संदीप नलावडे
युरोपमधील मोठा आणि प्रगत देश असलेल्या फ्रान्सला सध्या ढेकणांच्या समस्यांनी ग्रासल्याची चर्चा आहे. राजधानी पॅरिससह अनेक शहरांमध्ये ढेकणांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पुढील वर्षी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र ढेकणांची दहशत पसरल्याने तिथल्या आरोग्य व्यवस्थेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक, फॅशन वीक आणि पर्यटकांना होणारा त्रास या पार्श्वभूमीवर ढेकणांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान या देशापुढे आहे. फ्रान्समधील ‘ढेकूण समस्ये’विषयी…

ढेकूण नेमका कसा असतो?

ढेकूण हे लहान, सपाट, पंख नसलेले कीटक आहेत. हा निशाचर व रक्तशोषक कीटक असून मानवाखेरीज उंदीर, ससे, घोडे, गुरे व कोंबड्या यांनाही उपद्रव देतो. विशेषत: गाद्या, अंथरूण-पांघरूण, उश्या, कपाटे, फर्निचर, भिंती यांवर ढेकूण आढळतात आणि झोपलेल्या माणसाला त्रास देतात. प्रौढ ढेकूण तांबूस तपकिरी रंगाचे असतात आणि पंखहीन असतात. केवळ घरातच नव्हे तर आगगाडीचे डबे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, हॉटेल यांमध्ये ढेकूण आढळतात. जगातील प्रमुख उपद्रवी कीटक असलेले ढेकूण रात्री झोपेत माणसाचे रक्त शोषतात. मात्र कोणत्याही वैज्ञानिक अभ्यासात अद्याप असे ठोस आढळलेले नाही, की ते रोग प्रसार करतात. ढेकणाची मादी दिवसाला एक ते पाच अंडी घालते, तर संपूर्ण आयुष्यात २०० ते ५०० अंडी ती घालू शकते. ढेकूण अन्नाशिवाय कित्येक महिने राहू शकतात. फ्रान्समधील कीटक नियंत्रण तज्ज्ञ म्हणतात की, पॅरिसमध्ये फॅशन वीकसाठी येणारे, रेल्वे प्रवासी, सिनेमा पाहणारे आणि पर्यटक यांनी ढेकूण चावल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

stock market latest marathi news
विश्लेषण: परदेशी गुंतवणूकदारांचे निर्गमन हे बाजार पडझडीचे कारण?
Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला…
Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?
**Why does the Earth appear flat despite being round?**
Why Earth Looks Flat:पृथ्वी गोल असूनही ती सपाट कशामुळे दिसते?
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?

आणखी वाचा-हॉटस्टारवर क्रिकेट विश्वचषक मोफत दाखविण्यावरून वाद; ‘ओटीटी’ नियंत्रणासाठी सरकारी विभागात स्पर्धा

फ्रान्समधील ढेकूण समस्या काय आहे?

फ्रान्समध्ये सर्वत्र ढेकूण पसरले असल्याची तक्रार काही नागरिकांकडून करण्यात आली. २०१७ ते २०२२ मध्ये फ्रान्समधील दहापैकी एकापेक्षा जास्त कुटुंबांना ढेकणाचा प्रादुर्भाव झाला होता, असे आरोग्य प्राधिकरणाचे म्हणणे आहे. मात्र आता ही समस्या तीव्र नसल्याचेही त्यांनी सांगितले. ‘राष्ट्रीय अन्न, पर्यावरण आणि कार्यालय सुरक्षा यंत्रणे’ने सांगितले की, ढेकूण असणे म्हणजे अस्वच्छता नाही. मात्र सामान्य नागरिक व पर्यटकांकडून तक्रारी वाढल्या आहेत. पॅरिसमध्ये अनेक चित्रपटगृहे, रेल्वे, मेट्रो, बस, हॉटेल यांमध्ये ढेकूण आढळून येत आहेत. ढेकणाचा प्रादुर्भाव वाढल्याने फ्रान्सच्या शिक्षण मंत्र्यांनी पॅरिसमधील १० शाळा काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र काही शिक्षण संस्थांनी स्वत:हून त्यांच्या संस्था बंद ठेवल्या आहेत. काही कार्यालयांमध्ये ढेकूण वाढत असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वाहनाने प्रवास करणाऱ्या २० ते २५ जणांनी ढेकूण चावल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी अशा तक्रारी केल्या आहेत. कीटक नियंत्रण कंपन्यांच्या संघटनेने सांगितले की, ढेकणाच्या समस्येमुळे वर्षभरात ६५ टक्के जणांनी कीटक नियंत्रण फवारणी केली आहे. मात्र कीटक नियंत्रण महाग असल्याने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असते.

ढेकणाच्या समस्येवर फ्रान्समध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या?

ढेकणाच्या समस्येने फ्रान्सला ग्रासले असतानाच पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन या देशांत करण्यात येणार आहे. त्यामुळे जगभरात ‘प्रतिमा संवर्धना’चे मोठे आव्हान या देशापुढे आहे. समाजमाध्यमामध्ये प्रसारित होत असलेली माहिती व टीका, विरोधी पक्षांचे शरसंधान आणि लहान-मोठे टीकाकार यांमुळे फ्रान्समधील सरकार कोंडीत सापडले आहे. फ्रान्समधील डाव्या विचारसरणीच्या पार्लमेंट सदस्य मॅथिल्डे पॅनो यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहामध्ये एका डबीत ढेकूण आणले आणि सरकारवर जोरदार टीका केली. ‘हे छोटे किडे आपल्या देशात निराशा पसरवत असून तुम्ही तुमच्या निवासस्थानी किंवा पंतप्रधानांच्या कार्यालयात ढेकणाची लागण होण्याची वाट पाहत आहात काय?’ अशी टीका पॅनो यांनी पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांच्यावर केली. फ्रान्स सरकारने ढेकूण समस्या मान्य केली असली तरी ही मोठी समस्या नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. जगातील शिकागो, न्यूयॉर्क यांच्यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये ढेकूण आहेत, असे कीटक नियंत्रण सल्लागार निकोलस रॉक्स यांनी सांगितले. मात्र या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा- ‘मानसिक क्रूरते’मुळे शिखर धवनचा घटस्फोट मंजूर; क्रूरतेचे प्रकार काय आणि कायदा काय सांगतो? 

ढेकणांवर नियंत्रण शक्य आहे?

फ्रान्समधील कीटकशास्त्रज्ञ ज्याँ-मिशेल बेरेंजर यांनी सांगितले की, काही दशकांपूर्वी ढेकूण स्वस्त आणि शक्तिशली कीटकनाशकांद्वारे रोखले जात होते. मात्र डीडीटीसह अनेक कीटकनाशके नंतर मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे आढळून आले आणि त्यावर बंदी घालण्यात आली. ढेकणाने सौम्य कीटकनाशकांचा यशस्वीरीत्या प्रतिकार विकसित केला आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. ढेकणांची संख्या वेगाने वाढते, त्यामुळे त्यांच्यावर वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी वापरण्यात येणारी कीटकनाशक फवारणी मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याने अनेक कीटकनाशकांवर बंदी असल्याने ढेकणांवर नि़यंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान असते.

प्रवासी आणि कुटुंबे यांनी ढेकणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे?

प्रवाशांनी वा पर्यटकांनी शयनकक्ष, टॅक्सी आणि मेट्रो आसनांची तपासणी केली आहे का याची चौकशी करणे गरजेचे आहे. बेडशीटवर लहान ठिपके असलेले कीटक दिसल्यास त्याची तातडीने तक्रार करणे आवश्यक आहे. बाहेर जाताना किंवा घरी परतल्यावर सामानाची बारकाईने तपासणी केली पाहिजे. शयनगृह, पलंग, अंथरूण-पांघरूण यांची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे. बेडशीट, सोफा कव्हर, उशी कव्हर नियमित धुणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाश नसलेल्या जागी ढेकूण वर्षानुवर्षे राहतो, तसेच जवळपास दोन महिने अन्नाशिवाय राहू शकतो. ढेकूण आढळल्यास कीटक नियंत्रण तज्ज्ञांशी संपर्क साधून फवारणी करून घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

sandeep.nalawade@expressindia.com