पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका आणि इजिप्तचा सहा दिवसांचा दौरा करून भारतात परतले आहेत. दिल्ली विमानतळावर परतल्यानंतर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मिनाक्षी लेखी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींच्या या परदेश दौऱ्याचे अनेकांनी आपापल्यापरिने विश्लेषण केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात जागतिक योगा दिवस साजरा करणे, अंतराळ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक विषयांवर द्विपक्षीय करार करणे, तसेच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद या सारख्या अनेक कृतीतून हा दौरा यशस्वी झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदी इजिप्तहून भारताकडे निघालेले असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या एका विधानाने सर्वांचे लक्ष खेचून घेतले आहे. विरोधकांनी मोदींच्या दौऱ्याबाबत जे प्रश्न उपस्थित केले होते, त्याला तर त्यांनी उत्तर दिलेच. शिवाय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतीय मुस्लीमांबाबतच्या वक्तव्याचाही सीतारमन यांनी समाचार घेतला.
सीतारमन म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय विषयावर भाष्य करताना मी खूप संयम बाळगते. आम्हाला अमेरिकेसोबत चांगले संबंध हवे आहेत. पण तिथूनही असा प्रयत्न व्हायला हवा. युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल फ्रिडम (USCIRF) या संस्थेने भारतातील धार्मिक सहिष्णुततेबद्दल काही विधान केले आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही या विषयावर बोलले. ते राष्ट्राध्यक्ष असताना सिरिया, येमेन, सौदी, इराक आणि इतर मुस्लीम देशांवर बॉम्ब कुणी टाकले”? जेव्हा ते (ओबामा) अशाप्रकारे भारतावर आरोप करतात, तेव्हा लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील का? असा सवालही सीतारमन यांनी उपस्थित केला. फर्स्टपोस्ट या वेबसाईटने बराक ओबामा यांच्या मुलाखतीमधील विधाने आणि त्यावर सीतारमन यांची प्रतिक्रिया यावर सविस्तर लेख दिला आहे.
पण निर्मला सीतारमन या अशापद्धतीने का व्यक्त झाल्या? अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र बराक ओबामा यांच्यावर त्यांनी टीका का केली? जाणून घेऊया.
बराक ओबामा भारतीय मुस्लीमांबाबत काय म्हणाले?
बराक ओबामा यांनी मागच्या आठवड्यात सीएनएन वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली, या मुलाखतीत त्यांनी केलेल्या एका विधानावर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या काही तास आधी बराक ओबामा यांचे विधान समोर आले होते. सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओबामा यांनी यूनायटेड स्टेट्स आणि इतर देशांमधील लोकशाही व्यवस्था कमकुवत होत असल्याची खंत व्यक्त केली. तसेच आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील विषमता निरोगी लोकशाही टिकवण्यात अडथळे निर्माण करू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
“आपण जर लोकशाहीसाठी लढलो, तर तिचा नक्कीच विजय होईल. आपल्या सध्याच्या लोकशाही संस्था कमकुवत होऊ लागल्या आहेत. या संस्थामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे”, असे विधान ओबामा यांनी ‘सीएनएन’च्या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. या मुलाखतीमध्ये पत्रकाराने ओबामा यांना प्रश्न विचारला, “मोदींसारख्या उदारमतवादाच्या विरोधात असलेल्या नेत्यासोबत त्यांनी आणि अमेरिकेच्या इतर राष्ट्राध्यक्षांनी संबंध कसे राखले? मोदी तर तुमचे मित्रही होते.” विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काही कळीच्या मुद्द्याबाबत मोदींना कसे सांगावे, हे समोर आणण्यासाठी असा प्रश्न विचारण्यात आल्याचे फर्स्टपोस्ट या वेबसाईटने म्हटले आहे.
यावर ओबामा यांनी उत्तर दिले की, राष्ट्राध्यक्ष म्हणून कुणासोबत कसे वागावे, हे गुंतागुंतीचे असते. कारण प्रत्येक व्यक्ती अमेरिकेची सहयोगी नसते आणि अशा वेळी राष्ट्रीय हिताला अधिक महत्त्व द्यावे लागते. जो बायडेन यांनी भारतीय पंतप्रधान मोदी यांना काय सांगितले पाहीजे? तुम्ही काय सल्ला द्याल? या प्रश्नावर ओबामा म्हणाले की, हिंदू बहुसंख्यांक असलेल्या भारतात मुस्लीम अल्पसंख्याकांचे रक्षण केले जावे, एवढेच मी नमूद केले असते.
या उत्तरानंतर ओबामा यांनी याचे स्पष्टीकरणही दिले. ते म्हणाले, “जर भारताने वांशिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण केले नाही, तर भारत कधी ना कधी फुटण्याची शक्यता आहे. हे केवळ मुस्लीम भारताच्याच नव्हे तर हिंदू भारताच्या हिताविरुद्ध असेल.”
डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांचा मोदींना विरोध
ओबामा यांच्या वक्तव्याचा योगायोग असा की, याच मुद्द्यावरून संसदेच्या दोन महिला सदस्यांनी मोदी यांच्या यूएस काँग्रेसमधील भाषणावर बहिष्कार टाकून अनुपस्थिती दर्शवली. मोदी सरकारच्या काळात धार्मिक अल्पसंख्याकांना दाबले जात असल्याचे सांगून डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार इलहान ओमर व रशिदा त्लाइब यांनी संयुक्त सभेतील मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकला. अमेरिकेतील ‘मिनसोटा’च्या लोकप्रतिनिधी ओमर म्हणाल्या होत्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात धार्मिक अल्पसंख्याकांना दाबले गेले, हिंसक हिंदू राष्ट्रवादी गटांना प्रोत्साहन देण्यात आले आणि पत्रकार तसेच मानवी हक्कांसाठी लढणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मी मोदी यांच्या भाषणाला उपस्थित राहणार नाही.
लोकप्रतिनिधी रशिदा यांनीही ओमर यांच्या सुरात सूर मिसळला. त्या म्हणाल्या, “आपल्या देशाच्या राजधानीमधील मोठा मंच मोदींना उपलब्ध करून दिला जातोय, ही शरमेची बाब आहे. मानवी हक्कांची पायमल्ली करणे, लोकशाहीविरोधी निर्णय घेणे, मुस्लिम व धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे, तसेच पत्रकारांवर अंकुश ठेवणे अशी नकारात्मक पार्श्वभूमी मोदींना असून हे अस्वीकारार्ह आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार डेमोक्रॅटिक पक्षाच्या ७५ खासदार व प्रतिनिधिगृहाच्या सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवाधिकार हक्कांबाबत प्रश्न विचारावेत, अशी मागणी केली होती.
ओबामा यांच्या विधानावरील प्रतिक्रिया
ओबामा यांच्या विधानानंतर भारतात त्यांच्याविरोधात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या विधानाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी तीव्र निषेध केलाच. त्याशिवाय इतरही नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. आसामचे मुख्यमंत्री, भाजपा नेते हिंमता बिस्वा सरमा यांना एका पत्रकाराने ट्विटरवर प्रश्न विचारला की, बराक ओबामा यांनी भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आता गुवाहाटी पोलिस त्यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी वॉशिंग्टनला रवाना होणार का? या उपरोधिक ट्वीटला उत्तर देताना हिंमता बिस्वा सरमा म्हणाले की, भारतातही अनेक हुसैन ओबामा आहेत आणि त्यामुळे प्राथमिकतेनुसार काम केले जाईल.
भाजपाचे उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनीही ट्वीट करत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सुनावले. ट्वीटवर त्यांनी लिहिले, ‘पेव्ह रिसर्च सेंटरच्या संशोधनानुसार भारतातील ९८ टक्के मुस्लिम विनासायास त्यांची धार्मिक कार्ये पार पाडत आहेत. पण, बराक ओबामा यांनी केलेला दावा निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे भारताविरोधी असलेल्या घटकांना एक प्रकारे प्रोत्साहनच मिळाले आहे. भारताला उपदेशाचे डोस पाजणारे ओबामा चीनमधील शिनजियांग येथे होणाऱ्या अत्याचारांबाबत बोलणार का? एका बाजूला विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करून भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ करीत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला एक माजी राष्ट्राध्यक्ष वंशसंबंधाचा मुद्दा उकरून काढतोय.’
ओबामा यांची संशयास्पद कारकीर्द
ओबामा यांच्या विधानानंतर अनेकांनी त्यांच्या संशयास्पद कारकिर्दीकडे बोट दाखविले आहे. सीएनएन वृत्तवाहिनीने २०१४ साली प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार, ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत प्रशासनाने कोणकोणत्या देशांवर बॉम्बहल्ले केले त्यांची यादी केली. त्यामध्ये अफगाणिस्तान, लीबिया, येमेन, सोमालिया, इराक व सीरिया या देशांवर बॉम्ब टाकण्यात आले होते.
एवढेच नाही तर २०१७ साली, अमेरिकन लेखक व वकील केनेथ रोथ यांनी केलेल्या लिखाणानुसार, ओबामा यांनी मानवी हक्कांबाबत घेतलेले निर्णय संमिश्र असे होते. विशेष म्हणजे मानवी हक्कांना त्यांनी दुय्यम दर्जा दिला होता. जेव्हा मानवी हक्कांची किंमत अधिक मोजावी लागणार नाही, तेव्हाच त्यांनी त्याला पाठिंबा दिला; पण मानवी हक्क हे त्यांच्या प्राथमिकतेमध्ये नव्हते.