भारतात क्रिकेट या खेळाकडे धर्म म्हणून पाहिलं जातं. इथली प्रत्येक व्यक्ति एकतर क्रिकेट फॅन किंवा चित्रपटांची फॅन असते. क्रिकेट म्हणजे फक्त कसोटी सामने हे समीकरण हळूहळू मोडलं. नंतर एकदिवसीय सामना, २०-२०, आयपीएल या प्रकारांनी आता सगळ्या क्रिकेटप्रेमी वर्गावर गारुड केलं आहे. क्रिकेटच्या संघात ११ खेळाडू असतात पण आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने याच टी-२० खेळाच्या बाबतीत एक निर्णय घेतला आहे जो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच एक नवीन नियम लागू होणार असण्याची दाट शक्यता आहे. त्या नियमाचं नाव म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर रुल (Impact player rule). ऑस्ट्रेलियामध्ये हा नियम आधीपासून आहेच. आता बीसीसीआय भारतातदेखील क्रिकेटच्या टी-२०, डोमेस्टिक क्रिकेट आणि आयपीएल अशा काही फॉरमॅटमध्ये हा नियम लागू करू शकते असं सांगितलं जात आहे.
काय आहे इम्पॅक्ट प्लेअर रुल?
या नियमानुसार खेळ सुरू होताना जेव्हा टॉस केला जातो तेव्हा प्रत्येक संघाचा कर्णधार त्यांचे ११ नियमित खेळणाऱ्या खेळाडूंची नावं सांगतील आणि याबरोबरच ४ पर्यायी खेळाडूंची नावंदेखील त्यांना सांगायला लागतील. या ४ पैकी कोणत्याही एका खेळाडूला आयत्यावेळी नियमित खेळणाऱ्या ११ खेळाडूंपैकी एखाद्याच्या जागी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळायला पाठवलं जाता येईल. ज्या खेळाडूला बाहेर काढलं जाईल तो खेळाडू तो पूर्ण सामना खेळणार नाही. त्याऐवजी त्याचा पर्यायी खेळाडू सामना पूर्ण करेल. कर्णधार आणि व्यवस्थापक यांना हा निर्णय घेण्याआधी पंचांना सूचित करणं अनिवार्य असेल.
हा नियम फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या दोन्ही संघांना लागू होईल. फलंदाजी करत असताना एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तंर मात्र त्याच्याऐवजी खेळणारा पर्यायी खेळाडूला ओव्हर संपल्यानंतरच खेळायची संधी मिळेल. गोलंदाजी करणाऱ्या संघापैकी एखाद्या गोलंदाजाने नियम मोडल्यास बाहेर जावं लागलं तंर त्याच्याऐवजी पर्यायी खेळाडूला खेळण्याची संधी मिळणार नाही. बाकी संपूर्ण सामन्यात तुम्ही कोणत्याही खेळाडूला पर्यायी खेळाडूने बदलू शकता.
बीसीसीआयने या नियमाविषयी एक पत्रक प्रकाशित केलं आहे. या पत्रकात या नियमाशी निगडीत सगळी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये बीसीसीआयने सांगितलं आहे की टी-२० खेळाचीवाढती लोकप्रियता पाहता काहीतरी वेगळा बदल आणण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. या नियमामुळे हा खेळ आणखीनच रोमांचक होईल अशी आशा करुयात.
आणखी वाचा : विश्लेषण : बॉयकॉट ट्रेंडमुळे ‘ब्रह्मास्त्र’ हिट की फ्लॉप? जाणून घ्या व्हायरल ट्रेंडमागची ‘ही’ कारणं
क्रिकेट तज्ञ हर्षा भोगले यांनी या नियमाविषयी ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, “या नियमाची गरज कितपत आहे हे अजून मलाही तितकंसं खात्रीशीरपणे ठाऊक नाहीये. खेळात नावीन्य आणताना तुम्ही त्याच्याशी छेडछाड करता. टी-२० हा खेळ सर्वसामान्य लोकांना अगदी सहज समजणारा आहे. काहीतरी नवीन देण्याच्या नादात ५० ओव्हरच्या क्रिकेटप्रमाणे लोकांना टी-२०चादेखील कंटाळा यायला नको याची काळजी घ्यायला हवी.”