जपानमध्ये सध्या अस्वलाकडून माणसावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. याप्रकारच्या हल्ल्यामध्ये अनेक जपानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या हल्ल्यांचे प्रमाण लक्षात घेता आता जपान सरकार त्यावर उपाययोजना करण्याच्या तयारीत आहेत. निवासी भागामध्ये शिरलेल्या अस्वलांवर गोळीबार करण्याबाबतच्या परवान्यांमध्ये आणखी शिथिलता आणण्याचा विचार जपान सरकारकडून केला जात आहे. यावर्षी एप्रिलपर्यंत जपानमध्ये अशा प्रकारचे २१९ हल्ले नोंदवण्यात आले आहेत. यातील सहा हल्ले फारच गंभीर स्वरूपाचे होते, अशी माहिती जपान सरकारने दिली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मानवी वस्त्यांमध्ये शिरून माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जपानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही अस्वले माणसालाच आपली शिकार समजून हल्ला करू लागल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. एकीकडे जपानमधील लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट होत आहे, तर दुसरीकडे अस्वलांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषत: ग्रामीण भागांमध्ये अस्वलांचा हा हाहाकार अधिक पाहायला मिळतो आहे. एकेकाळी, माणसांची वस्ती आणि अस्वलांचा अधिवास हे दोन्हीही वेगवेगळे असायचे; मात्र आता हे दोन्हीही एकमेकांमध्ये मिसळू लागल्याने मानवी जीविताला धोका निर्माण झाला आहे. जपानमधील सध्याच्या कायद्यानुसार, केवळ परवानाधारक शिकारीच पोलिसांच्या परवानगीने बंदुकीचा वापर करू शकतात. मात्र, जपान सरकार आता या तरतुदींमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. जर अस्वलासारखा वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसल्याने मानवी जीविताला धोका निर्माण होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये स्व सुरक्षेसाठी बंदुकीचा वापर करता येईल, अशी तरतूद करण्याच्या विचारात जपान सरकार आहे.
हेही वाचा : जबरदस्तीने नसबंदीचा ‘तो’ कायदा असंवैधानिक; जपानमधील हा निर्णय महत्त्वपूर्ण का मानला जातोय?
अस्वलाची शिकार करण्यामधील आव्हाने काय आहेत?
जपान सरकार कायद्यामध्ये बदल करण्याच्या तयारीत असले तरीही परवानाधारक शिकारी काळजीत पडले आहेत. होक्काइडो हंटर्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक सतोशी सायटो यांनी बीबीसीला सांगितले की, “अस्वलाचा सामना करणे भयानक आणि धोकादायक आहे. आपण अस्वलाला गोळी मारून त्याचा खात्मा करू शकू याची काहीच शाश्वती नाही.” एखाद्या अस्वलाला गोळी मारणे अयशस्वी ठरले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “अस्वलाचा संभाव्य हल्ला रोखताना त्याच्यावर केलेला गोळीबार अयशस्वी ठरला तर तो दुसऱ्या कुणावर तरी हल्ला करू शकतो. जर त्याने दुसऱ्या कुणावर तरी हल्ला केला तर त्याला जबाबदार कोण?” जपानमधील होक्काइडोच्या उत्तरेकडील बेटावर अस्वलाच्या हल्ल्यांची समस्या वाढली आहे. या बेटावर मानवी वस्ती विरळ असली तरीही तिथे अस्वलांची संख्या १९९० पासून दुपटीने वाढली आहे. सध्या तिथे १२ हजारांहून अधिक तपकिरी रंगाची अस्वले आहेत. तपकिरी रंगाची अस्वले ही काळ्या रंगाच्या अस्वलांहून अधिक आक्रमक असतात. जपानमध्ये काळ्या रंगाची अस्वले १० हजारांच्या आसपास आहेत. अस्वलांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी जपानमधील स्थानिक प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये तंत्रज्ञानाचाही चतुराईने वापर केला आहे. लाल डोळे असलेला रोबोट लांडगा तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सावध करणारी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. नाई आणि होक्काइडोमध्ये प्रशासनातील अधिकार्यांनी शिकारींना कामाला लावले आहे. रस्त्यावर गस्त घालण्यासाठी, सापळे लावण्यासाठी आणि आवश्यक असल्यास अस्वलांना मारण्यासाठी शिकारींना दररोज १०,३०० येन ($ ६४) देऊ केले आहेत.
समस्या सोडवण्यासाठी सरकार काय करत आहे?
जपानच्या पर्यावरण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ लोकांच्या समितीने मानवी वस्तीत घुसलेल्या अस्वलांना विशिष्ट परिस्थितीमध्ये मारण्यासाठी रायफलच्या वापरासाठी परवानगी देण्याला समर्थन दिले आहे. आता जपानच्या पुढील संसदीय अधिवेशनात वन्यजीव संरक्षण आणि शिकार कायद्यात सुधारणा करण्याची पर्यावरण मंत्रालयाची योजना आहे. आता कायद्यातील या नव्या सुधारणांनुसार, जर एखादा अस्वल इमारतींमध्ये शिरला असेल, तो मानवी जीवितास धोका निर्माण करत असेल तर त्याच्यावर गोळीबार करण्यास शिकारींना परवानगी असेल. कायद्यानुसार काही अटींची पूर्तता करणाऱ्या शिकारींना रात्रीच्या वेळीही अस्वलाची शिकार करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, काही तज्ज्ञांना यामध्ये जोखीमही जाणवत आहे. हिरोमासा इगोटा या होक्काइडो येथील राकुनो गाकुएन विद्यापीठातील शिकार व्यवस्थापन विषयातील सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांनी जपानमधील असाही शिंबुन या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये काही चिंता व्यक्त केल्या आहेत. पिचिओ वन्यजीव संशोधन केंद्रातील जुनपेई तनाका यांनी बीबीसीशी बोलताना म्हटले आहे की, कायद्यातील सुधारणा गरजेच्या असल्या तरीही हा उपाय आणीबाणी परिस्थितीमध्ये उपयोगी ठरू शकतो, हा शाश्वत उपाय नाही. अस्वले मानवी वस्तीत येऊच नयेत, यासाठी त्यांच्या अधिवासाचे संरक्षण महत्त्वाचे ठरते. जैवविविधता टिकवून ठेवून जंगलातील वातावरण सुधारावे, यासाठी काही धोरणे राष्ट्रीय पातळीवर लागू करायला हवीत. तसेच आणीबाणीवेळी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित सरकारी शिकारीही असले पाहिजेत. सध्या त्यांची कमतरता आहे, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा : पैसे टाकल्यावर वस्तू देणाऱ्या मशीन्स जपानमध्ये चर्चेत का आल्या आहेत?
अस्वलांची संख्या वाढण्यामागचे कारण काय?
अस्वलांची संख्या वाढण्यामागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अस्वलांच्या अन्नाची कमतरता आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या घटणे ही दोन मुख्य कारणे त्यामागे आहेत. ही अस्वले त्यांच्या अन्नाच्या शोधात मानवी वस्तीपर्यंत पोहोचतात आणि मग त्यातूनच अशाप्रकारचे हल्ले होत आहेत. हवामान बदलामुळेही ओक वृक्षाचे फळ आणि अस्वलाचे इतर खाद्यपदार्थ यांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोट भरण्यासाठी म्हणून अस्वले आपला अधिवास सोडून मानवी अधिवासामध्ये शिरकाव करत आहेत. जपानचे पर्यावरण मंत्री शिंतारो इतो यांनी या संदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. अस्वलांची संख्या गतीने वाढत आहे. होक्काइडोमध्ये सुमारे ४४ हजार काळे अस्वल आणि १२ हजार तपकिरी अस्वल आहेत. हवामान बदल हा एक महत्त्वाचा घटक आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी होणे ही बाब यामध्ये अधिक भर घालताना दिसत आहे. जपानमध्ये सध्या हा एक महत्त्वाचा विषय ठरला आहे.