बांगलादेशमध्ये सत्तापालटानंतर अलीकडे जो हिंसाचार झाला त्याबाबत उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य केले. त्याला बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार गेल्यानंतर तेथील अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करण्यात आले हा संदर्भ होता. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘असंघटित व कमकुवत असाल तर संकटात याल’ असा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धुळे येथील राज्यातील विधानसभेच्या पहिल्याच प्रचारसभेत ‘एक है तो सेफ है’ अशी घोषणा दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांवर या मुद्द्यावर टीका केली. तर महायुतीमधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष या घोषणेशी सहमत नाही. मात्र राज्यात विधानसभा निवडणुकीतील प्रचारात हा मुद्दा केंद्रस्थानी आला.

बांगलादेशमधील घटनांचा संदर्भ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीच्या कार्यक्रमात बोलताना ‘जेव्हा तुमची एकी असेल तेव्हाच देश प्रगती करेल. बांगलादेशमध्ये काय घडले ते पाहात आहात. या चुकांची येथे पुनरावृत्ती होता कामा नये.’ असे सांगत ‘बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे’ असे वक्तव्य केले. विशेष म्हणजे योगींच्या या वक्तव्याचा लाभ भाजपला हरियाणात झाल्याचे मानले जाते. कारण त्यानंतर महिना-दीड महिन्यात हरियाणात विधानसभा निवडणूक झाली. तेथे दहा वर्षांच्या राजवटीमुळे भाजपपुढे अडचणी होत्या. काँग्रेस सत्तेत येईल असे मानले जात होते. मात्र भाजपने प्रतिकूल स्थितीत यश मिळवले. कारण चारच महिन्यांपूर्वी लोकसभेला काँग्रेसने राज्यात भाजपला रोखले होते. राज्यातील दहा पैकी प्रत्येकी लोकसभेच्या पाच जागा दोघांनाही मिळाल्या होत्या. भाजपचे राज्यातील लोकसभेचे संख्याबळ निम्यावर आले होते. त्यामुळे सत्तांतर अटळ मानले जात असतानाच भाजपने यश खेचून आणले. यात काँग्रेसमधील गटबाजीचा काही प्रमाणात वाटा असला तरी, हिंदुमधील छोट्या जाती विशेषत: बिगर जाट समुदायाची एकजूट करण्यात भाजपला यश आले. त्यामुळेच महाराष्ट्रात विधानसभेला या घोषणेचा लाभ होणार काय, याबाबत विश्लेषण सुरू आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये भाजपच्या एका कार्यकर्त्याने तर लग्नपत्रिकेवर ‘बटेंगे तो कटेंगे’ असा संदेश दिला होता.

कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रविंद्र धंगेकर यांना टोला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supriya Sule Badlapur, Subhash Pawar Prachar,
सुभाष पवार जायंट किलर ठरणार, सुप्रिया सुळे यांचा दावा, बदलापुरात सभेत भाजपावर टीका
Rajan Vichare meet Narayan Pawar, BJP,
मतांच्या जोगव्यासाठी राजन विचारेंची भाजप कार्यालयात पायधूळ, एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक नारायण पवार यांची घेतली भेट
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
HM Shri Amit Shah addresses public meeting in Shirala
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर इच्छुक; अमित शहा

हेही वाचा >>> विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?

लोकसभेतील निकालानंतर खबरदारी

लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. विशेषत: मुस्लीमबहुल भागामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मते मिळाल्याने त्यांना भाजपला राज्यात रोखता आले. धुळे लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण याबाबत वारंवार दिले जाते. भाजप उमेदवार येथे शेवटपर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर होता. मात्र मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपला पाच हजार मतेही मिळाली नाहीत. तर महाविकास आघाडीला १ लाख ९८ हजार मते मिळाली. एका मतदारसंघाने निकाल फिरला हा दाखला देत ‘बटेंगे…’ची घोषणा केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘व्होट जिहाद’चा उल्लेख प्रचारसभांमध्ये वारंवार केला आहे. योगी आदित्यनाथ यांनीही महाराष्ट्रातील प्रचारसभांमध्येही हा नारा दिला आहे. त्यामुळे एकूणच भाजपने विधानसभेला हिंदुत्वाचा मुद्दा जोरदारपणे पुढे आणला आहे.

हेही वाचा >>> ‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?

खरगे-योगी शाब्दिक चकमक

काँग्रेसने यावरून भाजपवर टीका केली आहे. ‘बांटना और काटना’ हे भाजपचे काम आहे अशा शब्दात नागपूर येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी योगींना प्रत्युत्तर दिले. त्यावर योगींनीही खरगेंना प्रत्युत्तर दिले. ‘रझाकारांनी तुमचे गाव जाळले होते. त्याचा तुम्हाला संताप यायला हवा. मात्र तुमच्याकडे अनुनयाला प्राधान्य आहे’, अशी टीका योगींनी केली. ही आरोपांची राळ पाहता,  महाराष्ट्राच्या निवडणुकीत हा मुद्दा शेवटच्या टप्प्यात अधिकच टोकदार झाल्याचे दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगींच्या मताशी सहमती दर्शवली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नाराजी व्यक्त केली. ‘जुडोगे तो जितोगे’ असे प्रत्युत्तर छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी दिले. तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडूनही भाजपला उत्तर दिले आहे. मात्र योगींच्या या घोषणेनंतर राज्यात राजकीय पक्ष रणनीती आखताना सावधगिरी बाळगत आहेत. यातून राजकीय लाभ किंवा तोट्याचा अंदाज प्रचारमोहीम आखणारे धुरीण बांधत आहेत. समाजमाध्यमांचा वापरही यासाठी केला जात आहे.

देशभरातील प्रचारात मुद्दा

केवळ महाराष्ट्रातच नाही तर झारखंड विधानसभा निवडणुकीतही भाजपने आदिवासींची संख्या कमी होत असल्याचा तसेच बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा प्रचारात जोरदारपणे मांडला. जनसंख्येत बदलाचा (डेमॉग्राफी चेंज) आरोपही भाजपने झारखंडमध्ये केला. त्याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळाल्याचे दिसले. गेल्या वेळी आदिवासींची मते अपेक्षित प्रमाणात मिळाली नसल्याने भाजप सत्तेतून पायउतार झाले होते. मात्र यंदा पुन्हा झारखंड मुक्ती मोर्चाकडून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले. झारखंडप्रमाणे उत्तर प्रदेशातही ९ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे एकूणच हा मुद्दा हरियाणानंतर देशभरात विविध व्यासपीठांवरून प्रचारात मांडला गेला. आता महाराष्ट्रासारख्या देशातील उत्तर प्रदेश खालोखाल सर्वात मोठ्या राज्यात कितपत प्रतिसाद मिळतो त्याचे उत्तर निकालातून मिळेल.

hrishikesh.deshpande@expressindia.com