अभिनेता-दिग्दर्शक सुकुमारन दिग्दर्शित ‘एम्पुरान’ हा चित्रपट २००२ च्या गुजरात दंगलीच्या संदर्भामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. २५ मार्चला ‘एम्पुरान’ चित्रपट चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. २००२ च्या गुजरात दंगलीचे कथित चित्रण केल्याबद्दल उजव्या विचारसरणीच्या गटातील समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. २७ दृश्यांवर कात्री लावत १२७ सेकंदांच्या बदललेल्या दृश्यांसह ‘एम्पुरान’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
‘एम्पुरान’ हा २०१९ च्या लूसिफर या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाचा सीक्वेल आहे. त्यामध्ये मोहनलाल राजकीय भूमिकेत आहेत; तर पृथ्वीराज सुकुमारन झायेद मसूदची भूमिका साकारत आहे. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन पृथ्वीराज याने केले आहे. दोन्ही चित्रपट केरळमधील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहेत. तसेच, जागतिक गुन्हेगारी जगतातल्या सिंडिकेटचे काम यात दाखवण्यात आले आहे.
चित्रपटातील फ्लॅशबॅक सीन
या चित्रपटाची सुरुवात १७ मिनिटांच्या फ्लॅशबॅक सीनने होते. त्यामध्ये झायेद मसूद याची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. याची सुरुवात दंगलीपासून होते. एक अनोळखी हल्लेखोर झायेदच्या मोठ्या भावाची हत्या करतो. त्यानंतर झायेद आणि त्याचे कुटुंबीय स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका ट्रॅक्टरवरून पळून जातात. पुढे चित्रपटात मौसी नावाची एक हिंदू महिला आहे, जी या मुस्लिम कुटुंबाला तिच्या फार्महाऊसमध्ये आश्रय देते. काही वेळाने तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन हिंदू पुरुषांचा एक जमाव त्या ठिकाणी येतो आणि त्या मुस्लिम लोकांवर हल्ला करतो. या हिंदू गटाचा नेता बलराज हा त्या मौसीला ठार मारतो आणि गोठ्यात लपलेल्या झायेद आणि त्याच्या कुटुंबाच्या दिशेने जातो. गोठ्याच्या कोपऱ्यात लपलेल्या झायेदव्यतिरिक्त बलराजने केलेल्या हल्ल्यात कोणीही जिवंत राहत नाही.
गुजरात दंगलीचा संदर्भ
चित्रपटातील ही सुरुवातीची दृश्ये २००२ च्या गुजरात दंगलीशी मिळतीजुळती असल्याचे उजव्या विचारसरणीच्या गटातील लोकांनी सांगितले. त्यावेळी हल्ल्यात हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. २७ फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला आग लावण्यात आल्यानंतर गुजरातमधील दंगलीला सुरुवात झाली. या घटनेत अयोध्येतील एका कार्यक्रमातून परतणाऱ्या ५९ आरएसएस कारसेवकांचा मृत्यू झाला होता. पुढच्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात सूडाच्या भावनेतून हिंसाचाराच्या लाटा उसळल्या.
चित्रपटाच्या समीक्षकांनी याबाबत असे म्हटले आहे, “हा चित्रपट हिंदूंनी मुसलमानांवर केलेल्या हिंसाचारावर केंद्रित आहे. तसेच यामध्ये गोध्रा जाळपोळ आणि इतर घटनांचाही समावेश आहे त्यामधील काही घटनांमध्ये हिंदूदेखील मारले गेले आहेत.
‘एम्पुरान’ चित्रपटात मसूद या व्यक्तिरेखेची पार्श्वभूमी गुजरात असल्याचे दाखवण्यात आलेले नाही. फ्लॅशबॅकमध्ये ‘२००२-भारत’ असा उल्लेख केलेला आहे. मात्र, त्यामध्ये २००२ चा संदर्भ, हिंदू प्रवाशांसह जळती ट्रेन आणि दंगलींबाबतची वृत्तपत्रातली कात्रणे असलेली दृश्ये दाखवण्यात आल्याने त्यांचा संबंध गुजरात दंगलीशी जोडला जात आहे. या दंगलीदरम्यान १८ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरोडा पाटिया परिसरात भयानक हत्याकांडही घडले. त्यामध्ये नऊ महिन्यांच्या गर्भवती कौसर बानो हिच्यावर बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आली होती. ‘एम्पुरान’ चित्रपटातही अशाच प्रकारे गर्भवती महिलेवर बलात्कार आणि हत्येचे चित्रण करण्यात आले आहे.
या प्रकरणी २०१२ मध्ये ३२ जणांना दोषी ठरवीत शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यापैकी काहींची शिक्षा नंतर रद्दही करण्यात आली होती. “ही क्रूर घटना मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी होती. एका दिवसात ९७ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामध्ये असहाय महिला, मुले आणि वृद्धांचा समावेश होता. हिंसाचाराच्या अमानवी आणि क्रूर कृत्याचा कळस हा २० दिवसांच्या बाळाच्या हत्येतून दिसून येतो”, असे या प्रकरणातील विशेष न्यायाधीश ज्योत्सना याज्ञिक यांनी निकालाच्या वेळी म्हटले होते.
२०१२ मध्ये दोषी ठरवण्यात आलेल्यांपैकी बाबूभाई पटेल ऊर्फ बाबू बजरंगी हा गुजरातमधील बजरंग दलाचा नेता होता. त्यानेच हिंसाचाराचा हा कट रचला होता. २०१८ मध्ये त्याची जन्मठेपेची शिक्षा २१ वर्षांच्या कारावासात परावर्तित करण्यात आली. पटेल हा २०१९ पासून वैद्यकीय कारणामुळे जामिनावर बाहेर आहे. या चित्रपटात बलराज या व्यक्तिरेखेला बाबा बजरंगी, असे संबोधले जाते. त्यानंतर राष्ट्रीय उजव्या विचारसरणीच्या पक्षाचा नेता म्हणून त्याला दाखविण्यात आले आहे.
चित्रपटावरून झालेल्या वादामुळे निर्मात्यांनी यामध्ये स्वेच्छेने काही बदल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला रविवारी सेन्सॉर बोर्डाने मान्यताही दिली. या चित्रपटाची नवीन आवृत्ती या आठवड्याच्या अखेरीस प्रदर्शित केली जाणार आहे.
चित्रपटात नेमके कोणते बदल केले जाणार?
- बलराज या व्यक्तिरेखेला अनेक दृश्यांमध्ये बाबा बजरंगीऐवजी बलदेव, असे संबोधले जाणार
- फ्लॅशबॅकच्या सुरुवातीला असलेल्या ‘२००२-भारत’ याऐवजी ‘काही वर्षांपूर्वी’ असे सांगितले जाणार
- लुटलेल्या दुकांनाची दृश्ये काढली जाणार
- मंदिरासमोरून जाणाऱ्या दंगलखोरांच्या गाड्या असलेले दृश्य हटवणार
- अभिनेते-भाजपा खासदार सुरेश गोपी आणि आयआरएस अधिकारी ज्योतिस मोहन यांचे आभार मानणारे ओपनिंग क्रेडिट हटवणार
- दंगलीदरम्यान महिलांवरील हिंसाचाराचे २९ सेकंदांचे दृश्य काढून टाकले जाणार
- राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) संदर्भ हटवणार