बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरात जमाव घुसला आणि त्यांनी त्यांच्या घरातील किमती वस्तू आणि साहित्य चोरून नेले. तिथल्या झुंडींचे हुल्लडबाजी करतानाचे व्हिडीओ सर्वत्र पसरले आहेत. याआधी श्रीलंका (२०२२) व अफगाणिस्तान (२०२१) या देशांतील राष्ट्रप्रमुखांवरही जेव्हा देशातून पलायन करण्याची वेळ आली तेव्हाही त्या देशांतील झुंडही याच प्रकारे हुल्लडबाजी करताना दिसून आली. अफगाणिस्तानमधील परिस्थिती तर एका बाजूला हास्यास्पद आणि दुसऱ्या बाजूला मन विषण्ण करणारी होती. उड्डाण घेण्यासाठी धावपट्टीवरून धावणाऱ्या विमानाच्या पात्यांवर बसलेले कित्येक अफगाणी नागरिक विमानाबरोबरच हवेमध्ये गेले आणि अर्थातच खाली कोसळून मरण पावले. संपूर्ण जगाने पाहिलेला हा व्हिडीओ अफगाणिस्तानमधील तत्कालीन भीषण परिस्थितीचे दर्शन घडविण्यासाठी पुरेसा होता. श्रीलंका असो, बांगलादेश असो वा अफगाणिस्तान, राष्ट्रप्रमुखांनी पलायन करण्यामागची कारणे वेगवेगळी असली तरीही त्यानंतर त्या-त्या देशातील झुंडीच्या वागण्यामागची मानसिकता काहीशी एकसारखीच दिसून आली. अशा अराजकतेच्या परिस्थितीमध्ये झुंड अशी का वागते? तिची मानसिकता काय असते?

हेही वाचा : बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू धोक्यात; भारतासमोर हिंदू निर्वासितांच्या आश्रयाचे संकट?

Kim Yong Bok, the secretive North Korean general leading troops in the Russia-Ukraine war
किम जोंग उनचे सैन्य रशियाच्या मदतीला; याचा काय परिणाम होणार? कोण आहेत सैन्याचे नेतृत्व करणारे जनरल किम योंग बोक?
am cynaide serial killer killed 14 friends
१४ मित्रांना विष देऊन हत्या केल्याप्रकरणी महिलेला फाशीची…
Sukhbir Singh Badal resignation
विश्लेषण: अकाली दलावर संकटाचे ‘बादल’; देशातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष अडचणीत का आला?
sugarcane harvester
महाराष्ट्रात ऊसतोडणीचे वेगाने यांत्रिकीकरण… मजुरांऐवजी यंत्रांना प्राधान्य का? मजुरांचा तुटवडा का जाणवतो?
india big fat wedding economy
लग्न सोहळ्यांमुळे होणार सहा लाख कोटींची उलाढाल; भारतीय अर्थव्यवस्थेला कशी मिळणार चालना?
Did NASA accidentally kill living creatures on Mars?
NASA killed Life on Mars?: नासाने मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचा नाश केला का? नवीन संशोधन काय सुचवते?
Gautam Adani allegedly offering bribes
विश्लेषण : गौतम अदानींविरोधात अमेरिकेत भ्रष्टाचाराचे आरोप काय आहेत? भारतीय अधिकाऱ्यांचा काय संबंध?
Demisexuality
तुम्ही ‘Demisexual’ आहात का? या नवीन लैंगिक ओळखीची इतकी चर्चा का?
italy village selling house in 84 rs
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने निराश लोकांना इटलीत केवळ ८४ रुपयांत घर; काय आहे नेमका प्रकार?

अनियंत्रित जमाव म्हणजेच झुंड?

अफगाणिस्तानचा संदर्भ सोडला, तर श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील नागरिक विशिष्ट कारणास्तव रस्त्यावर उतरले होते. श्रीलंकेमध्ये डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि गगनाला भिडलेली महागाई हे नागरिकांचे रस्त्यावर उतरण्यामागील प्रमुख कारण होते; तर बांगलादेशमध्ये १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्यांच्या वंशजांसाठी सरकारी नोकरीमधील ३० टक्के आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी प्रामुख्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. सरतेशेवटी, दोन्ही देशांमधील राष्ट्रप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आणि त्याचा शेवट देशातील झुंड अनियंत्रित होण्यामध्ये झाला. अफगाणिस्तानमध्ये असलेले अमेरिकन सैन्य जेव्हा माघारी परतले; तेव्हा तिथे तालिबान्यांनी पुन्हा उचल खाल्ली आणि अक्षरश: हाहाकार माजला. या तिन्ही देशांमधील तत्कालीन परिस्थिती दाखविणारे व्हिडीओ हे नागरी समाजाची सभ्यता उन्मळून पडल्याचे विषण्ण चित्र उभे करतात. याबाबत विश्वास पाटील यांनी झुंडीचे मानसशास्त्र या पुस्तकामध्ये म्हटले आहे, “प्रत्येक वंशाची (किंवा राष्ट्राची) काही विशेष गुणलक्षणे असतात. या गुणलक्षणांना त्या-त्या वंशाचा प्रकृतिस्वभाव म्हणता येईल. असे असले तरी त्या वंशाची माणसे एखादी कृती करण्यासाठी जेव्हा मोठ्या संख्येने एकत्र गोळा होतात, तेव्हा केवळ त्यांनी तसे केल्यामुळे त्यांच्या ठिकाणी काही नवे गुण दिसू लागतात; काही नवी मानसिक लक्षणे उद्भवतात. ही नवी लक्षणे म्हणजे त्यांच्या प्रकृतिस्वभावात पडलेली भरच होय. अनेकदा त्या वंशाच्या प्रकृतिस्वभावापेक्षा ही लक्षणे अगदीच वेगळी असतात. मुद्दा असा की, एखाद्या वंशातील लोकांचा मूळ स्वभाव कसाही असो – ते लोक जेव्हा झुंड करतात, तेव्हा ते वेगळ्या प्रकारे वागू लागतात.”

पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे…

बांगलादेशमधील आंदोलनाची सुरुवात जरी ‘आरक्षण’ या मुद्द्यावरून झाली असली तरीही देशातील सत्तेविरोधी आवाजांचे दमन, वाढलेली महागाई, बेरोजगारी व माध्यमांची मुस्कटदाबी ही पार्श्वभूमीदेखील लक्षात घेणे गरजेचे ठरते. सत्ताधारी अवामी लीग हा पक्ष आणि त्या पक्षाचे समर्थक आपल्याला हवी तशी यंत्रणा वाकवून स्वत:चा फायदा करून घेत आहेत, ही भावना आणि त्यातून उद्भवलेली खदखद या उद्रेकाला कारणीभूत ठरलेली दिसते. या उद्रेकाचा मनोविश्लेषणाच्या दृष्टिकोनातून अन्वयार्थ मांडताना मनोविकारशास्त्राचे अभ्यासक हमीद दाभोलकर म्हणाले, “इथे ज्या पार्श्वभूमीवर हे घडते आहे, ती पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे ठरते. सत्तेचे पूर्णपणे केंद्रीकरण झालेला समाज आणि वाढलेली टोकाची विषमता या दोन गोष्टींचे संदर्भ फार महत्त्वाचे ठरतात. मूठभर लोकांच्या हातातील सत्ता, मूठभर लोकांकडून उपभोगले जाणारे फायदे आणि हवी त्या पद्धतीने वाकवण्यात येणारी यंत्रणा या पार्श्वभूमीवर समाजमनामध्ये जी खदखद निर्माण झालेली असते, ती अनेकदा लक्षात घेतली जात नाही. एका मर्यादेपलीकडे ही विषमता गेली की, ती संपूर्ण यंत्रणाच कोलमडून टाकते. श्रीलंका, अफगाणिस्तान वा बांगलादेशच नव्हे, तर ब्राझील वा रशियासारख्या देशांतही अशी परिस्थिती याआधी दिसून आली आहे.” पुढे ते म्हणाले, “समाजातील दमन आणि त्यातून निर्माण होणारी भावना ही दर वेळेस विवेकी असेलच, असे नाही.”

हेही वाचा : शेख हसीना भारतात किती काळ राहणार? ब्रिटनने आश्रय देण्यास नकार दिला तर काय होईल?

‘कायदाहीनते’ची परिस्थिती आणि समाजमनाचा अविवेकी उद्रेक

झुंडीची अशा अविवेकी वागण्यामागील मुख्य अंत:प्रेरणा ही कायदा ताब्यात घेण्याची असते वा ‘कायदाहीनते’च्या परिस्थितीचा मिळेल तितका लाभ घेण्याची असते, असे हमीद दाभोलकर यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, “ज्या वेळेस ‘लॉलेस’ (Lawless) म्हणजेच कायद्याचा अंमल तात्पुरत्या स्वरूपात का होईना स्थगित होतो, तेव्हा अशा गोष्टी अधिक प्रमाणात घडताना दिसतात. सामान्यत: कायदा-सुव्यवस्थाच अस्तित्वात नसल्यामुळे या कालावधीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांवरती कुणाचाही काहीही अंकुश नसतो. कोणत्याही दंगली वा अराजकतेच्या परिस्थितीमध्ये लोकांचा सामान्यत: कल अशाच स्वरूपाचा दिसून येतो. झुंड अशी वागते, यामागे एक कारण कायदाहीन परिस्थितीचा फायदा घेणे हेदेखील असते.” याविषयी विश्वास पाटील यांनीही आपल्या पुस्तकामध्ये असे म्हटले आहे, “झुंडींची बौद्धिक पातळी कधीही वरच्या दर्जाची नसते; ती नेहमीच खालच्या दर्जाची असते.” पुढे ते म्हणतात, “अशा झुंडी नेहमीच अबोध पातळीवर जगतात. त्यांना स्वत:चे भान नसते. त्यांच्या ठिकाणी जाणीव अगदी सुप्त रूपात असते. मात्र, त्यांची अबोधता ही त्यांची दुर्बलता नसून, तो त्यांच्या सामर्थ्याचा एक महत्त्वाचा आधार असतो. त्यामुळे झुंडीचे सामर्थ्य हे मूलत: विध्वसंक स्वरूपाचेच असते.”

गर्दी वेगळी, झुंड वेगळी!

झुंडीच्या वर्तनाबाबत फ्रेंच लेखक ल बाँ यांनी आपल्या द क्राऊड या पुस्तकामध्ये मांडणी केली आहे. ते म्हणतात, “झुंड हा एक मानवी समूह असतो आणि काही विशिष्ट प्रकारच्या मानसिक प्रभावांमुळे त्या समूहातील मूळातील सुटे व स्वतंत्र घटक पूर्णपणे एकजीव बनलेले असतात. इतके एकजीव की, सुटे घटक म्हणून विचार करणे वा वर्तन करणे त्यांनी सोडून दिलेले असते. उलट, आताच्या आपल्या नव्या अवस्थेत आपण ‘एक अवाढव्य आकाराचा कुणी सजीव’ आहोत, अशा थाटात ते वागू लागलेले असतात वा तसा विचार ते करू लागलेले असतात.” पुढे लेखक ल बाँ यांनी गर्दी आणि झुंडीमध्येही फरक नोंदवला आहे. ते म्हणतात, “गर्दीत जमा झालेली माणसे केवळ योगायोगाने जमा झालेली असतात, ती कुठल्याही विशिष्ट उद्देशासाठी एकत्र आलेली नसतात. किंवा ती कुठल्याही समान मानसिक प्रेरणेखालीसुद्धा वावरत नसतात. समजा, योगायोगाने एकत्र जमा झालेल्या गर्दीवर काही विशिष्ट प्रभावांचा अंमल चढला आणि गर्दीतील सगळे घटक एकसमान उद्दिष्टाने प्रेरित झाले, तर गर्दीचे रूपांतर झुंडीत झाल्याचे दिसते.”

साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी झुंडीबाबतच्या एका लेखामध्ये म्हटले आहे, “झुंडीचे अनेक प्रकार व उपप्रकार असू शकतात. चार-सहा माणसांचा गट, शे-दोनशे माणसांचा जमाव आणि काही लाखांचा समूह हे सर्व झुंडीमध्ये येऊ शकतात. या झुंडी वेगवेगळ्या कारणांनी आकार घेऊ शकतात. म्हणजे जात, धर्म, प्रांत, भाषा, लिंग, प्रदेश, वर्ग, देव, देश, वंश, विचारधारा, पक्ष, पंथ आणि अस्मिता जागी करता येईल अशा कोणत्याही कारणाने झुंडी आकार घेऊ शकतात. म्हणजे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा विविध प्रकारांत त्यांची वर्गवारी करता येईल. कधी त्या स्थानिक पातळीवर असतील, कधी राष्ट्रीय, तर कधी आंतरराष्ट्रीय स्तरावर असू शकतील. या झुंडी कधी काही मागणी करण्यासाठी असतील, कधी एखादा निर्णय रद्द करण्यासाठी असतील, कधी निषेधासाठी तर कधी सिंहासने उलथवून टाकण्यासाठी. या झुंडी विध्वंसक कृत्ये घडवून आणतील किंवा ती कृत्ये रोखण्यासाठी उपयुक्त ठरतील. बऱ्याच दीर्घकालीन प्रक्रियेतून त्या उदयाला येऊ शकतील किंवा तत्कालीन कारणही त्यासाठी पुरे ठरू शकेल. कधी झुंडी नेत्याशिवाय आकाराला येतात, कधी नेता झुंडीला आकार देतो. कधी एखाद्या ठिणगीतून झुंडी अक्राळविक्राळ रूप धारण करतात, तर कधी आता क्रांती होणार, असे वाटत असतानाच झुंडी हवेत विरून जातात.”

झुंडींना दिशा देणारा विवेकी आवाज हवा…

सध्या नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांना बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्यात आले आहे. युनूस यांनी हंगामी पंतप्रधानपद स्वीकारावे किंवा त्यांनी प्रमुख सल्लागार व्हावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. मात्र, त्यांना आता अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमधील कायदा-सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल, अशी आशा आहे. या संदर्भात बोलताना हमीद दाभोलकर पुढे म्हणाले की, टोकाचा दबाव आणि स्पर्धा-असूयेची टिपेला पोहोचलेली भावना असेल आणि त्यातही कायदाहीनतेची परिस्थिती असेल, तर अशा पार्श्वभूमीवर संसर्गजन्य पद्धतीने झुंडी वागू लागतात. त्याच वेळेला समाजामध्ये नैतिक दबाव असलेल्या लोकांचे असणेदेखील फार गरजेचे ठरते. आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील असहकार आंदोलनामध्ये चौरीचौरा येथे पोलिस चौकी जाळण्यात आल्यानंतर गांधींनी पूर्ण आंदोलनच मागे घेतले होते. त्यावरून त्यांच्यावर खूप टीकाही झाली होती. मात्र, अशी हिंसक घटना घडल्यानंतर तिचे लोण अधिक न पसरू देण्यासाठी असा नैतिक अधिष्ठान असलेला नेता भारतात होता; ज्याने त्वरेने झुंडीचा हिंसक संसर्ग पसरू देण्यासाठीचे निर्णय घेतले. भलेही नैतिक अधिष्ठान असलेली अशी माणसे मूठभर असली तरीही समाजामध्ये विवेक शाबूत राहावा, यासाठी ती आवश्यक असतात. लोकांची खदखद बाहेर पडणे महत्त्वाचे असले तरीही त्याला विवेकी मार्ग उपलब्ध करून देणारे नेतृत्वही गरजेचे ठरते; अन्यथा ज्या परिस्थितीतून हे अराजक निर्माण झालेले असते, ते सुधारण्याऐवजी आणखीनच भीषण परिस्थिती निर्माण होऊ लागते. बांगलादेशमध्ये सध्या हेच दिसून येत आहे.”

हेही वाचा : भारताच्या अडचणी वाढवण्यासाठी चीन आणि पाकिस्तानने शेख हसीनांची सत्ता उलथवून लावली? कारण काय?

विवेक गमावून बसलेली झुंड आणि हिंसा

आततायीपणा, चिडखोरपणा, वैचारिक दौर्बल्य, चिकित्सक वृत्तीचा अभाव, भावनिक अतिरेक हे झुंडीचे लक्षण वा गुणधर्म सांगता येतील. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलकांनी धुडगूस घातला. सत्ताधारी आवामी लीगच्या कार्यालयांमध्ये तोडफोड, जाळपोळ केली; तसेच नेत्यांची घरेही जाळली. या हिंसाचारामध्ये बांगलादेशमधील चित्रपट निर्माते सलीम खान व त्यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता शांतो खान यांची जमावाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये झुंडबळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. भारतातही ‘मोहम्मद अखलाख’ यांचा गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अशाच प्रकारे झुंडबळी गेला होता. त्यानंतर भारतात झुंडींनी एखाद्याला ठेचून मारण्याचे अनेक प्रकार घडताना दिसले आहेत. तेव्हापासून हा विषय अधिक चर्चेत आला आहे. “ज्या नव्या युगात आपण पदार्पण करीत आहोत, ते झुंडीचे युग आहे,” असे विश्वास पाटील यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. जगभरात ठिकठिकाणी प्रामुख्याने अल्पसंख्याक समुदायावरील झुंडींचे हल्ले ही बाब अधिकत्वाने अधोरेखित करताना दिसते.