यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात देशात किती आणि कसा पाऊस पडला, एल-निनो, हिंद महासागरीय द्वि-ध्रुवितेचा काय परिणाम झाला, परतीचा पाऊस कसा होईल, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरणीय स्थितीचा काय परिणाम झाला, त्या विषयी….
देशात मोसमी पाऊस किती, कसा पडला?
एक जून ते ३० सप्टेंबर हा चार महिन्यांचा मोसमी पावसाचा कालखंड देशात पावसाळा ऋतू गणला जातो. यंदा या काळातील पाऊस सामान्य राहिला. देशभरातील पर्जन्यमान विचारात घेता सरासरीच्या ९४.४ टक्के मोसमी पाऊस झाला. या काळात देशात सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडतो, यंदा ८२० मिमी पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या ९४.४ टक्के आहे. सरासरीच्या ५.६ टक्के पाऊस कमी झाला आहे. मात्र, सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के पाऊस सामान्य पाऊस गृहीत धरला जातो. त्यामुळे यंदा मोसमी पावसाचे पर्जन्यमान देशभरात सामान्य राहिले.
हेही वाचा – ब्रिटिशांशी लढण्याकरिता महात्मा गांधींनी खादीचा कसा वापर केला?
देशभरातील पर्जन्यमान कसे राहिले?
यंदा पाऊस उशिरा सक्रिय झाला. १९ मे रोजी मोसमी वारे अंदमान निकोबार बेटावर दाखल झाले होते. १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित असताना ते ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाले. राज्यात तळकोकणात ११ जूनला मोसमी वारे दाखल झाले. त्यानंतर मोसमी वाऱ्यांनी पुणे, मुंबईला हुलकावणी देत २४ जून रोजी थेट विदर्भापर्यंत धडक मारली. २४ जूननंतर वेगाने प्रगती करीत २५ जून रोजी थेट दिल्लीत धडक दिली. २ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापला. मोसमी पाऊस सामान्यपणे आठ जुलैपर्यंत देशभरात सक्रिय होतो. पण, यंदा पाच दिवस अगोदरच देश व्यापला होता. जूनमध्ये सरासरीच्या कमी म्हणजे ९१ टक्के पाऊस झाला. जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त, ११३ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी, ६४ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात देशाच्या बहुतेक भागात मोठा खंड पडला. सप्टेंबरमध्ये पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावत सरासरी भरून काढली. सप्टेंबरमध्ये ११३ टक्के पाऊस झाला. हवामान विभागाच्या उपविभागांचा विचार करता, ७३ टक्के भागांत सामान्य पर्जन्यवृष्टी झाली, १८ टक्के भागात कमी पाऊस झाला. पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा १८ टक्के कमी पाऊस झाला. पश्चिम आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दक्षिण भारतात सरासरीच्या आठ टक्के कमी पाऊस झाला आहे.
राज्यातील पर्जन्यमान कसे राहिले?
मोसमी पावसाने राज्यात सरासरी गाठली आहे. एक जून ते ३० सप्टेंबर या काळात राज्यात सरासरी ९९४.५ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ९६५.७ मिमी पाऊस झाला. सरासरीपेक्षा तीन टक्के कमी पाऊस झाला. कोकण विभागात २८७०.८ मिमी सरासरी पाऊस पडतो, यंदा ११ टक्के जास्त ३१७७.६ मिमी पाऊस झाला आहे. रत्नागिरीत २ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात १२ टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी ७४७.४ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात ६५५.७ मिमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात ११ टक्के कमी पाऊस झाला आहे, सरासरी ६४२.८ मिमी पाऊस पडतो, यंदा ५७३.२ मिमी पाऊस झाला आहे. विदर्भात २ टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी ९३७.३ टक्के पाऊस पडतो, यंदा ९२१.२ टक्के पाऊस झाला आहे.
नऊ जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती?
राज्यातील नऊ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. सांगलीत सरासरीपेक्षा ४४ टक्के कमी पाऊस पडला आहे. सरासरी ४८६.१ मिमी पाऊस पडतो, यंदा २७२.७ मिमी पाऊस पडला आहे. सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३७ टक्के कमी पाऊस पडला आहे. सरासरी ८४४.६ मिमी पाऊस पडतो, यंदा ५३५.६ मिमी पाऊस पडला आहे. सोलापुरात सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस पडला आहे, सरासरी ४५८.१ मिमी पाऊस पडतो, यंदा ३१९.३ मिमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात २१ टक्के कमी पाऊस पडला आहे. सरासरी ५५७.४ मिमी पाऊस पडतो, यंदा ४३८.२ मिमी पाऊस पडला आहे. धाराशिव जिल्ह्यात २४ टक्के कमी पाऊस पडला आहे. सरासरी ५७९.६ मिमी पाऊस पडतो, यंदा ४४२.३ मिमी पाऊस पडला आहे. हिंगोलीत २३ टक्के कमी पाऊस पडला आहे. सरासरी ७५८.३ मिमी पाऊस पडतो, यंदा ५८३.८ मिमी पाऊस पडला आहे. जालन्यात ३३ टक्के कमी पाऊस पडला आहे. सरासरी ५९१.८ मिमी पाऊस पडतो. यंदा ३९८ मिमी पाऊस पडला आहे. विदर्भातील अकोल्यात २३ टक्के कमी पाऊस पडला आहे. सरासरी ६९४.२ मिमी पाऊस पडतो, यंदा ५३२.९ मिमी पाऊस पडला आहे. अमरावतीत २७ टक्के कमी पाऊस पडला आहे. सरासरी ८२२.९ मिमी पाऊस पडतो, यंदा ६०२.४ मिमी पाऊस पडला आहे.
हेही वाचा – विश्लेषण: आणखी एका महासाथीच्या उंबरठय़ावर?
बंगालच्या उपसागराने देशाला तारले?
प्रशांत महासागरात एल-निनो सक्रिय झाल्यामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज होता. देशात पाऊस होईल. पण, राज्यात पाऊस कमी पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. उशिराने सक्रिय झालेल्या मोसमी पावसामुळे तशीच भीती व्यक्त केली जात होती. पण, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे विदर्भासह मोसमी पावसाच्या प्रमुख प्रभाव क्षेत्रात म्हणजे मध्य भारतात जोरदार पाऊस झाला. मध्य भारत किंवा मोसमी पावसाच्या प्रमुख प्रभाव क्षेत्रात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश, पूर्व गुजरात, दक्षिण उत्तर प्रदेश आणि पूर्व आणि दक्षिण राज्यस्थानचा समावेश होतो. संपूर्ण पावसाळ्यात जूनमध्ये ३, जुलैमध्ये ५, ऑगस्टमध्ये २ आणि सप्टेंबरमध्ये ५, अशी एकूण १५ कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. या कमी दाबाच्या क्षेत्रांचा प्रभाव ६५ दिवस राहिला. ही सर्व कमी दाबाची क्षेत्रे बंगालच्या उपसागरात तयार झाली होती. या कमी दाबाच्या क्षेत्रांनी बंगालच्या उपसागरातून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थानच्या दिशेने वाटचाल केली. त्यामुळे मोसमी पावसाच्या प्रमुख प्रभाव क्षेत्रात दमदार पाऊस झाला. हेच प्रभाव क्षेत्र देशाची अन्नधान्यांची गरज भागविण्यात मोठी भूमिका बजावते.
परतीच्या पावसाचा अंदाज काय?
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणारा मान्सूनोत्तर पाऊस सरासरीइतका पडण्याचा अंदाज आहे. देशात या काळात सरासरी ३३४.१३ मिमी पाऊस पडतो. यंदा उत्तर गुजरात आणि राजस्थान, पंजाब, हरियाना आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस अपेक्षित आहे. मात्र, राज्यात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हिंद महासागरीय द्वि-ध्रुविता (आयओडी) संपूर्ण पावसाळाभर तटस्थ अवस्थेत होता. ऑगस्टच्या अखेरीस तो सक्रिय झाला आहे. या सक्रियतेचा फारसा सकारात्मक परिणाम पावसाळ्यात दिसून आला नाही. पण, आताच्या सक्रियतेचा परिणाम म्हणून दक्षिण भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान चांगला पाऊस अपेक्षित आहे. हा पाऊस दक्षिण भारतातील मोसमी पावसाची तूट भरून काढेल आणि रब्बी हंगामाला फायदेशीर ठरेल, असा अंदाज आहे.
dattatray.jadhav@expressindia.com