BAPS Temple California News : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील बीएपीएस हिंदू मंदिरात आज (तारीख ९ मार्च) अज्ञातांनी तोडफोड केली. हिंदूंनो परत जा, अशा भारतविरोधी घोषणाही मंदिराच्या भिंतीवर लिहिण्यात आल्या. चिनो हिल्स परिसरात घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा हल्ला ‘घृणास्पद’ असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत हिंदू मंदिरांवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं आहे. दरम्यान, बीएपीएस म्हणजे काय, जगभरात बीएपीएसची किती मंदिरे आहेत, हे जाणून घेऊ.

परराष्ट्र मंत्रालयानं नेमकं काय म्हटलंय?

“कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथील बीएपीएस हिंदू मंदिरात तोडफोड झाल्याचं वृत्त आम्हाला कळालं. आम्ही अशा घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध करतो. स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी या कृत्यांसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी. त्यांनी हिंदू प्रार्थनास्थळांची पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करावी”, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.

आणखी वाचा : What is Hantavirus : हंता व्हायरस म्हणजे काय? हा आजार कशामुळे होतो? त्यावर उपचार शक्य आहे का?

बीएपीएस संस्था नेमकी काय आहे?

बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) ही एक मोठी आणि प्रसिद्ध हिंदू धर्माची संस्था आहे. हा हिंदू धर्मातील एक वैष्णव पंथ आहे. जगभरात या संस्थेची अनेक मंदिरे आहेत, ज्यात नवी दिल्ली आणि गांधीनगर येथील प्रसिद्ध अक्षरधाम मंदिरांचाही समावेश आहे. यापूर्वी न्यूयॉर्क आणि कॅनडामध्ये असलेल्या काही बीएपीएस मंदिरांची तोडफोड करण्यात आली होती. या मंदिरांमध्ये अनेक उच्चपदस्थ व्यक्तींच्या भेटीगाठी झालेल्या आहेत, ज्यात २०२३ मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान ऋषी सुनक यांचा भारत दौरा आणि त्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबू धाबीमध्ये केलेल्या बीएपीएस मंदिराचे उद्घाटन यांचा समावेश आहे.

बीएपीएसची जगभरात किती मंदिरे?

जगभरात बीएपीएसच्या एक हजार ५५० मंदिरांचे जाळे आहे. लंडन, ह्युस्टन, शिकागो, अटलांटा, टोरंटो, लॉस एंजेलिस आणि नैरोबी येथे स्वामीनारायणांचे मंदिर बांधण्यात आले आहेत. बीएपीएसच्या वेबसाइटनुसार, जगभरात संस्थेची तीन हजार ८५० केंद्रे आहेत. आठवड्यात बीएपीएसच्या तब्बल १७ हजार साप्ताहिक बैठका होतात. अनेक धार्मिक संघटनांप्रमाणेच ही संस्था चांगले कार्य आणि समुदाय सेवांमध्ये गुंतलेली आहे. बीएपीएस संस्थेची भारतात प्रामुख्याने गुजरातमध्ये अनेक रुग्णालये आणि शाळा आहेत. या परंपरेचे पालन करणारे व्यक्ती दिवसाची सुरुवात पूजा आणि ध्यानाने करतात. बीएपीएसने पाच महत्त्वाचे संदेश दिले आहेत, ज्यामध्ये मद्यपान करू नका, कोणतेही व्यसन टाळा, व्यभिचार करू नका, मटण-मांस खाणे टाळा, मन नेहमीच शुद्ध ठेवा.

बीएपीएसची स्थापना कोणी केली?

बीएपीएस (BAPS) संस्था भगवान स्वामीनारायण यांच्या उपदेशांवर आधारित आहे. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात भगवान स्वामीनारायण (१७८१-१८३०) यांनी बीएपीएसची स्थापना केली. १९०७ मध्ये शास्त्रीजी महाराज (१८६५-१९५१) यांनी जगभरात या संस्थेचा विस्तार केला. बीएपीएसचे सध्याचे नेते महंत स्वामी महाराज आहेत. त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे की, “भगवान स्वामीनारायण हे देवाचे अवतार होते, ज्यांना BAPS श्री स्वामीनारायण मंदिर समर्पित आहे आणि त्यांच्या पवित्र प्रतिमा गर्भगृहात स्थापित आहेत.” डिसेंबर २०२२ च्या मध्यापासून, गुजरातमध्ये महिनाभर चालणारा प्रमुख स्वामी महाराज शताब्दी (१९२१-२०१६) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या काळात या पंथाचा विस्तार अनेक पटींनी झाला.

पंतप्रधानांची शताब्दी सोहळ्याला उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शताब्दी समारंभाचे उद्घाटन केले होते. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह अनेक प्रमुख उद्योगपती उपस्थित होते. याशिवाय समारंभाला जीएमआर ग्रुपचे अध्यक्ष जीएम राव, कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष टी. एस. कल्याणरामन, निरमा ग्रुपचे अध्यक्ष करसन पटेल, झायडस कॅडिलाचे अध्यक्ष पंकज पटेल, हिरो इलेक्ट्रिक आणि हिरो एक्सपोर्ट्स अध्यक्ष विजय मुंजाल, सन फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप संघवी हेदेखील हजर होते.

हेही वाचा : उंदीर आणि रानडुक्कर खाणे सुरू करा, अमेरिकन संस्थेचा नागरिकांना सल्ला; नेमकं कारण काय?

संप्रदायाच्या सदस्यांनी काय सांगितले?

बीएपीएस संप्रदायाने काही वेळा बहुसांस्कृतिक तत्त्वज्ञान प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला आहे. संप्रदायाचे सदस्य स्वामी भद्रेशदास म्हणाले, “जेव्हा दिल्लीतील अक्षरधाम मंदिराचे उद्घाटन २००५ मध्ये झाले, तेव्हा एक मुस्लिम राष्ट्रपती (एपीजे अब्दुल कलाम), एक शीख पंतप्रधान (मनमोहन सिंग) आणि एक हिंदुत्वादी पक्षाचे नेते (लाल कृष्ण आडवाणी) या समारंभासाठी एकत्र आले. ही सर्वसमावेशकता प्रमुख स्वामींच्या कार्याची एक विशेषता होती.”

त्याचप्रमाणे २०२३ मध्ये यूएईतील मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी बीएपीएसच्या प्रवक्त्याने सांगितले की, “एका मुस्लीम राजाने हिंदू मंदिरासाठी जमीन दान केली आहे, मंदिराचे मुख्य आर्किटेक्ट एक कॅथोलिक ख्रिस्ती आहे, प्रोजेक्ट मॅनेजर एक शीख आहे, पाया डिझायनर एक बौद्ध आहे, बांधकाम कंपनी एक पारशी गटाची असून संचालक जैन परंपरेतील आहेत.”

पंतप्रधान बीएपीएसच्या प्रमुखांबाबत काय म्हणाले होते?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएपीएसच्या प्रमुख स्वामींना “वडीलधारी व्यक्तिमत्व” म्हणून संबोधलं होतं. शताब्दी उद्घाटनावेळी मोदी म्हणाले होते की, त्यांनी प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना प्रथम प्रमुख स्वामी आणि नंतर महंत स्वामी (सध्याचे गुरु) यांनी पाठवलेल्या पेनने स्वाक्षरी केली होती. प्रमुख स्वामी आणि त्यांच्या उत्तराधिकारी यांच्याकडून ते कुर्ता-पायजमासाठी कापड घेत होते, याबद्दलही पंतप्रधानांनी सांगितले होते.

Story img Loader