भारत पाकिस्तानचे १९७१चे युद्ध सर्वार्थाने ऐतिहासिक. या युद्धाला सोमवारी (१६ डिसेंबर) ५३ वर्षे पूर्ण झाली. तीनच वर्षांपूर्वी युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभर स्वर्णिम विजय दिन साजरा करण्यात आला. पराक्रमाचे पोवाडे गायले गेले. शौर्यकथा सांगितल्या गेल्या. १९७१ चे युद्ध लढलेल्या योद्ध्यांचा मुलाखती प्रसिद्ध झाल्या. या युद्धाच्या स्मृती यंदाही जागविल्या जात असताना, दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयातील लष्करप्रमुखांच्या कार्यालयातील पाकिस्तान शरणागती स्वीकारतानाच्या ऐतिहासिक क्षण दाखविणारे चित्र हटविण्यात आले आहे. सामाजिक माध्यमांसह निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांमध्येही यावरून चर्चा होत आहेत. याविषयी…
शरणागतीचा ऐतिहासिक क्षण
भारताचे लष्कर, नौदल, हवाई दल आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील उत्कृष्ट समन्वयातून १९७१चा विजय साकारला. शीतयुद्धाची छाया असताना भारताने लढलेल्या या युद्धात अमेरिका भारताच्या बाजूने नव्हती. उलट, अमेरिकेने सातवे आरमार भारताच्या दिशेने पाठविले होते. मात्र, या आंतरराष्ट्रीय राजकारणाला पुरून उरून भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. देशाच्या फाळणीमागे धर्माचे कारण किती फोल होते, हे उघड झाले. एकाच धर्माचे लोक असतानाही तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील जनतेवर पश्चिम पाकिस्तानने अनन्वित अत्याचार केले. ३ डिसेंबर रोजी सुरू झालेले युद्ध स्पष्ट आणि निर्विवाद अशा भारताच्या विजयाने १६ डिसेंबर रोजी संपले. बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्तानचे ९० हजार सैनिक युद्धकैदी झाले. पाकिस्तानने भारतासमोर सपशेल शरणागती पत्करली. पाकिस्तानचे तत्कालीन पूर्व विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल ए. ए. के. नियाझी यांनी भारतीय लष्कराचे तत्कालीन पूर्व विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यासमोर शरणागतीच्या कागदपत्रांवर सही केली. पाकिस्तान भारतासमोर शरणागती पत्करताना घेतलेले छायाचित्र युद्धाइतकेच ऐतिहासिक ठरले. मात्र आता विविध ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, पाकिस्तान शरणागती पत्करताना दाखविणारे चित्र लष्कराच्या दिल्लीमधील मुख्यालयातील लष्करप्रमुखांच्या कार्यालयातून हटविण्यात आले आहे. हे चित्र हटवून कुठे ठेवले आहे, हे अद्याप समजलेले नाही.
हे ही वाचा… ‘या’ देशाने काढून घेतला भारताचा ‘Most Favoured Nation’चा दर्जा, भरावा लागणार अधिक कर; कारण काय?
जुन्या चित्रात काय?
पाकिस्तान शरणागती स्वीकारतानाचा ऐतिहासिक कार्यक्रम ढाका येथे झाला. पाकिस्तानचे ए. ए. के. नियाझी यांनी शरणागतीच्या कागदपत्रांवर सही केली. भारताचे लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यासमोर त्यांनी शरणागती स्वीकारली. या चित्रात हा सही करतानाचा क्षण टिपला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नेपाळच्या विद्यमान लष्करप्रमुखांचा सन्मान नुकताच करण्यात आला. त्यांचे स्वागत करतानाचे छायाचित्र लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आले. त्या वेळी बदललेले हे नवे चित्र सर्वांसमोर आले.
नव्या चित्रात काय?
नव्या चित्रात प्राचीन काळापासून आतापर्यंतचे आधुनिक युद्धतंत्र दाखविले आहे. लेफ्टनंट कर्नल थॉमस जेकब यांनी ते काढले आहे. ‘कर्म क्षेत्र – फील्ड ऑफ डीड्स’ ही संकल्पना दाखविणारे हे चित्र आहे. लष्कर केवळ देशाची सुरक्षा करीत नाही, तर न्याय, राष्ट्रीय मूल्यांचेही ते रक्षण करते, हे यातून दर्शवले आहे. महाभारताच्या शिकवणीवर आधारित नवे चित्र असल्याचे बोलले जात आहे. मागे पर्वतरांग, एका बाजूला गरुड, रथ, चाणक्य आणि दुसऱ्या बाजूला रणगाडे, हेलिकॉप्टर, पँगॉग सरोवर आणि त्यावर घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर दाखविले आहे. लडाखमध्ये भारतीय जवानांनी जो पराक्रम केला, सध्या चीनबरोबर तणाव निवळण्याचा जो करार झाला, ते यातून अधोरेखित करायचे आहे, असे बोलले जात आहे.
हे ही वाचा… पाच वर्षांतला नीचांक… कोकणातील मत्स्य उत्पादन यंदा का घटले? निसर्गाइतकाच मानवही जबाबदार?
अनोखे ‘टायमिंग’?
बांगलादेशमध्ये आज अस्थिर स्थिती आहे. बांगलादेशनिर्मितीच्या सर्व काही स्मृती बांगलादेश हटवत आहे. ज्या बांगलादेशचा जन्मच भारतामुळे झाला, त्या भारताशी बांगलादेशबरोबरील संबंध आज तणावपूर्ण आहेत. दुसरीकडे चीनबरोबरील लडाखमधील तणाव निवळण्याचे चित्र आहे. मात्र, संरक्षण विश्लेषकांनुसार हा तणाव निवळणे तात्कालिक असू शकते. लडाखमधील चीनचा धोका आजही संपलेला नाही. लष्करप्रमुखांच्या कार्यालयातील चित्र बदलण्याचा निर्णय चीन आणि बांगलादेशमधील धोक्यांच्या अनोख्या ‘टायमिंग’वर आहे.
सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया कधी?
सरकारकडून या बदललेल्या चित्राविषयी अधिकृत टिप्पणी अद्याप आलेली नाही. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर निवृत्त लष्करी अधिकारी, नाव न घेण्याच्या अटीवर विद्यमान लष्करी अधिकारी, संरक्षण विश्लेषकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी टीका केली आहे, तर काहींनी चित्राचे समर्थन केले आहे. या वाद-प्रतिवादात न जाता, या युद्धाचे महत्त्व ओळखून सरकारने यावर अधिकृत प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे. शूर जवानांच्या मनातील शंकांचे मळभ दूर करणे गरजेचे आहे. सामरिक अंगाने उत्कृष्ट पातळीवर लढलेले हे युद्ध भारताचा अभिमान जागृत करणारे आहे. फील्डमार्शल सॅम मानेकशॉ यांच्यासारखे नेतृत्व या युद्धाला लाभले होते. या युद्धाचे दाखले आजही दिले जातात. सरकारकडून अधिकृत प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत सारे आहेत.
prasad.kulkarni@expressindia.com