Maharashtra will take initiative to develop Panipat memorial site: १४ जानेवारी १७६१ या दिवशी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शहा अब्दालीसारख्या परकीय आक्रमणकर्त्याला रोखण्यासाठी असंख्य मराठ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पानिपतमधील ‘काला अंब’ परिसरात मराठ्यांनी आपल्या रक्ताने भूमी पावन करत परकीय आक्रमकांना रोखून धरले आणि देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. या पार्श्वभूमीवर, पानिपतच्या रणांगणावर धारातीर्थी पडलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात मावळ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. पानिपतच्या तिसऱ्या लढाईला २६४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘मराठा शौर्य दिन’ साजरा करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या स्मारकाच्या उभारणीची घोषणा केली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार असून मराठा शौर्याचे प्रतीक असणारे भव्य संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम आणि इतर आवश्यक सुविधांची निर्मिती केली जाईल. हरियाणा सरकारशी समन्वय साधण्यासाठी मंत्री जयकुमार रावल यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हरियाणात मागे राहिलेल्या मराठ्यांचा इतिहास काय सांगतो याचा घेतलेला आढावा.

१४ जानेवारी १७६१ नेमकं काय घडलं होतं?

हरियाणातल्या पानिपत इथं सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली १७६१ मध्ये मराठा सैन्य अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दाली याच्याशी युद्ध करण्यासाठी पोहोचलं होतं. या युद्धात जवळपास ४०,००० ते ५०,००० मराठा सैनिक मारले गेले. तर जे वाचले किंवा ज्यांनी पळ काढला ते युद्धभूमीच्या आजूबाजूच्या परिसरात लपून राहिले. या समाजाच्या अनेक परंपरा आजही महाराष्ट्रातील परंपरांशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यांच्या भाषेतही बरेच मराठी शब्द आहेत. हरियाणाच्या रोड मराठा समाजाच्या उत्पत्तीचा उगम समजून घेण्यासाठी आपल्याला १७५० च्या दशकाच्या अखेरीस जावं लागतं. या कालखंडात मुघल साम्राज्याचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली होती. मुघल सम्राट हा नावापुरतातच सम्राट होता. परिस्थिती इतकी गंभीर होती की, ते स्वतःच्या राजधानीचे संरक्षण करण्यासही असमर्थ होते. त्यामुळेच अनिच्छेने का होईना त्यांना मराठ्यांच्या संरक्षणाखाली जावे लागले होते.

सदाशिवराव भाऊ

या परिस्थितीत रोहिलखंडच्या नजीब-उद-दौलाहने अफगाण शासक अहमद शाह अब्दालीला भारतावर आक्रमण करण्यासाठी आणि दिल्लीवरील मराठ्यांचे वर्चस्व हटवण्यासाठी आमंत्रित केले. भारताला लुटण्यासाठी अब्दाली मोठ्या सैन्यासह चाल करून आला. १७६० साली तो खैबर खिंडीतून पेशावरमार्गे पंजाब प्रांत पार करून दिल्लीवर चालून आला. मुघलांनी मराठ्यांची मदत मागितली आणि मराठ्यांनी मदतीसाठी आपले सैन्य सदाशिवरावभाऊंच्या आधिपत्याखाली दिल्लीला रवाना केले. १४ मार्च १७६० ला परतूडहून निघून पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा जंगी फौज मजलदरमजल करीत २ ऑगस्टला दिल्लीत पोहोचली. आग्र्याला यमुना पार करून अहमदशहा अब्दालीशी अंतर्वेदीमध्ये (गंगा-यमुनामधील दुआबाचा प्रदेश) सामना करण्याचा भाऊंचा बेत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमुळे तडीस जाऊ शकला नाही. पुढे सप्टेंबर १७६० अखेरीस मराठ्यांनी पानिपतमध्ये मोर्चाबंदी केली. १६ ऑक्टोबरला कुंजपुरा किल्ल्यावर धाड घालून अब्दालीची रसद त्यांनी लुटल्यावर तो बिथरला. २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान मराठ्यांच्या नकळत बांधपत येथे त्याच्या सैन्याने यमुना ओलांडली आणि मराठ्यांच्या दक्षिणेला त्याने मोर्चाबंदी केली. मग अब्दालीने पद्धतशीरपणे अगडबंब मराठा फौजेची रसद आटवली. यमुना पार करण्याची धूर्त चाल आणि रसद गोठवण्याचे डावपेच यांमुळे सदाशिवरावभाऊ कोंडीत सापडले आणि उपासमारीला कंटाळून १३ जानेवारी १७६१ रोजी त्यांनी ही कोंडी फोडण्यासाठी चढाई करण्याचे ठरवले (Pitre, K. G. War History of the Marathas : 1600–1818, 1998).

सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य

रोड मराठ्यांच्या गोष्टीची सुरुवात

अनेक महिने यमुनेच्या दोन्ही बाजूने चाललेल्या या प्रदीर्घ मोहिमेनंतर शेवटची लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत येथे झाली. या लढाईत मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्यासह अनेक मराठा सरदार धारातीर्थ पडले. जवळजवळ प्रत्येक मराठा सरदार घराण्याने त्या रणभूमीवर आपले रक्त सांडले. मराठा लढाऊ सैन्य ५० हजाराच्या घरात होते. याशिवाय स्त्रिया, इतर यात्रेकरू, कामगार यांचाही समावेश होता. हे लढाईत सहभागी नसलेले लोक एक लाख ते दीड लाखांच्या दरम्यान होते, असे म्हटले जाते. युद्ध सैनिकांबरोबरचा हा मोठा लवाजमा आणि त्यांचे संरक्षण, पालन पोषण हे या पराभवामागील मुख्य कारण मानले जाते. इतिहासकार उदय एस. कुलकर्णी आपल्या ‘सॉल्स्टिस अ‍ॅट पानिपत’ या पुस्तकात लिहितात की, विजय मिळवल्यानंतर अब्दालीने आपल्या सूडबुद्धीने पेटलेल्या सैन्याला पळणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग करून त्यांना ठार मारण्याची परवानगी दिली. यामुळे जवळपास नऊ हजार निःशस्त्र लोकांचा मृत्यू झाला, तर बावीस हजार लोकं पकडले गेले. काही लहान गट आणि स्वतंत्र पळणाऱ्या काही व्यक्ती अफगाणांच्या जाळ्यातून निसटण्यात यशस्वी झाल्या. याच टप्प्यावर हरियाणाच्या रोड मराठ्यांच्या गोष्टीची सुरुवात होते, असे सांगितले जाते.

अलीकडील संशोधन

अलीकडील दशकांत कोल्हापूर विद्यापीठाशी संलग्न असलेले प्रसिद्ध इतिहासकार वसंतराव मोरे आणि हरियाणातील माजी प्रशासक तसेच मराठा जागृती मंचाचे अध्यक्ष विरेंद्रसिंह वर्मा यांनी केलेल्या संशोधनामुळे पानिपतच्या आजूबाजूच्या सुमारे दोनशे गावांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या या समुदायावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या संशोधनानुसार रोड मराठा समुदायाच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती मराठ्यांशी मिळत्याजुळत्या असल्याचे समोर आले. भाषा, धार्मिक विधी, घरांची रचना, अगदी त्यांच्या जेवणाच्या काही पद्धती या मराठ्यांशी समानता दर्शवतात. या समुदायाची लोकसंख्या अनेक लाखांमध्ये असून त्यातील काही सदस्य राज्य पातळीवर राजकारणातही सक्रिय आहेत. या संशोधनात हा समुदाय सुमारे पाचशे मराठा सैनिक आणि निःशस्त्र लोकांच्या वंशजांपासून निर्माण झाला हे उघड झाले. काही कुटुंबांनी गेल्या काही दशकांपूर्वीपर्यंत जुनी मध्ययुगीन शस्त्रास्त्रं घरात जतन करून ठेवलेली होती. आज मात्र इतिहासातील त्या भीषण रक्तपाताची कोणतीही चिन्हे शिल्लक नाहीत.

याशिवाय प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी रोड मराठ्यांबद्दल दिलेल्या वेगळ्या सिद्धान्ताबद्दल निरंजन छानवाल यांनी बीबीसी मराठीसाठी लिहिलेल्या लेखात संदर्भ दिला आहे. या संदर्भानुसार, “पानिपताच्या तिसऱ्या युद्धानंतर दहा वर्षांनी महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा केला होता. त्यावेळी त्यांनी पानिपत, सोनिपत, बागपत अशा परिसरावरही कब्जा मिळवला होता. मराठा सैन्य इथं राज्य करत होतं. १८००च्या नंतर मराठ्यांची सत्ता उत्तर भारतात कमकूवत व्हायला लागली. त्यानंतरही काही मराठा सैनिकांनी तिथंच राहण्याचा निर्णय घेतला. त्या सैनिकांचेच वंशज हे रोड मराठा म्हणून ओळखले जातात,” संदर्भ: रोड मराठा कोण आहेत? पानिपतनंतर तिथेच थांबलेल्या मराठा सैनिकांच्या वंशजांची कथा: निरंजन छानवाल, १४ जानेवारी २०१८)

काला अंब स्मारक

काला अंब स्मारक

पानिपतच्या टोकाला एक सुंदर उद्यान आहे, हे उद्यान ‘काला अंब स्मारक’ म्हणूनओळखले जाते. हे ठिकाण हिरवेगार आणि शांत आहे. या ठिकाणी मराठा सेनापती सदाशिवराव भाऊ शहीद झाल्याचे मानले जाते. लोककथेनुसार या ठिकाणी एक आंब्याचे झाड होते जे रक्ताने काळं पडले, म्हणूनच या जागेला ‘काला अंब’ असे नाव मिळाले. दरवर्षी १४ जानेवारीला रोड मराठा समुदायाचे नेते येथे एकत्र येतात आणि ‘शौर्य दिवस’ साजरा करतात.