Who is Bashar al-Assad? सिरियावर वज्रमुठीने राज्य करणारा नेता बशर अल-असद हा सत्ताधारी राजवटीच्या कुटुंबातील दुसऱ्या पिढीचा प्रतिनिधी आहे. त्याने पाच दशकांहून अधिक काळ सत्ता राखली होती. परंतु, वीजेच्या गतीने झालेल्या बंडखोरीमुळे नाहीसा झालेला बशर अल-असद हा सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या मध्य-पूर्वेतील देशात झालेल्या सत्ताबदलाचा सूचक आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीरियातील त्याच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.
सिरियातील क्रूर राजवट
असद यांना सिरियातील क्रूर राजवटीसाठी ओळखले जाते. २०११ पासून सुरू झालेल्या यादवीने देश उद्ध्वस्त केला. त्यामुळे सिरिया दहशतवादी संघटना आयसिससाठी एक केंद्रबिंदू ठरला. या यादवीने आंतरराष्ट्रीय छुप्या युद्धाला आणि निर्वासितांच्या गंभीर संकटाला चालना दिली, त्यामुळे लाखो लोक आपल्या घरांपासून विस्थापित झाले. २०११ साली या राजवटीविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. परंतु,असद सरकारने या आंदोलनांसमोर झुकण्यास नकार दिला. त्याऐवजी या शांततापूर्ण चळवळीवर क्रूर दडपशाही केली. त्यातत पहिल्या काही महिन्यांतच हजारो लोकांची हत्या करण्यात आली आणि अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले.
असद यांच्या सैन्यावर १३ वर्षांच्या यादवीदरम्यान मानवाधिकारांच्या गंभीर उल्लंघनांचे आणि सामान्य नागरिकांवर क्रूर हल्ल्यांचे आरोप झाले आहेत. यात स्वतःच्या नागरिकांवर रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याच्या आरोपाचाही समावेश आहे. युद्धाच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्रे, जॉर्डन, तुर्की आणि युरोपियन युनियन यांनी असद यांना पदत्याग करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर पश्चिमी देशांनी लादलेले निर्बंध असताना रशिया आणि इराणसारख्या बलाढ्य मित्रदेशांच्या समर्थनामुळे आणि विरोधकांविरोधात चालवलेल्या निर्दयी मोहिमेमुळे असद सरकार सत्तेवर टिकून होते. आता बंडखोरांनी सीरियातील शहरांवर नियंत्रण मिळवले आहे. अनेक व्हिडीओजमध्ये असद आणि त्यांच्या वडिलांचे पोस्टर्स फाडून टाकल्याचे दिसत आहे.
असद सत्तेवर आले
असद यांनी २००० साली त्यांच्या वडिलांच्या हाफेझ अल-असद यांच्या मृत्यूनंतर कोणत्याही विरोधाविना झालेल्या निवडणुकीत सत्ता हाती घेतली. हाफेझ अल-असद गरिबीतून पुढे आले होते. ते बाथ पक्षाचे नेतृत्व करत १९७० साली सत्तेवर आले आणि पुढच्याच वर्षी ते देशाचे राष्ट्रपती झाले. हाफेझ अल-असद त्यांच्या वडिलांच्या सावलीतच वाढले, जे सोविएत मित्रपक्षाचे सहयोगी होते. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ सिरियावर सत्ता गाजवली आणि अल्पसंख्याक अलावीट समुदायाला राजकीय, सामाजिक आणि लष्करी क्षेत्रांतील महत्त्वाच्या पदांवर नेले. हाफेझ अल-असद यांच्या कारकिर्दीत दडपशाही व्यापक होती आणि अधूनमधून राज्याकडून अतिशय क्रूर हिंसाचार घडत असत. १९८२ साली हामा शहर बंडखोरांनी ताब्यात घेतले होते. हाफेझ अल-असद यांनी आपल्या सैन्य आणि गुप्तचर यंत्रणांचा वापर करून हजारो विरोधकांची हत्या घडवून आणली. या कारवाईमुळे मुस्लिम ब्रदरहूडच्या नेतृत्वाखालील उठाव समाप्त झाला. हाफेझ अल-असद यांचा दुसरा मुलगा बशर अल-असद यांना वडिलांची सत्ता हाती घेण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांनी लंडनमध्ये नेत्रवैद्यकीय शिक्षण घेतले होते. परंतु १९९४ साली त्यांचे मोठे बंधू बासेल यांना हाफेझ अल-असद यांचा उत्तराधिकारी म्हणून तयार केले जात असतानाच त्यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर बशर अल-असद यांना राष्ट्रीय पटलावर आणण्यात आले. त्यांनी संरक्षणशास्त्राचा अभ्यास केला आणि नंतर सिरियन सैन्यात कर्नल पदापर्यंत पोहोचले.
नवीन राष्ट्रपतींकडून अपेक्षा
जून २००० साली वडिलांच्या मृत्यूनंतर सिरियन संसदेने केवळ काही तासांत संविधानात बदल करून राष्ट्रपती होण्यासाठी लागणारी वयोमर्यादा ४० वरून बशर अल-असद यांच्यासाठी वयवर्षे ३४ पर्यंत खाली आणली. या बदलामुळे बशर अल-असद यांना नंतरच्याच महिन्यात कोणत्याही विरोधाविना झालेल्या निवडणुकीनंतर त्यांच्या वडिलांची जागा घेण्यास कायदेशीर परवानगी मिळाली. युरोप आणि अमेरिकेतील अनेक राजकीय समीक्षक नव्या राष्ट्रपतींबाबत आशादायक होते. कारण बशर अल-असद यांनी स्वतःला एक नवा, तरुण नेता म्हणून सादर केले. अधिक प्रगतीशील आणि मध्यममार्गी राजवटीची सुरुवात ते करतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती. बशर अल-असद यांचे अस्मा अल-असद यांच्याशी २००० साली लग्न झाले. त्या सिरियन वंशाच्या असून इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून कार्यरत होत्या त्यांचे सुरुवातीचे आयुष्य लंडनमध्ये गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळेही असद यांच्या अधिक प्रगतिशील आणि आधुनिक राजवटीच्या प्रतिमेला अधिक उजळा मिळाला.
आशा लवकरच मावळल्या…
परंतु या आशा लवकरच मावळल्या. नव्या नेत्याने तत्काळ हमास आणि हेझबुल्ला या सारख्या दहशतवादी गटांशी पारंपरिक संबंध कायम ठेवले. २०११ साली लोकशाही समर्थक आंदोलनाला क्रूर दडपशाहीने उत्तर दिल्यानंतर पश्चिमी राष्ट्रांनी असद राजवटीवर उघडपणे टीका करायला सुरुवात केली. २०११ साली मे महिन्यात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी “त्यांच्याच नागरिकांच्या हत्या आणि मोठ्या संख्येने नागरिकांनाच अटक करण्याचा मार्ग निवडल्याचा” आरोप असद सरकारवर केला. असद यांनी लोकशाहीचे नेतृत्व करण्याचे आवाहन ओबामा यांनी केले. असद दर सात वर्षांनी मोठ्या बहुमताने पुन्हा निवडून येत गेले, त्यात अलीकडेच २०२१ साली झालेल्या निवडणुकांचाही समावेश आहे. मात्र अमेरिका, यूके, फ्रान्स, जर्मनी आणि इटली यांनी या निवडणुकीला “फसवणूकपूर्ण निवडणूक” म्हणून घोषित केले.
गृहयुद्ध
२०११ मधील लोकशाही समर्थक आंदोलनाच्या दडपशाहीनंतर उफाळलेल्या यादवीदरम्यान सैन्याद्वारे क्रूर धोरणे राबविणारा नेता ही ओळख असद यांना मिळाली. या काळात संख्येने कमी असलेले स्थानिक दहशतवादी आणि सिरियन सैन्याच्या काही बंडखोर सैनिकांनी मिळून सशस्त्र विरोधी गट तयार केला या गटानेच सरकारविरोधात लढा दिला. २०१३ साली संयुक्त राष्ट्रांच्या शस्त्र निरीक्षकांनी सिरियामध्ये नर्व्ह गॅसचा वापर झाल्याचे “अत्यंत ठोस आणि निर्विवाद” पुरावे सादर केले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी २१ ऑगस्ट रोजी दमास्कसच्या उपनगरांमध्ये झालेल्या हल्ल्यचा उल्लेख “२१व्या शतकातील शस्त्रास्त्रांच्या सामूहिक विध्वंसाचा सर्वात भीषण वापर” असा केला होता. तर या हल्ल्यात १४०० हून अधिक लोक ठार झाल्याचा दावा अमेरिकेने केला होता. त्या हल्ल्याने आणि इतर तत्सम घटनांनी रासायनिक शस्त्रसाठ्याचा नाश करण्यासाठी असद सरकार विरोधात एकत्र काम करण्यास अनेक राष्ट्रांना प्रवृत्त केले. २०१३ साली अमेरिकेने सिरियाविरोधी गटांना आपला पाठिंबा वाढवला. असद यांनी पाश्चिमी राष्ट्रांना त्यांच्या सशस्त्र दलांविरुद्ध लढणाऱ्या बंडखोर गटांना समर्थन देण्याविरोधात इशारा दिला होता. आणि भाकीत केले होते की, हे गट कधीतरी अमेरिकेसह इतर राष्ट्रांवरही हल्ला करतील. नंतर २०१५ साली असद यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील त्या आघाडीत सिरिया सामील होणार नाही. कारण ती आघाडी आयसिस या दहशतवादी गटाविरोधात कार्यरत राहणार होती. आयसिसने यादवीदरम्यान देशाच्या काही भागांवर नियंत्रण मिळवले होते. हा संघर्ष आता असद यांच्या क्रूर वारशाचा प्रमुख भाग झाला आहे. याशिवाय, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, यंदाच्या वर्षी आतापर्यंत ७० लाखांहून अधिक नागरिक सिरीयामध्येच देशांतर्गत विस्थापित झाले आणि ६० लाखांहून अधिक नागरिक देश सोडून गेले.