भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध, त्यानंतर ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका गमाविल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून आपल्या केंद्रीय वार्षिक करारात समाविष्ट असणाऱ्या खेळाडूंसाठी नवे धोरण अवलंबले आहे. भारतीय संघात निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग अनिवार्य, दौऱ्यादरम्यान कुटुंबीय आणि वैयक्तिक साहाय्यकांवर विविध निर्बंध यांसारख्या १० नियमांचा यात समावेश करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई होईल आणि कदाचित आयपीएलमधील सहभागावर बंदी घातली जाईल, असेही ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.
नव्या धोरणातील १० मुद्दे…
१. देशांतर्गत क्रिकेटमधील सहभाग अनिवार्य, अन्यथा राष्ट्रीय संघातील निवड आणि वार्षिक केंद्रीय करारासाठी विचार केला जाणार नाही. योग्य कारणास्तव यातून सूट.
२. संघात शिस्त आणि ऐक्य राहावे यासाठी प्रत्येक खेळाडू संघातील अन्य सदस्यांबरोबरच सामने व सराव सत्रांसाठी जाईल. कुटुंबाबरोबर वेगळा प्रवास करण्यास मनाई. कोणत्याही कारणास्तव वेगळा प्रवास करायचा झाल्यास प्रशिक्षक आणि निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी आवश्यक.
३. खेळाडूंनी मर्यादित सामान घेऊनच प्रवास करणे अनिवार्य. ३० दिवसांहून मोठा परदेश दौरा असल्यास खेळाडूंना तीन सुटकेस आणि दोन किट बॅगची मुभा किंवा एकूण १५० किलोचे सामान. ३० हून कमी दिवसांचा परदेश दौरा आणि मायदेशातील मालिकेसाठी खेळाडूंना प्रत्येकी दोन सुटकेस व किट बॅगची परवानगी किंवा एकूण १२० किलोचे सामान. याहून अधिक सामान असल्यास खर्च खेळाडूंना उचलावा लागणार. प्रशिक्षकांच्या चमूसाठीही नियम लागू. त्यांना खेळाडूंपेक्षा जवळपास निम्म्या वजनाचे सामान नेण्यास परवानगी.
आणखी वाचा-Hindenburg Research : अदाणी समूहाला लक्ष्य करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चचे कामकाज का होणार बंद?
४. खेळाडू किंवा प्रशिक्षकांच्या चमूचे स्वीय्य साहाय्यक, शेफ, सुरक्षारक्षक यांच्यावर निर्बंध. ‘बीसीसीआय’कडून परवानगी मिळाली तरच यातून सूट.
५. बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपले क्रीडासाहित्य किंवा बॅगा पाठवायच्या झाल्यास खेळाडूंनी संघ व्यवस्थापनाला त्याबाबत माहिती देणे आवश्यक.
६. संपूर्ण सराव सत्र संपेपर्यंत प्रत्येक खेळाडूने मैदानात थांबणे गरजेचे. तसेच हॉटेल ते मैदानापर्यंतचा प्रवासही एकत्रित करणे अपेक्षित.
७. मालिका किंवा दौऱ्यादरम्यान खेळाडूंना वैयक्तिक शूट किंवा जाहिरातींचे चित्रीकरण करण्यास मज्जाव. यामुळे खेळाडूंना केवळ खेळावर लक्ष केंद्रित करण्यास मदत.
८. दौऱ्यादरम्यान कुटुंबीयांना मर्यादित कालावधीसाठीच खेळाडूंबरोबर राहता येणार. ४५ दिवसांहून मोठ्या परदेश दौऱ्यात जोडीदार आणि मुले (१८ वर्षांखालील) यांना केवळ दोन आठवडेच खेळाडूंबरोबर थांबता येणार. ‘बीसीसीआय’ त्यांचा निम्मा खर्च करणार.
९. ‘बीसीसीआय’चे अधिकृत फोटोशूट आणि कार्यक्रमांसाठी हजेरी अनिवार्य.
१०. सामना अपेक्षेपेक्षा लवकर (कमी दिवसांत) संपला, तरी खेळाडूंनी संघाबरोबरच राहणे बंधनकारक. यामुळे संघात एकता निर्माण होण्यास मदत.
नव्या धोरणाची गरज का भासली?
भारतीय संघाला मायदेशातील कसोटी मालिकेत न्यूझीलंडकडून ०-३ अशी, तर ऑस्ट्रेलियात १-३ अशी हार पत्करावी लागली. त्यानंतर भारतीय खेळाडू आणि संघ व्यवस्थापनावर बरीच टीका करण्यात आली. ‘बीसीसीआय’ने या कामगिरीचा आढावा घेतला आणि त्यांना कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे वाटले. ‘बीसीसीआय’ने गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटला अधिक महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे. शक्य असेल तेव्हा देशांतर्गत स्पर्धांत खेळण्याचे आवाहन सर्व खेळाडूंना करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर बरेच आघाडीचे खेळाडू यासाठी टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. गतहंगामात श्रेयस अय्यर (मुंबई) आणि इशान किशन (झारखंड) या खेळाडूंना संघ व्यवस्थापन व ‘बीसीसीआय’कडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना भारतीय संघाबाहेर ठेवण्यात आले आणि त्यांना केंद्रीय वार्षिक कराराच्या यादीतूनही वगळण्यात आले. आता पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी ‘बीसीसीआय’चा प्रयत्न आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रशिक्षक गौतम गंभीरच्या वैयक्तिक साहाय्यकाबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली होती. तो भारतीय संघातील खेळाडूंबरोबर भोजन करत असल्याचा आणि निवड समिती सदस्याबरोबर प्रवास करत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी ‘बीसीसीआय’ने आता अधिक खबरदारी घेतल्याचे चित्र आहे.
उल्लंघन करणाऱ्यावर आयपीएल बंदी?
नव्या धोरणातील सर्व नियमांचे पालन करणे खेळाडूंसाठी अनिवार्य असेल असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास वार्षिक करार किंवा सामन्याच्या मानधनात कपात, तसेच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी अशी कठोर कारवाई केली जाऊ शकते, असे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.