जपानमध्ये सध्या अस्वलाकडून माणसावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. याप्रकारच्या हल्ल्यामध्ये अनेक जपानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या हल्ल्यांचे प्रमाण लक्षात घेता आता जपान सरकार त्यावर उपाययोजना करण्याच्या तयारीत आहेत. निवासी भागामध्ये शिरलेल्या अस्वलांवर गोळीबार करण्याबाबतच्या परवान्यांमध्ये आणखी शिथिलता आणण्याचा विचार जपान सरकारकडून केला जात आहे. यावर्षी एप्रिलपर्यंत जपानमध्ये अशा प्रकारचे २१९ हल्ले नोंदवण्यात आले आहेत. यातील सहा हल्ले फारच गंभीर स्वरूपाचे होते, अशी माहिती जपान सरकारने दिली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मानवी वस्त्यांमध्ये शिरून माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जपानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही अस्वले माणसालाच आपली शिकार समजून हल्ला करू लागल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. एकीकडे जपानमधील लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट होत आहे, तर दुसरीकडे अस्वलांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषत: ग्रामीण भागांमध्ये अस्वलांचा हा हाहाकार अधिक पाहायला मिळतो आहे. एकेकाळी, माणसांची वस्ती आणि अस्वलांचा अधिवास हे दोन्हीही वेगवेगळे असायचे; मात्र आता हे दोन्हीही एकमेकांमध्ये मिसळू लागल्याने मानवी जीविताला धोका निर्माण झाला आहे. जपानमधील सध्याच्या कायद्यानुसार, केवळ परवानाधारक शिकारीच पोलिसांच्या परवानगीने बंदुकीचा वापर करू शकतात. मात्र, जपान सरकार आता या तरतुदींमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. जर अस्वलासारखा वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये घुसल्याने मानवी जीविताला धोका निर्माण होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये स्व सुरक्षेसाठी बंदुकीचा वापर करता येईल, अशी तरतूद करण्याच्या विचारात जपान सरकार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा