१९७१ मध्ये भारताच्या मदतीने नवजात बांगलादेशने पाकिस्तानी सैनिकांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. आता तोच बांगलादेश पाकिस्तानी सैनिकांसाठी पायघड्या घालणार आहे. बांगलादेशातील हिंसक सत्तांतरानंतर नवे सत्ताधारी पाकिस्तानला अधिक धार्जिणे आहेतच, पण ते संरक्षण करार करण्यासह, शस्त्रास्त्रे घेण्यासही उत्सुक आहेत. ही बाब भारतासाठी चिंताजनक मानली जात आहे. पाकिस्तान-बांगलादेशमधील करार आणि त्याच्या भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे हे विश्लेषण…
भारत-बांगलादेश संबंध आता कसे आहेत?
१९७१मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधून तेथील लष्कराच्या अत्याचारांमुळे भारतात, प्रामुख्याने इशान्येकडील राज्यांत आश्रय घेणाऱ्या बंगाली निर्वासितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अत्यंत धाडसी पावले टाकून सशस्त्र हस्तक्षेप केला व ‘बंगबंधू’ शेख मुजिबुर रहेमान यांना सक्रिय मदत करून पाकिस्तानची फाळणी केली. भारताच्या मदतीने स्वतंत्र झालेल्या बांगलादेशमध्ये तेव्हापासूनच भारतविरोधी विचारसरणी कमी राहिली. बंगबंधू आणि त्यांच्या कन्या शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’ची सत्ता असेपर्यंत बांगलादेश भारताला अनुकूलच राहिला. मात्र आता सत्तांतरानंतर चित्र बदलले आहे. हसीना यांना भारताने राजाश्रय दिला असल्यामुळे नव्या सत्ताधाऱ्यांना पाकिस्तान अधिक जवळचा वाटू लागला आहे. बांगलादेशचे एक लष्करप्रमुख इर्शाद हे भारताच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी राहिले आहेत. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.
हेही वाचा >>> गुकेशच्याही वरचे रँकिंग… जगात पहिल्या पाचात.. तरीही जगज्जेतेपदासाठी अर्जुन एरिगेसी गुकेशसमोर आव्हानवीर का ठरणार नाही?
पाकिस्तानी सैन्य बांगलादेशात का जाणार?
बांगलादेशात प्रचंड हिंसाचारानंतर शेख हसीना यांना सत्ता सोडून भारतात पळून यावे लागले. सध्या तेथे हंगामी सरकार असून नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस देशाचा गाडा हाकत आहेत. ते हसीनाविरोधी, पर्यायाने भारतविरोधी आणि म्हणून पाकधार्जिणे असल्यामुळे पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख जनरल एस. समशाद मिर्झा यांनी युनूस यांच्याकडे एक प्रस्ताव धाडला आणि बांगलादेशी सैनिकांना ‘प्रशिक्षित’ करण्याची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यास उत्सुक असलेल्या युनूस यांनी याला संमती दर्शविली असून त्यामुळे आता पाकिस्तानचे सैनिक बांगलादेशातील चार लष्करी छावण्यांमध्ये त्यांचा सैनिकांना युद्धशास्त्राचे धडे देणार आहे. फेब्रुवारीपासून बांगलादेशी सैन्याची ही प्रशिक्षण शिबिरे सुरू होतील. यात मेजर जनरल हुद्द्यावरील पाकिस्तानचे लष्करी अधिकारी बांगलादेशी अधिकाऱ्यांचे वर्ग घेणार असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तान शस्त्रास्त्रेही देणार?
भारतीय संरक्षण दलांच्या एका अहवालानुसार बांगलादेशने पाकिस्तानकडे कमी पल्ल्याच्या ‘अब्दाली’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची मागणी केली आहे. पाकिस्तानात ‘हफ्त-२’ या नावाने ओळखली जाणाऱ्या या क्षेपणास्त्रांचा हल्ला ४०० किलोमीटर आहे. बांगलादेशातून एवढ्या कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे केवळ पश्चिम बंगाल किंवा इशान्य भारतापर्यंतच डागली जाऊ शकतात. याचाच अर्थ युनूस सरकारने केवळ भारताला धमकी देण्यासाठी ‘अब्दाली’ची मागणी पाकिस्तानकडे नोंदविली आहे. आतापर्यंत पाकिस्तान किंवा बांगलादेशने या संभाव्य कराराबाबत कोणतेही भाष्य केले नसले, तरी बांगलादेशला ‘अब्दाली’ देण्यास इस्लामाबाद उत्सुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे क्षेपणास्त्र खरेदीचा हा करार होणे शक्य असले, तरी त्यात एक तांत्रिक अडचण आहे. दोन्ही देश ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणाली’चा सदस्य नसल्यामुळे जागतिक मानदंडामुळे ही खरेदी-विक्री नजिकच्या काळात होण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा >>> ‘एनसीपीआय’कडून ‘गूगलपे’ आणि ‘फोनपे’ला कोणता दिलासा? याच दोन कंपन्यांची डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात मक्तेदारी का?
भारतासाठी हा चिंतेचा विषय का?
भारतासाठी पाकिस्तानी लष्कराचा इतिहास काही चांगला नाही. भारतात होणारे तमाम दहशतवादी हल्ले हे पाकिस्तानी लष्कराच्या आशीर्वादानेच होतात. काश्मीर आणि पंजाबमध्ये फुटीरतावादाची पाळेमुळे रोवणारे अनेक अतिरेकी विचारसरणीचे नेते पाकिस्तानी लष्कराच्या देखरेखीत पाकिस्तानात मोकाट फिरत असतात. २६/११चा मुंबई हल्ला, कारगिल युद्धाने पाकिस्तानी लष्कर आणि त्यांची आयएसआय ही गुप्तचर संस्था कोणत्या थराला जाऊ शकते, हे जगाला दिसले आहे. आता हेच पाकिस्तानी अधिकारी बांगलादेशी सैन्यदलाचे अधिकारी आणि जवानांना प्रशिक्षित करणार असतील, तर ते काही फक्त सामरिक डावपेच शिकविणार नाहीत. बांगलादेशी अधिकाऱ्यांमध्ये भारतविरोधी विचारसरणी पद्धतशीरपणे पसरविली जाईल, हे उघड आहे. दुसरीकडे पाकिस्तानी बनावटीची ‘अब्दाली’ क्षेपणास्त्रे बांगलादेशात पोहोचली तर ईशान्य भारतासाठी सर्वांत धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकेल. पाकिस्तान आणि चीनमुळे पश्चिम आणि उत्तर सीमा असुरक्षित असताना पूर्व सीमेवरही अधिक कुमक, क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तैनात कराव्या लागतील. पाकिस्तान-बांगलादेशचे मैत्रिपूर्ण संबंध असणे आणि त्यांच्यात लष्करी करार होणे यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे तो यामुळेच… ही परिस्थिती भारताला आंतरराष्ट्रीय दबाव आणि मुत्सद्देगिरीने हाताळावी लागणार आहे.
amol.paranjpe@expressindia.com