ज्ञानेश भुरे
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट मागे पडत चालले असताना, खेळाडूही कसोटीकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यांना कसोटीकडे वळवण्याचा एक भाग म्हणून या योजनेकडे बघितले जाऊ शकते.
भारतीय संघाने मायदेशातील आपले वर्चस्व अधोरेखित करताना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला ४-१ अशा फरकाने पराभूत केले. या मालिकेतील धरमशाला येथे झालेल्या अखेरच्या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कसोटीपटूंसाठी प्रोत्साहनपर रकमेची घोषणा केली. ‘बीसीसीआय’ची ही योजना नक्की काय आहे आणि या योजनेचा नेमका फायदा कोणाला होणार, याचा आढावा.
योजना नेमकी काय आहे?
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट मागे पडत चालले असताना, खेळाडूही कसोटीकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यांना कसोटीकडे वळवण्याचा एक भाग म्हणून या योजनेकडे बघितले जाऊ शकते. यामुळे ‘आयपीएल’ करार नसलेले खेळाडू आता पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळून चांगली कमाई करू शकतील. तसेच ज्या खेळाडूंचा कसोटीतील रस कमी होत चालला होता, त्यांना किमान आर्थिक मोबदल्यामुळे तरी पाच दिवसाचे क्रिकेट खेळावे असे वाटेल अशी ‘बीसीसीआय’ला आशा आहे. कसोटी क्रिकेट खेळण्यास प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंसाठी सामन्याच्या मानधनापेक्षा तिप्पट रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे. म्हणजे अशा खेळाडूंना मानधनाबरोबर अतिरिक्त ४५ लाख रुपये मिळणार आहेत. अर्थात, यासाठी खेळाडू अंतिम अकरात असणे आवश्यक आहे. जे खेळाडू ५० टक्क्यांपेक्षा कमी सामने खेळतात ते फक्त सामन्याच्या मानधनासाठी पात्र ठरतील. जे यापेक्षा अधिक सामने खेळतील, त्यांना अतिरिक्त प्रोत्साहन रक्कम मिळेल. राखीव खेळाडूंसाठी ही रक्कम निम्मी असेल.
या प्रोत्साहनपर रकमेचा फायदा कोणाला होणार?
‘बीसीसीआय’ने आपली ही योजना २०२२-२३ च्या हंगामापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या हंगामात भारत सहा कसोटी सामने खेळला होता. त्यामुळे जे खेळाडू तीनपेक्षा कमी कसोटी सामने खेळले आहेत, ते या प्रोत्साहनपर रकमेसाठी पात्र ठरणार नाहीत. त्या हंगामात चेतेश्वर पुजारा सर्व सहा कसोटी सामने खेळला होता. या प्रत्येक सामन्याचे मानधन म्हणून त्याला १५ लाख (प्रति सामना) रुपये मिळतील. बरोबरीने प्रोत्साहन म्हणून प्रतिसामन्यास ४५ लाख रुपयेही मिळतील. म्हणजेच पुजाराची या हंगामासाठी साधारण ३.६० कोटी रुपये कमाई होईल. याच हंगामात वेगवान गोलंदाज उमेश यादव सर्व सहा सामन्यांसाठी भारतीय चमूत होता. मात्र, तो चारच सामने खेळला. तो उर्वरित दोन सामन्यांसाठी चमूत असल्याने त्याला २२.५ लाख रुपये मिळतील. तर खेळलेल्या चार सामन्यांसाठी मानधनासह प्रोत्साहनापर ४५ लाख रुपये मिळतील. म्हणजेच त्याची कमाई ३.१५ कोटी इतकी होईल.
‘बीसीसीआय’ने हा निर्णय नेमका कशामुळे घेतला?
इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंनी भारतीय संघातून बाहेर गेल्यानंतर रणजी करंडक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आणि ‘आयपीएल’च्या तयारीला सुरुवात केली. त्यामुळे अधिक दिवसांचे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला आर्थिक पारितोषिक जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे ‘बीसीसीआय’ला वाटले. त्याहीपेक्षा संघातील काही वरिष्ठ खेळाडूंनी कसोटी क्रिकेट मानधनात बदल करण्याची मागणी केली होती. ‘आयपीएल’ आणि कसोटी मानधन यात मोठी तफावत असल्याचे खेळाडूंचे म्हणणे होते. ही तफावत दूर करण्यासाठीही ‘बीसीसीआय’ने या योजनाचा आधार घेतला.
‘बीसीसीआय’ची सध्याची वेतनश्रेणी कशी आहे?
‘बीसीसीआय’ प्रत्येक कसोटी सामन्यासाठी १५ लाख (राखीव खेळाडूंना ७.५ लाख), प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख (राखीव खेळाडूस ३ लाख), प्रत्येक ट्वेन्टी-२० सामन्यासाठी ३ लाख (राखीव खेळाडूस १.५ लाख) इतके मानधन देते. या व्यतिरिक्त काही खेळाडूंना ‘बीसीसीआय’ने करारबद्ध केले आहे. खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार वेतनश्रेणी निश्चित केली आहे. यात ‘अ+’ श्रेणीसाठी ७ कोटी, ‘अ’ श्रेणीसाठी ५ कोटी, ‘ब’ श्रेणीसाठी ३ कोटी आणि ‘क’ श्रेणीसाठी १ कोटी रुपये मिळतात.