विकास आघाडी हा स्थानिक पक्ष होता. तळागाळात त्यांनी कार्यकर्त्यांची फौज तयार केली. कार्यकर्त्यांना विविध व्यवसायात स्थिरस्थावर केले. आर्थिक स्थैर्य असल्याने कार्यकर्ते मोठ्या संख्येने तयार होत गेले. सहकार, शिक्षण, कला क्रिडा धार्मिक संस्था आदींवर त्यांनी पकड मिळवली. सर्व समाजाला प्रतिनिधित्व देत गेले. सर्व पक्षात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. अपक्ष असले तर प्रत्येक सरकारला पाठिंबा देत गेले. त्यामुळे वसई, विरारमध्ये इतर पक्ष मोठे होऊ शकत नव्हते.
हेही वाचा >>> भारतातील पहिली ‘AI-Mom’; सोशल मीडियावर चर्चेत असलेली काव्या मेहरा आहे तरी कोण?
बविआच्या साम्राज्याला सुरुंग कधीपासून?
लोकसभा निवडणूकीत २०१४ पासून बविआच्या उमेदवारांचा पराभव होत होता. मात्र विधानसभेत त्यांचे तीन आमदार जिंकून येत होते. यंदा तिन्ही विधानसभा मतदारसंघांत बविआचा पराभव झाला तरी पहिला धक्का त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. पालघर मतदारसंघातून उमेदवारी मिळालेले पक्षाचे आमदार राजेश पाटील यांचा पराभव तर झाला पण ते तिसर्या स्थानावर फेकले गेले. २०१४ मध्ये विलास तरे हे बोईसरमधील बविआ पक्षाचे आमदार होेते. २०१९ मध्ये विलास तरे यांनी पक्ष सोडला. याच तरे यांनी महायुतीत जाऊन यंदा बविआच्या राजेश पाटील यांचा पराभव केला.
स्नेहा दुबे पंडित ‘जायंट किलर’ कशा ठरल्या?
स्नेहा दुबे पंडित या माजी आमदार विवेक पंडित यांच्या कन्या. त्या राजकारणातही सक्रिय नव्हत्या. त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी भाजपतर्फे तिकिट जाहीर करण्यात आले आणि पक्षात प्रवेश दिला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली असून ३८ वर्षांच्या महिला उमेदवार होत्या. भाजपने वसई मतदारसंघात भक्कम जाळे तयार केले होते. विवेक पंडित यांनी स्थापन केलेल्या श्रमजीवी संघटनेचे वसई मतदारसंघात १७ हजार सदस्य आहेत. त्याचाही त्यांना लाभ झाला. लाडकी बहीण योजनेचा त्यांची जोरात प्रचार केला. माजी मंत्री स्मृती इराणी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, गुजराथचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या सभा त्यांना फायदेशीर ठरल्या. दफनभूमीला केलेला कडक विरोध स्थानिकांना भावला. एकमेव तरुण महिला उमेदवार अशी प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये तयार करण्यात यश मिळवले.
हितेंद्र ठाकूर पराभूत का झाले?
यापूर्वी वसई मतदारसंघात ठाकुरांसमोर एकच प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार असल्याने सरळ लढत असायची. त्यामुळे ठाकुरांना ख्रिस्ती, मुस्लिम, दलित आदी मते मिळत होती. त्यामुळे ते जिंकून येत होते. वसई मतदारसंघात हितेंद्र ठाकूर, भाजपच्या स्नेहा दुबे आणि महाविकास आघाडीचे विजय पाटील यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. विजय पाटील हे तगडे उमेदवार होते. त्यांना महाविकास आघाडीमुळे वसईतील ख्रिस्ती आणि मुस्लिमांची मते मिळाली आणि त्यांनी ६२ हजारांहून अधिक मते घेतली. या तिरंगी लढतीमुळे मतांचे विभाजन झाले. त्याचाही फटका ठाकुरांना बसला. वसईत सहज जिंकू या अतिआत्मविश्वासामुळे ते गाफील राहिले होेते.
विवांता नाट्य बविआवरच उलटले का?
मतदानांच्या आदल्या दिवशी विरारच्या विवांता हॉटेल नोटावाटप आरोपांचे नाट्य रंगले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत ठाकूर पितापुत्रांनी साडेचार तास त्यांची अडवणूक करून डांबून ठेवले. यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकार्यांना मारहाण करण्यात आली. त्याचा विपरीत परिणाम झाला. भाजप उमेदवारांबद्दल सहानभूती निर्माण झाली आणि ऐनवेळी मते फिरली. शिंदे गटाचे सुदेश चौधरी हे वाडवळ समाजाचे आहेत. वाडवळ समाज नाराज झाला होता. त्याचाही फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
नालसोपार्यात क्षितीज ठाकूर यांचा पराभव का?
हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितीज ठाकूर २०१९ पासून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. नालासोपारा मतदारसंघात परप्रांतियांची संख्या, वाढीव मते, पक्षांतर्गत नाराजी आदींचा फटका क्षितीज ठाकूर यांना बसला. भाजपचे राजन नाईक यांनी क्षितीज ठाकूर यांचा ३७ हजार मतांनी दारुण पराभव केला. भाजपचे निष्ठावान असलेल्या राजन नाईक यांनी परिवर्तनाचा नारा देत मतदारसंघ पिंजून काढला होता. महाविकास आघाडीचा निष्प्रभ उमेदवार, सोबत हिंदुत्वाच्या नावावर ठाकरे गटाची मते मिळाल्याने त्यांचा विजय सोपा झाला.
बविआचे भवितव्य काय असेल?
यंदा बविआचा एकही आमदार नाही. खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुरांचा पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, या दणदणीत विजयामुळे महायुती आणि विशेषत: भाजपचे मनोबल वाढले आहे. महापालिकेत ते बविला धक्का देण्यासाठी सज्ज झाले आहेत. यापूर्वी बविआ महापालिकेत पाशवी बहुमत घेऊन एकहाती सत्ता मिळवत होती. विधानसभेत पराभव झाला असली तरा बविआच्या कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत आहे. त्यामुळे लगेच पालिकेतील सत्ताबदल शक्य नाही. मात्र महायुतीच्या विजयामुळे तरी मोठ्या संख्यने विरोधक महापालिकेत दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारा काळ बविआसाठी सोपा नसणार आहे, एवढं निश्चित.