आतापर्यंत किचकट स्वरुपात असणारी बँकिंग व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी देशातील सर्व राज्यांमध्ये ‘डिजिटल बँकिंग युनिट्स’ची (DBU) स्थापना केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ७५ ‘डिजिटल बँकिंग युनिट्स’चा (DBUs) शुभारंभ केला आहे. अशा बँकिंग सेटअपच्या माध्यमातून सामान्य लोकांना किमान पायाभूत सुविधांमध्ये जास्तीत जास्त सेवा देणे, हा उद्देश असल्याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डिजिटल बँकिंग युनिट्स’चा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील लहान शहरं आणि खेड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी या युनिट्सच्या माध्यमातून पैशांच्या व्यवहारापासून ते कर्ज घेण्यापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. डीबीयू हे भारताने आधुनिकतेकडे टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही सेवा कागदोपत्री आणि इतर किचकट त्रासांपासून मुक्त असणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात ‘डिजिटल बँकिंग युनिट्स’ची घोषणा केली होती. या शुभारंभाच्या कार्यक्रमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत देशभरातील ७५ जिल्ह्यांमध्ये ७५ ‘डिजिटल बँकिंग युनिट्स’ची स्थापना करण्यात आली आहे.

‘डिजिटल बँकिंग युनिट’ म्हणजे काय?
सामान्य भाषेत सांगायचं झालं तर, ही एक प्रकारची बँकच आहे. बँकेत जाऊन तुम्ही जे-जे कामं करता, ती सर्व कामं तुम्हाला डिजिटल बँकिंग युनिट्सच्या माध्यमातून करता येणार आहेत. ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा स्मार्टफोन नाही, असे लोकं डिजिटल बँकिंग युनिटमध्ये जाऊन बँकिंगशी संबंधित सर्व प्रकारची कामं करू शकतात. यासाठी ग्राहकांना तासन्-तास रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही.

डिजिटल बँकिंग युनिट्स ही ‘पेपरलेस’ (कागदपत्रांची आवश्यकता नसणारी) सुविधा असून याचं सर्व काम डिजिटल पद्धतीने केलं जाणार आहे. या युनिट्समध्ये ‘सेल्फ-सर्व्हिस’ आणि ‘डिजिटल असिस्टन्स’ अशा दोन्ही पद्धतीने काम केलं जाणार आहे. सध्या ११ सरकारी बँका, १२ खासगी बँका आणि एक लघु वित्त बँकेद्वारे हे युनिट्स चालवले जातील. पारंपरिक बँका दिवसाचे ठरावीक तास खुल्या असतात. परंतु डिजिटल बँक यूनिट दिवसातील २४ तास आणि सातही दिवस खुली राहणार आहे. याला वेळेचं कोणतंही बंधण घालण्यात आलं नाही. डिबीयूमधील सर्व सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध केली आहे. शिवाय ग्राहकांच्या मदतीसाठी बँकेचे कर्मचारीही उपलब्ध असणार आहेत. या युनिट्समधून तुम्ही कोणत्याही कागदपत्रांशिवाय आर्थिक व्यवहार करू शकता.

‘डिजिटल बँकिंग युनिट्स’द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा
१. बचत बँक खाते उघडणे
२. बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे
३. पासबूक प्रिंट करून घेणे
४. बँक खात्यात पैसे जमा करणे किंवा काढणे
५. कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणे
६. बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठी अर्ज करणे
७. बँक खाते विवरण (बँक स्टेटमेंट) तपासणे किंवा कर भरणे

‘डिजिटल बँकिंग युनिट्स’ नेमकं कार्य कसं करतील?

डिजिटल बँकिंग युनिट्स दोन प्रकारे कार्य करतील. एक ‘सेल्फ सर्व्हिस’ आणि दुसरं ‘डिजिटल असिस्टन्स’ मोडमध्ये. सेल्फ-सर्व्हिस मोडमध्ये तुम्हाला स्वतःला बँकिंग संदर्भातील कामं करावे लागतील. तर ‘डिजिटल असिस्टन्स’ मोडमध्ये बँकेचे कर्मचारी तुम्हाला मदत करतील.

आयसीआयसीआय बँकेने देशभरातील अनेक शहरांमध्ये डिजिटल बँकिंग युनिट्स सुरू केले आहेत. यावेळी बँकेनं सांगितलं की, सेल्फ-सर्व्हिस मोडमध्ये एटीएम मशीन, कॅश डिपॉझिट मशीन आणि मल्टी-फंक्शनल किऑस्क मशीन असेल. किऑस्कमशीनच्या मदतीने तुम्ही पासबूक प्रिंटींग, चेक जमा करणे आणि इंटरनेट बँकिंग आदि सुविधा वापरू शकता.

दुसरीकडे, डिजिटल असिस्टन्स मोडमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी बँकचे कर्मचारी उपलब्ध असतील. हे कर्मचारी ग्राहकांना आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहार करण्यात मदत करतील. येथे जाऊन तुम्ही बँक खाते उघडू शकता, गृह कर्ज घेऊ शकता, वाहन कर्ज घेऊ शकता, वैयक्तिक कर्ज घेऊ शकता, क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठीही अर्ज करू शकता.

जगात डिजिटल बँकिंगची स्थिती काय आहे?
‘फाइंडर’च्या ‘डिजिटल बँकिंग अॅडॉप्शन’च्या अहवालानुसार, जगात सर्वात जास्त ब्राझीलमध्ये डिजिटल बँकिंग सेवेचा वापर केला जातो. ब्राझीलमधील ४३ टक्क्यांहून अधिक लोक डिजिटल बँकिंगचा वापर करतात. ब्राझीलनंतर डिजिटल बँकिंगमध्ये भारत देश आघाडीवर आहेत. भारतातील २६ टक्के लोक डिजिटल बँकिंगचा वापर करतात. यानंतर आयर्लंडमध्ये २२ टक्के, सिंगापूरमध्ये २१ टक्के, हाँगकाँगमध्ये २० टक्के, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ टक्के, मेक्सिको आणि स्पेनमध्ये प्रत्येकी १७ टक्के आणि दक्षिण आफ्रिकेत १५ टक्के लोक डिजिटल बँकिंगचा वापर करतात. आश्चर्यकारक बाब म्हणजे अमेरिकेसारख्या विकसित देशात केवळ ८ टक्के लोकं डिजिटल बँकिंगचा वापर करतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banking service will open for 24 hours what is digital banking unit how customers benefit rmm